Skip to main content
x

सावरकर, विश्‍वास बळवंत

         र्नाटकातील धारवाड या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात विश्वास बळवंत सावरकर यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा दिनकर सावरकर यांना कैसर-ए-हिंद हा किताब मिळाला होता. नौरोसजी वाडिया महाविद्यालयाच्या संस्थापकांपैकी ते एक होते.

विश्वास सावरकर यांची आई मनोरमा (पूर्वाश्रमीची गद्रे) या इंग्लिश साहित्यात नागपूर विद्यापीठातून एम.ए. होत्या. त्यांनी सुवर्णपदक मिळविले होते. मनोरमा यांच्या इंग्लिश या विषयातील गुणांची बरोबरी अजूनही कोणी करू शकलेले नाही. नंतर त्यांना इंग्लंडमधील केंब्रीज येथे पुढील शिक्षणाची संधी मिळाली.

विश्वास सावरकर यांचे शालेय शिक्षण रमणबाग, पुणे येथे व महाविद्यालयीन शिक्षण नौरोसजी वाडिया महाविद्यालयात झाले. त्यांनी रसायन, पदार्थविज्ञान व भूगर्भशास्त्रात पदवी मिळवली. त्यानंतर १९६६ मध्ये त्यांनी डेहराडून येथून इंडियन फॉरेस्ट कॉलेजमध्ये पुढील शिक्षण घेतले. याच महाविद्यालयाचे नाव आता इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी झाले आहे. मार्च १९६८ मध्ये या संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून ते नाशिक येथे नाशिक वन विभागात सह वन संरक्षक (असिस्टंट कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट) या पदावर रुजू झाले. विश्वास सावरकर १९६९मध्ये सरोज दोरायस्वामी यांच्याशी विवाहबद्ध झाले.

बारा वर्षे महाराष्ट्र राज्यात वनाधिकारी म्हणून काम केल्यावर त्यांना केंद्रीय वनसेवेत पाठविण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असताना त्यांनी दोन वर्षे नाशिक, चार वर्षे पुणे येथेही काम केले. या काळात आणखी एका वरिष्ठ सहकाऱ्यांसमवेत त्यांनी मेळघाट जंगलासाठी वन्यजीवन व्यवस्थापनाचा आराखडा तयार केला. मेळघाट हे वाघांसाठी संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. भारतात त्यावेळी ‘वाघ संरक्षित’ तयार होत असलेल्या नऊ वेगवेगळ्या आराखड्यांपैकी हा एक होता. अशा प्रकारचे काम भारतात पहिल्यांदाच होत होते. या त्यांच्या कामाचे केंद्र व राज्य सरकारकडून खूप कौतुक झाले.१९७४-७९ या काळात नंतर त्यांनी अमरावती विभागातील परतवाडा येथील मेळघाट प्रकल्पात पण काम केले. या वेळेस विश्वास सावरकरांना विशेष प्रशिक्षणासाठी डेहराडून येथेही पाठविण्यात आले होते.

१९७९ मध्ये केंद्र सरकारच्या सेवेत पाठविण्यात आल्यानंतर प्रथम वरिष्ठ संशोधन अधिकारी म्हणून ते  डायरेक्टोरेट ऑफ वाइल्ड लाइफ रिसर्च अँड एज्युकेशन या संस्थेत रुजू झाले. याच दरम्यान रेडिओ टेलिमेट्रीच्या साहाय्याने प्राण्यांचा माग काढणे, वाघ, जंगली हत्ती व इतर अनेक प्राण्यांना रसायनांचा वापर करून पकडणे व हाताळणे या गोष्टींचेही प्रशिक्षण त्यांनी घेतले. विश्वास सावरकर यांनी इटलीतील रोम येथेही कॉम्प्युटराइज्ड जिऑग्राफिक इन्फर्मेशन सिस्टिमचेही प्रशिक्षण घेतले.

त्याचवेळेस मेळघाट येथील प्रकल्पाला दहा वर्षे झाल्याच्या निमित्ताने २३ डिसेंबर १९८३ ला व्याघ्र प्रकल्पाला दिलेल्या अतिविशिष्ट सेवेबद्दल विश्वास सावरकरांना पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

१९८२ मध्ये डि.डब्ल्यू.आर.ई.चे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये रूपांतरण झाले. ही संस्था भारतीय शासनाच्या पर्यावरण व वन मंत्रालयांतर्गत स्वायत्त संस्था म्हणून १९८४ मध्ये जाहीर करण्यात आली. तेव्हा वन्यजीव व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमाचे प्रमुख म्हणून  सावरकर यांची नेमणूक झाली. त्या अंतर्गत १९८४ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या फेलोशिपवर त्यांना वन व्यवस्थापनाच्या पुढील शिक्षणासाठी अमेरिकन विद्यापीठात पाठविण्यात आले. या वर्षात त्यांना अमेरिकन वन विभागासोबत प्रत्यक्ष जंगलात काम करण्याचा अनुभव घेता आला.

त्यानंतर १९९२ मध्ये अमेरिका व भारत यांच्या संयुक्त प्रकल्पात काम करताना त्यांनी मोठ्या भूभागावर जैवविविधतेचे व्यवस्थापन या प्रकल्पात काम केले. याच प्रकारच्या प्रकल्पासाठी त्यांनी नंतर मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया व ऑस्ट्रेलिया येथेही प्रकल्पाचे नेतृत्व केले. या त्यांच्या कामामुळे दक्षिण आशिया भागात भारतीय वन्यजीव  संस्था, वन्यजीव व्यवस्थापन, प्रशिक्षण व संशोधन या क्षेत्रात अग्रगण्य म्हणून मान्यता पावली. १९९५ मध्ये श्रीलंकेतील वन्य जीव संरक्षणासाठी तेथील विभागाचे दृढीकरण व या क्षेत्रात काम करणार्‍या लोकांसाठी प्रशिक्षक यासाठी विश्वास सावरकर यांची नेमणूक झाली. १९९६ मध्ये सहा वर्षांसाठी भारत व अमेरिका यांच्यात वन्यजीव संरक्षण व जैवविविधता संरक्षणासाठी महत्त्वाचा प्रकल्प करार झाला. यात भारतातर्फे विश्वास सावरकर यांनी नेतृत्व केले. त्यामध्ये जैवविविधतेसाठी मोठ्या भूभागाच्या व्यवस्थापनासाठीचे तत्त्व व दृष्टिकोन ठरविण्यात आले. त्याचा आजही विविध ठिकाणी उपयोग केला जातो.

दक्षिण आफ्रिकेतील काही हिमालयीन तहार जातीच्या प्राण्यांना भारतात परत आणण्यासाठी २००१ मध्ये विश्वास सावरकरांची नेमणूक झाली.नॉर्वे येथील कृषी विद्यापीठ व भारतीय वन्यजीव  संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने काही अभ्यासक्रम सुरू करण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे.

१९९८ ते २००१ पर्यंत त्यांनी भारतीय वन्यजीव  संस्थेचे सह प्रमुख म्हणून काम पाहिले. २००१-२००२ ते या संस्थेच्या वन्यजीवशास्त्र शाळेचे पहिले अधिष्ठाता म्हणून निवडले गेले. त्यानंतर २००३ मध्ये ते निवृत्त होईपर्यंत त्यांनी या संस्थेचे  प्रमुख संचालक म्हणून काम पाहिले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी पॅलेस्टाईन, तुर्कस्थान, अफगणिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश, चीन, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम, लाओस पीडीआर व मॉरिशस यासारख्या अनेक देशांतील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण केले.

दुधवा राष्ट्रीय वन, उत्तर प्रदेश येथील पर्यावरण विषयक अनेक संशोधन प्रकल्पात त्यांचा सहभाग होता. तसेच याच उद्यानातील पाणघोडा प्रकल्प, बिहार, उत्तर प्रदेश व बंगालमधील उंच गवत क्षेत्र, भारतीय कोल्हा प्रकल्प, सातपुड्यातील जैवविविधता प्रकल्प यासारख्या अनेक प्रकल्पातही त्यांचा सहभाग होता. त्यांचे अनेक संशोधन पर लेखही प्रसिद्ध झाले आहेत. स्वेच्छानिवृत्तीनंतरही विश्वास सावरकर कार्यरत आहेत. २००४ च्या दरम्यान मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली याच्या आसपास मोठ्या प्रमाणावर बिबट्याने हल्ले केले. याचा अभ्यास करून उपाय सुचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विश्‍वास सावरकरांची नियुक्ती केली होती. त्यांनी दिलेल्या सूचना नंतर यशस्वीपणे अमलात आणल्या गेल्या.

‘गाईड फॉर प्लॅनिंग वाईल्डलाइफ मॅनेजमेंन्ट इन प्रोटेक्टेड एरियाज अन्ड मॅनेजड् लॅन्डस्केप’ हे मार्गदर्शक पुस्तक त्यांनी २००५ मध्ये लिहिले. २००५ पासून त्यांनी प्रशिक्षण, संशोधन व अकादमीत काउन्सिलचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. २००४-२००५ मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ मध्ये बदल सुचविणाऱ्या समितीचे ते सभासद होते. २००६-०७ मध्ये जागतिक बँकेतर्फे सातपुडा जंगलातील जैवविविधता संरक्षण समितीचे ते सदस्य होते. महाराष्ट्रातील ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्याची सीमा आखणी करणार्‍या समितीचे २००७-०८ मध्ये अध्यक्ष होते. सध्या विश्वास सावरकर मध्य प्रदेशातील सहा व्याघ्र प्रकल्पांच्या समितीचे अध्यक्ष आहेत. तसेच महाराष्ट्र व अंदमान निकोबारच्या राज्य वन्यजीव सल्लागार समितीचे सदस्य आहेत. डेहराडून येथील डि.जी.एन.एफ.ए.मध्ये विविध अभ्यासक्रमात व्याख्याते म्हणूनही ते काम पाहतात. पुणे येथील भारती विद्यापीठाच्या पर्यावरण शिक्षण व संशोधन संस्थेत पदव्युत्तर विद्यार्थ्यांनाही ते मार्गदर्शन करतात.

- आशा बापट

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].