हिंदुस्थानी रागसंगीताच्या गायिका, लेखिका व गुरू. राजस्थानातल्या कोटा शहराजवळच्या लाखेरी गावी सातवीपर्यंतचे शालेय शिक्षण झाल्यानंतर जयपूरजवळच्या बनस्थाली विद्यापीठात आठवी ते पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. शाळेतच कथक नृत्य, तबला याचे प्राथमिक धडे मिळाले. तसेच उ. इमामुद्दिन डाग यांचेकडे धृपद-धमारचे शिक्षण घेतले. शालेय वार्षिकोत्सवात डॉ. राजेंद्र प्रसाद, पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. सी.डी. देशमुख इ. व्यक्तींसमोर प्रस्तुतीकरण केले. विवाहानंतर आपले सासरे व ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक गुरू पं. विनायकराव पटवर्धन यांच्याकडेही संगीतशिक्षण झाले. अनेक बंदिशींची रचना केली. पैकी ‘रागविज्ञान - भाग ७ ’मध्ये काही समाविष्ट. १९७४ पासून ‘पं. विष्णू दिगंबर संगीत विद्यालया’च्या प्राचार्या. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून ‘साहित्य पारंगत’ (एम.ए. समकक्ष पदवी, १९८५) घेतली. कालिदासांच्या आणि इतर कवींच्या संस्कृत काव्याचे, तसेच प्रज्ञाभारती श्री. भा. वर्णेकर यांच्या ‘श्रीराम संगीतिक’ या काव्याच्या गायनाचे प्रस्तुतीकरण केले. डॉ. ग. ह. तारळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामसंगीताचे प्रयोग केले. रागसंगीताच्या मराठी रचना, ग्वाल्हेर घराण्यातील तराणा यांच्या विशेष मैफिलींची प्रस्तुती. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या ‘संगीत कला विहार’ मासिकाचे ५ वर्षे संपादन केले व सध्या संगीत मासिक, हाथरस याच्या मानद संपादिका म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. सुधा पटवर्धन