Skip to main content
x

होळकर, नाथसाहेब बळीबा

       नाथसाहेब बळीबा होळकर हे मौजे होळ (सदोबाची वाडी), ता. बारामती, जि. पुणे (महाराष्ट्र) येथील रहिवाशी होते. एक उत्कृष्ट शेतकरी असलेल्या नाथसाहेब यांनी त्या काळी तज्ज्ञांच्या सहकार्याने  शेती करण्याच्या पद्धतीत सुधारणा केल्या. पीकपूर्व नियोजन म्हणून ते जमिनीची मशागत बैलाने करत असत. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जमिनीमध्ये आधी द्विदल पिके (उदा. हरभरा किंवा तागाचे उत्पादन) बेवड म्हणून उपयोगात आणत असत. त्यामुळे जमिनीचा नैसर्गिक पोत वाढल्याचे तज्ज्ञांचे मत झाले होते.

       होळकर हे शेतीसाठी प्रामुख्याने शेणखत वापरत. तसेच, त्यांच्याकडे स्वतःच्या मेंढ्याही होत्या. मेंढ्यांचे मूत्र व लेंड्या यांची खतमात्रा जमिनीत मिसळावी, यासाठी  ते मेंढ्यांना जमिनीवर बसवत असत. ऊस पीकासाठी ते प्रामुख्याने शेंगदाणा पेंड, एरंडी पेंड यांचा वापर करत असत. एकदा प्रयोग म्हणून त्यांनी मासळी खताचाही वापर केला; पण त्यामुळे कुत्री, मांजरे यांचा उपद्रव वाढू लागला, म्हणून तो प्रयोग त्यांना सोडून द्यावा लागला. नैसर्गिक खतांवर होळकर यांचा भर होता. रासायनिक खतांचा वापर ते जुजबी करत असत. ऊस ३ ते ४ महिन्यांचा झाल्यावर उसबांधणीच्या वेळी ते रासायनिक खते वापरत असत, मात्र पुन्हा रासायनिक खत वापरत नसत. त्यामुळे उसाची प्रत सुधारत असे.

       ट्रॅक्टरच्या खूप खोल मेहनतीमुळे कसलेली माती खोल जाते व न कसलेली वर येते, म्हणून होळकर शेतीची कामे बैलानेच करत असत, त्यामुळे ट्रॅक्टरने होणारा तोटा टाळता येत असे. मात्र, अंतर्गत मशागतीसाठी बैलाचाही वापर त्या काळी नव्हता, म्हणून होळकर मजुरांच्या सहकार्याने अंतर्गत मेहनत करून घेत असत.

       उसाची अंतर्गत मशागतही ते मजुरांच्या सहकार्याने करत असत. त्यामध्ये प्रामुख्याने रेघ मारणे, बाळबांधणी, उतरणी व पक्की बांधणी करत असत. या मेहनतीमुळे अनावश्यक उसाच्या (जारवा) मुळ्यांची तूट होऊन  पांढऱ्या मुळांची वाढ होई. हे त्यांचे स्वतःचे संशोधन होते. त्याचा परिणाम असा होत असे की, उसाला कांड्या फुटण्यास व उसाची वेगाने वाढ होण्यास खूपच मदत होत असे.

       पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा येथील ऊस संशोधनतज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून व त्यांच्या मार्गदर्शनानुसार ते उसाचे बेणे ठरवत असत. त्या वेळी ‘को. ४१९’ व नंतर ‘को. ७४०’ या बेण्यांचा वापर त्यांनी केला. त्यात मुख्यतः ऊस लावण्यापासून ते ऊस तोडेपर्यंत वरिष्ठ कृषि-अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन त्यांनी सतत घेतले व ते त्यांच्याबरोबर सतत चर्चा करत असत.

       शेतकी अधिकारी व तज्ज्ञ यांच्याबरोबर सतत संपर्कात राहून त्यांनी सूर्यप्रकाशाची दिशा, वार्‍याची दिशा, जमिनीचा उतार यांचा योग्य मेळ घालून, उसाची लागवड करण्याचे तंत्र अवलंबले, त्यामुळे ऊस उत्पादन वाढले. त्यांचे स्वतःचे गुळाचे गुऱ्हाळ असल्याने त्यांनी ऊस तोडणी लवकर किंवा उशिरा केली नाही. उसाची पक्वता लक्षात आल्यावर ते उसतोडणीला सुरुवात करत.

       त्या काळी भरपूर पाऊस पडत असे; पण तरीही होळकर पाण्याचा वापर काटकसरीनेच करत असत. इतर शेतकरी ऊसाच्या सऱ्या तुडुंब भरत, मात्र नाथसाहेबांनी स्वतःच्या संशोधनात पाण्याचा निचरा झालाच पाहिजे, याचा विचार कटाक्षाने केला. पाणी देण्यासाठी विद्युत मोटारीचा ते वापर करत.

        नाथसाहेब हे केवळ हाडाचे शेतकरीच नव्हते; तर गावापासून तालुक्यातील सर्व समाजघटकांशी त्यांचा दांडगा संपर्क होता. शिक्षण कमी असूनसुद्धा डॉक्टर, वकील, शिक्षक अशा अनेक बुद्धिवंतांशी त्यांची घट्ट मैत्री होती. गावामध्ये अडचणीच्या काळात मदत करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा होता. महाराष्ट्रामध्ये त्या वेळी फक्त नीरा पेठेत (ता. पुरंदर, जि. पुणे) श्रावण ते अश्‍विन, म्हणजे दिवाळी अखेर गुळाची आवक होत असे. त्या वेळी महाराष्ट्र व गुजरातमध्ये नाथसाहेबांनी उत्पादित केलेल्या गुळाची मागणी त्यांच्या नावाने व्यापारी करत असत. हा त्यांचा ‘ट्रेडमार्क’च होता.

       १९५९-६० साली उच्चांकी ऊस उत्पादनाबद्दल दिल्ली येथे भारताचे तत्कालीन पंतप्रधान मा. पंडित नेहरू यांच्या शुभहस्ते त्यांना गौरवण्यात आले. पंडितजींनी हस्तांदोलन करून होळकर यांना कृषिपंडित ही पदवी दिली. त्या काळी एका साध्या शेतकर्‍याने पंतपंधानांबरोबर हस्तांदोलन करून, त्यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ होती. हा त्यांनी ऊस पिकात केलेल्या प्रयत्नांचाच गौरव ठरला. याचबरोबर १९५९ साली त्यांनी राज्यस्तरीय गुळ उत्पादन स्पर्धेत भाग घेऊन पहिले बक्षीस मिळवले होते. त्या वेळी त्यांचे एकरी गुळाचे उत्पादन (३० ते ३३ कि.ग्रॅ.ची एक याप्रमाणे) ३२५ ते ३५० ढेपा एवढे होते.

- संपादित

होळकर, नाथसाहेब बळीबा