Skip to main content
x

मिराशी, यशवंत सदाशिव

शवंत सदाशिव मिराशी यांचे मूळ आडनाव पंडित होते; पण घरच्या पिढीजात मिरासदारीमुळे मिराशी हे आडनाव रूढ झाले. त्यांचा जन्म इचलकरंजीला झाला.  यशवंतांच्या बालपणी पं.बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर योगायोगाने त्यांच्या घरासमोर वास्तव्यास होते. यशवंत बाळकृष्णबुवांच्या गाण्याच्या नकला करायचे; पण त्या नकलांमधूनही त्यांची ग्रहणशक्ती तीव्र आहे हे दिसून आले, तसेच त्यांच्या आवाजातील गोडवाही कळून आला.  त्यामुळे बाळकृष्णबुवांचे छोट्या यशवंतांकडे लक्ष गेले आणि त्या नकलांचा राग न मानता आई-वडिलांच्या परवानगीने पं. इचलकरंजीकर त्यांना तालीम देऊ लागले.
ध्रुपद, ख्याल, तराणे, इतर पदे अशी सर्वांगीण तालीम देऊन पं.बाळकृष्णबुवांनी यशवंतांना छान तयार केले. यशवंत मिराशी १९११ साली नाट्यकलाप्रवर्तक मंडळीत दाखल झाले. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, पल्लेदार आवाज, तयारीच्या ताना आणि आत्मसात केलेले अभिनय कौशल्य यांमुळे अल्पावधीतच त्यांनी गायक, नट म्हणून खूप प्रसिद्धी मिळवली. ते १९३२ पर्यंत कंपनीत होते.
नाटक कंपनी सोडल्यावर मिराशीबुवा पुण्यात स्थायिक झाले. कंपनीत असताना त्यांनी तीन-चार शिष्य तयार केले होते. पण आपली गायकी गाणारे आणखी शिष्य असावेत या इच्छेने पुण्यात त्यांनी विद्यादानास सुरुवात केली. राजारामबुवा पराडकर, उत्तुरकर बुवा, पंडितराव नगरकर, यशवंतबुवा जोशी, मालती जोशी, डी. बी. खिरे, राम मराठे, काणेबुवा, सी.आर. व्यास ही त्यांच्या शिष्यांपैकी काही प्रसिद्ध नावे आहेत. पं. द. वि. पलुसकरांनीही त्यांचे मार्गदर्शन घेतले. पं. विनायकबुवा पटवर्धनांनी भारतीय संगीत प्रसारक मंडळातर्फे पं. मिराशीबुवांची पुस्तके छापून ग्वाल्हेर घराण्याच्या चिजांचा संग्रह प्रसिद्ध केला. मिराशीबुवा ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्काराने सन्मानित झाले. त्यांचे पुण्यात निधन झाले.

डॉ. सुधा पटवर्धन

 

मिराशी, यशवंत सदाशिव