Skip to main content
x

पटवर्धन, दत्तात्रेय वासुदेव

पटवर्धन, गुरुदेवजी

        त्तात्रेय वासुदेव पटवर्धन यांचा जन्म दक्षिण महाराष्ट्रातील मिरज संस्थानात झाला. त्यांचे पूर्वज राजांकडे पौरोहित्य करत असत. घराणे वैदिकांचे असल्यामुळे घरात संस्कृत अध्ययनाची परंपरा होती. त्यांनी संस्कृत शिकून गुरुजनांकडून वेदविद्या ग्रहण केली. कुशाग्र बुद्धीमुळे ते लवकरच घनपाठी झाले.
      माधवजींच्या मंदिरात पटवर्धन यांचे संगीत शिक्षणही चालले होते. मिरजेच्या रामभाऊ गुरवांकडे ते तबल्याचे शिक्षण घेत होते. पुढे त्यांनी दक्षिण हैदराबादचे रहिवासी पं. वामनराव चांदवडकर यांच्याकडे पखवाजाची रीतसर तालीम घेतली. अभ्यास आणि सराव या दोन्हींसाठी भरपूर कष्ट घेतले. नंतर ते ‘मृदंगाचार्य’ या पदवीने अलंकृत झाले.
     पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे ते मित्र होते. पं. विष्णू दिगंबरांनी ५ मे १९०१ रोजी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. तेव्हापासून दत्तात्रेय पटवर्धन तेथे उप-प्राचार्य म्हणून कार्यरत होते. ते महाविद्यालयात तबला व मृदंग या दोन्हींचे शिक्षण देत असत. त्यांचे पुष्कळ विद्यार्थी पुढे ख्यातनाम झाले. याच सुमारास त्यांना ‘गुरुदेवजी’ ही पदवी बहाल झाली.
    भारतातील विभिन्न प्रांतांतील संगीत परिषदांमध्ये मोठमोठ्या कलाकारांची तबला-संगत ते कौशल्याने करीत. यात गायकांप्रमाणे वादक कलाकारांबरोबरही ते तबला वाजवत. त्याचप्रमाणे स्वतंत्र वादनातही त्यांचे नैपुण्य वादातीत होते. पं. पलुस्करांबरोबर ते नेहमी साथ करत. त्यांनी ‘तबलातरंग’ हा नवीन उपक्रम त्या काळी केला आणि तज्ज्ञांनी त्यांची खूप प्रशंसा केली. गुरुमुखी शिक्षणाप्रमाणेच पुस्तकांच्या माध्यमातही ज्ञान द्यायला हवे ही गोष्ट ध्यानी घेऊन १९०३ साली त्यांनी ‘मृदंग तबला वादन पद्धती’ हे पुस्तक लिहिले. पुढे त्याची द्वितीय आवृत्ती त्यांचे पुतणे पं. विनायकराव पटवर्धनांनी १९३८ साली आणि नंतर १९८२ साली संगीत नाटक अकादमीने प्रसिद्ध केली.
       ते १९१४ सालच्या आसपास लाहोरहून मिरजेस परत आले. नानासाहेब पानसे यांचे शिष्य चांदवडकर यांच्याकडून घेतलेली विद्या शिष्यांना ते शेवटपर्यंत देत होते. त्यांचे १९१७ साली साथीच्या रोगाने अवघ्या सत्तेचाळिसाव्या वर्षी निधन झाले.

डॉ. सुधा पटवर्धन

पटवर्धन, दत्तात्रेय वासुदेव