Skip to main content
x

रानडे, अजित शंकर

       अजित शंकर रानडे यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांनी दादर येथे शालेय शिक्षण आणि मुंबई येथील विल्सन महाविद्यालयामधून उच्च शिक्षण घेतले. त्यांनी १९८६मध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून बी.व्ही.एस्सी.अँड ए.एच. ही पदवी प्राप्त केली. बा.सा.को.कृ.वि.तून त्यांनी प्रथम कुक्कुटशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि नंतर याच विषयात पीएच.डी. ही पदवी विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत प्राप्त केली. त्यांनी कुक्कुट-पालनशास्त्रात एम.एस्सी.च्या सुमारे ५० विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून आणि ३८ विद्यार्थ्यांना सहमार्गदर्शक म्हणून तसेच पीएच.डी. पदवीच्या ३ विद्यार्थ्यांना मुख्य मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले आहे.

       डॉ. रानडे राष्ट्रीय खाद्य घटक प्रमाणके निश्‍चितीकरण समितीचे तसेच अखिल भारतीय कुक्कुट-पालनशास्त्र संघटनेचे सदस्य होते. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर तज्ज्ञ म्हणून काम केले. महाराष्ट्र शासनाने राज्यात कुक्कुट विकास मंडळ स्थापन करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे ते सदस्य राहिले आहेत. ते अखिल भारतीय पशुवैद्यकीय अनुसंधान संस्थेच्या केंद्रीय पक्षी संशोधन संस्थेच्या संशोधन सल्लागार समितीचे आणि हैदराबाद येथील कुक्कुट संस्थेच्या प्रकल्प संचालनालयाचे सदस्य राहिले . महाराष्ट्रात २००६मध्ये कोंबड्यांमध्ये उद्भवलेल्या बर्ड फ्ल्यू रोगाच्या साथीच्या वेळी डॉ. रानडे यांनी रोग होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी व प्रादुर्भाव झाल्यावर करावयाच्या उपाययोजना याविषयी तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी पत्रकार परिषदांतून, दूरदर्शनवरील कार्यक्रमांद्वारे तसेच आकाशवाणीवरील व इतर भाषणांद्वारे या रोगाबाबत शास्त्रीय माहिती प्रसारित करण्याचे काम केले.

       डॉ. रानडे यांना पदव्युत्तर पदवी स्तरासाठी केलेल्या उत्कृष्ट प्रांतीय संशोधनपर कार्यासाठी १९८६मध्ये महात्मा जोतिबा फुले संशोधन पारितोषिक देण्यात आले. त्यांना १९८६-८७मध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे हीरक महोत्सव प्रासंगिक पारितोषिक प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरील कुक्कुट-पालनशास्त्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि संशोधनाबाबत त्यांना भारतीय संयुक्त पशुखाद्य निर्मिती संघटनेकडून पारितोषिक देऊन गौरवले.

- संपादित

रानडे, अजित शंकर