Skip to main content
x

इंगळे, केशव गुंडूबुवा

केशव गुंडूबुवा इंगळे यांचा जन्म फलटण येथे झाला. त्यांच्या घराण्यात तीन पिढ्यांचा संगीताचा वारसा होता. त्यांचे आजोबा भिकूबुवा व वडील गुंडूबुवा हे औंध संस्थानात दरबार गायक होते. गुंडूबुवा यांचा जन्म १८७६ साली फलटण येथे झाला. तेे गायनाचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे पहिल्या फळीचे शिष्य होते. ते आपले वडील भिकूबुवा यांच्या पश्चात औंध संस्थानात दरबार गायक बनले व तेथे १९१८ पर्यंत होते. नंतर  त्याच साली त्यांनी सांगलीत स्वत:चे संगीत विद्यालय काढले, ज्याचे उद्घाटन खुद्द बाळकृष्णबुवांच्या हस्ते झाले होते. मात्र ५-६ महिन्यांनी त्यांनी सांगली सोडली व ते मुंबईस आपले गुरुबंधू विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या गांधर्व महाविद्यालयात गायन शिक्षक झाले. वर्षभरात पुन्हा सांगलीस परतून त्यांनी दुसरे गुरुबंधू अनंत मनोहर जोशी यांसह संगीत विद्यालय चालवले. मग १९२१ ते १९२८ या काळात ते सांगली संस्थानाचे दरबार गायक होते. त्यांनी १९२८ साली पुन्हा सांगलीत ‘बाळकृष्ण संगीत विद्यालय’ सुरू केले, तथापि १८ डिसेंबर १९२८ रोजी सांगली येथे त्यांचे निधन झाले.

गुंडूबुवांना बाळकृष्णबुवांकडे अस्सल ग्वाल्हेर गायकीची तालीम मिळाली होती. त्यांचा आवाज विशेष चांगला नसल्याने मैफलीचे गवई म्हणून त्यांचा खास लौकिक नसला तरी एक गायनगुरू म्हणून त्यांनी चांगले कार्य केले. त्यांच्या प्रमुख शिष्यांत संगीतशास्त्रकार ग.ह. रानडे, बळवंतराव सहस्रबुद्धे व चिंतामण यज्ञेश्वर जोशी यांचा उल्लेख होतो. आपल्या दोन्ही मुलांसही त्यांनी गायनात चांगले तयार केले होते.

केशव इंगळे यांनी १९०९ ते १९३१ हा जडण-घडणीचा काळ औंध व सांगली येथे व्यतीत केला. ते १९२६ साली मॅट्रिक झाले, तर १९२७ साली त्यांनी सांगली येथे गणेशोत्सवात पहिली मैफल सादर केली. ते १ मार्च १९३१ पासून १९५० पर्यंत  इचलकरंजी संस्थानचे दरबार गायक म्हणून कार्यरत होते. इचलकरंजीचे संस्थानिक महाराज नारायणराव घोरपडे यांनी १९३० साली संगीतशाळा स्थापन केली होती. या व अन्य शाळांत संगीत शिकवणे व रोज रात्री एक-दीड तास महाराजांस गायन ऐकवणे असा त्यांचा दैनंदिन कार्यपाठ असे. महाराज नारायणराव घोरपडे हे व त्यांचे अन्य नातलगही त्यांच्याकडे संगीत शिकत.  त्यांच्या एकंदर संगीतकार्यास महाराजांचे प्रोत्साहन व मोलाचा सहयोग लाभला.

केशव इंगळे यांनी आपल्या वडिलांनी स्थापन केलेल्या बाळकृष्ण संगीत विद्यालयाची पुनर्स्थापना १९४७ साली केली. वडिलांकडून वारशाने मिळालेली ग्वाल्हेर गायकी व आवाजाची अनुकूलता यांमुळे त्यांनी मैफलीचे गायक म्हणूनही नाव कमवले. सोलापूर संगीत परिषद (१९३३), म्हैसूर दरबारचा दसरा उत्सव (१९३५), मॉरिस म्युझिक कॉलेजने भरवलेली लखनौ संगीत परिषद व मुंबईतील महाराष्ट्र संगीत परिषद (१९३६), अजमेर परिषद (१९४५), जालंधरचा हरवल्लभ संगीत मेळा (१९५८) अशा समारोहांत त्यांचे गायन झाले. त्यांनी १९३८ साली दक्षिण आफ्रिकेत यशस्वी संगीत दौराही केला.

ते १९४२ पासून तत्कालीन मुंबई आकाशवाणीवरून गायन सादर करू लागले. त्यांनी १९४२ सालीच पुण्यात त्यांच्या वडिलांचे गुरुबंधू पं. यशवंतबुवा मिराशी यांचेही मार्गदर्शन घेतले व त्या काळात विनायकराव पटवर्धन यांनी पुण्यात त्यांच्या काही मैफली केल्या.

ते इचलकरंजी संस्थानातील दरबार गायकपदाचा राजीनामा देऊन १९५० साली पुण्यात स्थायिक झाले व तेथे त्यांनी संगीत विद्यालय सुरू केले. त्याचे उद्घाटन महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या हस्ते झाले होते. त्यांचे १९५० पासून १९६५ म्हणजे मृत्यूपर्यंत पुण्यातच वास्तव्य होते. एक गायनगुरू म्हणून ते कार्यरत असताना गांधर्व महाविद्यालय मंडळ व भारतीय संगीत प्रसारक मंडळीचे परीक्षक म्हणूनही ते काम करत. त्यांच्या योगदानाबद्दल गांधर्व महाविद्यालय मंडळाने १९६१ साली कोल्हापूर येथे मानपत्र देऊन त्यांचा सन्मान केला.

एक गायक व संगीत शिक्षक या भूमिकांव्यतिरिक्त संगीतविषयक लेखक म्हणूनही महाराष्ट्रातील संगीतक्षेत्रास केशव इंगळे यांचे मोलाचे योगदान लाभले. ‘गोखले घराने की गायकी’ हा आपला पहिला ग्रंथ एप्रिल १९३५ साली त्यांनी प्रसिद्ध केला. लखनौचे गवय्ये झाएन-उल्-अबदीन खाँ यांचे शिष्य असणार्‍या महादेवबुवा गोखले यांच्यामुळे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून महाराष्ट्रात ‘गोखले घराने की गायकी’ म्हणून रूढ झालेल्या गायन परंपरेतील दुर्मिळ बंदिशी, रागवाचक दोहे यांचा संग्रह असलेले बाड त्याच घराण्यातील सदाशिवबुवा गोखले यांच्याकडून केशव इंगळेंना प्राप्त झाले. या बाडाच्या आधारे त्यांनी हा ग्रंथ सिद्ध केला. बाळकृष्णबुवांच्याही आधीपासून महाराष्ट्रात प्रचलित झालेल्या व नंतर लुप्त झालेल्या या परंपरेच्या जतनीकरणाचे महत्त्वाचे कार्य त्यांनी या ग्रंथाद्वारे केले.

केशव इंगळेंनी लिहीलेले व जानेवारी १९३६ साली प्रकाशित झालेले दुसरे पुस्तक म्हणजे ‘पंडित गायनाचार्य कै. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे चरित्र’ हे होय. बाळकृष्णबुवांचे पहिले सविस्तर व खात्रीशीर चरित्र म्हणून याचे महत्त्व मोठे आहे.

महाराष्ट्रात ख्यालगायकी रुजली, मात्र ख्यालाच्या बंदिशी ज्या भाषेत असतात, त्या ब्रजसारख्या बोलींचा इकडील गवय्यांचा अभ्यास नसल्याने त्यांचे शब्दोच्चार अशुद्ध असतात, बंदिशींत पाठभेद होतात हे लक्षात घेऊन केशव इंगळेंनी १९५४ साली ‘गीतबोधिनी’ हे पुस्तक लिहिले. यात त्यांनी अनेक खानदानी बंदिशींच्या ब्रज व अन्य बोलीभाषांतील काव्यांचे सार्थ व शुद्ध पाठ  दिले. या तीन ग्रंथांबरोबरच त्यांनी संगीत विषयक अनेक स्फुट लेख तत्कालीन मासिकांत लिहिले. त्यांचा संगीताचा वारसा त्यांचे पुत्र माधव व नातू मिलिंद इंगळे यांनी चालू ठेवला आहे.

— चैतन्य कुंटे

इंगळे, केशव गुंडूबुवा