Skip to main content
x

पंडित, देवकी सुधाकर

देवकी सुधाकर पंडित यांचा जन्म व शिक्षण मुंबईत झाले. त्यांची गाण्याची साधना लहानपणापासूनच सुरू झाली. त्यांच्या आई उषा पंडित या गायिका असल्याने गाण्याचे सुरुवातीचे संस्कार त्यांनीच केले.

वयाच्या नवव्या वर्षी देवकी पंडित यांनी पहिली मैफल सादर केली. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका पॉलिडॉर कंपनीतर्फे प्रसिद्ध झाली. त्यांना अत्यंत प्रतिष्ठित अशी ‘केसरबाई केरकर शिष्यवृत्ती’ मिळाली.

पहिली काही वर्षे देवकी पंडित पं. वसंतराव कुलकर्णींकडे शिकल्या. कुलकर्णी यांनीच त्यांना शास्त्रीय संगीताची ओळख करून दिली. वयाच्या अठरा-एकोणिसाव्या वर्षीच त्यांनी भावसंगीत, गझल, दूरदर्शनवरील मालिकांची शीर्षकगीते, चित्रपटगीते असे सुगम संगीताचे अनेक प्रकार गायला आरंभ केला. १९८६ मध्ये त्यांना ‘अर्धांगी’ या चित्रपटातील गीतासाठी महाराष्ट्र राज्यसरकारचा, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कारही मिळाला. परंतु शास्त्रीय संगीताच्या ओढीमुळे पुढील काही वर्षे त्यांनी किशोरी आमोणकरांकडून मार्गदर्शन घेतले.

त्यानंतरची जवळजवळ अकरा वर्षे गायक, संगीतकार व गुरू असलेल्या पं. जितेन्द्र अभिषेकींकडे देवकी पंडित यांनी शिक्षण घेतले. त्यांच्याकडे शिकताना गाण्याच्या विविध अंगांचे, प्रकारांचे व सादरीकरणाबद्दलचे ज्ञान वाढतच गेले. पं. बबनराव हळदणकरांचेसुद्धा त्या वेळोवेळी मार्गदर्शन घेत असतात.

गाण्याच्या विविध प्रकारांचा सखोल अभ्यास, त्यांची साधना, त्यांवरील पकड आणि उत्कृष्ट सादरीकरण यांमुळेच देवकी पंडित यांचे संगीत क्षेत्रातील वेगळेपण उठून दिसते. शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत, इ. अनेक प्रकार त्या समर्थपणे गातात.

देवकी पंडित गेली अनेक वर्षे देश-विदेशांत आपली कला सादर करीत आहेत. अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या सवाई गंधर्व संगीत महोत्सव, मैहर संगीत महोत्सव, देवगंधर्व संगीत महोत्सव, स्पिरिट ऑफ युनिटी कॉन्सटर्स ऑफ युनिव्हर्सल इंटिग्रेशन इ. महोत्सवांत त्यांना गाण्याचा मान मिळाला आहे.

नौशाद, जयदेव, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, यशवंत देव, पं. शिवकुमार शर्मा, पं. हरिप्रसाद चौरासिया, उस्ताद झाकीर हुसेन, आनंद मोडक, पं. हृदयनाथ मंगेशकर, सुधीर मोघे, अशोक पत्की आणि इतर अनेक संगीतकारांसाठी विविध चित्रपटगीते, गीतमाला (अल्बम्स), दूरचित्रवाणीवरील मालिकांची शीर्षकगीते यांचे, तसेच अनेक कार्यक्रमांतून त्यांनी गायन केले आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारेगम’ या कार्यक्रमात माननीय परीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांनी आराधना महाकाली, रामरक्षा स्तोत्रम्, गणाधीश इ. गीतमालांसाठी संगीत दिग्दर्शनही केले आहे.

त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाचे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचे तीन पुरस्कार (१९८६,२००१, २००२) प्राप्त झाले. तसेच, ‘अल्फा गौरव’ पुरस्कार व मेवाती घराना अवॉर्ड (२००२),आदित्य बिर्ला कला किरण पुरस्कार (२००६) आणि राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते इंडियन म्युझिक अकादमीचे ‘यंग माइस्ट्रो अवॉर्ड’ मिळाले.

मनीषा जोशी

पंडित, देवकी सुधाकर