Skip to main content
x

तिजारे, रामचंद्र राजेश्वर

भाऊ तिजारे

       रामचंद्र राजेश्वर तिजारे यांचा जन्म नागपूर येथे झाला. ते गुलाबवाले तिजारे म्हणूनही ओळखले जात. त्यांचे शिक्षणही नागपूरलाच झाले. त्यांनी नागपूर येथील कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी) पदवी मिळवली. त्यांच्या नोकरीची सुरुवात कृषी खात्यामधून झाली. कृषी साहाय्यक म्हणून सेवारत असताना त्यांनी एम.एस्सी. पदवी मिळवली. पुढे त्यांची पदोन्नती होऊन त्यांनी १९६३ ते १९६८ या काळात व्याख्याता पदावर काम केले. डॉ.पं.दे.कृ.वि.ची स्थापना झाल्यानंतर ते साहाय्यक प्राध्यापक म्हणून तेथे काम करू लागले. ते १९७१ ते १९८३ या काळात सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करत होते व १९८५मध्ये त्यांची प्राध्यापक म्हणून पदोन्नती झाली.  ते ३० एप्रिल १९८५ रोजी सेवानिवृत्त झाले. संपूर्ण विदर्भात गुलाबतज्ज्ञ व द्राक्षगुरू म्हणून ते परिचित होते. त्यांचा शेतकरी वर्गाशी दांडगा संपर्क होता. त्यांनी स्वतःच्या घराच्या गच्चीवर तंत्रशुद्ध पद्धतीने गुलाब लागवड केली. त्यांना गुलाबपुष्प प्रदर्शनात नेहमी बक्षिसे मिळत असत.

       अकोला येथे आल्यावर त्यांनी गार्डन क्लब स्थापन केला व गुलाबप्रेमींशी संपर्क साधून या संस्थेची भरभराट केली. त्यांना नागपूर, अकोला येथे पुष्प परीक्षक म्हणून अनेक वेळा आमंत्रित करत असत. त्यांनी नागपूर आणि अकोला येथील कृषी महाविद्यालयात २०० प्रकारच्या गुलाबाच्या जाती व १०० प्रकारच्या शेवंतीच्या जाती बाहेरून आणून विकसित केल्या. 

       भाऊ तिजारे यांचा विदर्भात द्राक्ष लागवड वाढवण्यात सिंहाचा वाटा होता. त्यांनी दारव्हा, दिग्रस, नागपूर, पुसद, चिखली आणि अकोला या ठिकाणी शेतकऱ्यांना द्राक्ष लागवड करण्यास प्रोत्साहन दिले. पूर्वी संत्रा झाडांना फळ बहार आल्यावर १० ते १२ बांबूंचा आधार द्यावा लागत असे, पण भाऊ तिजारेंनी झाडांना फक्त एका बांबूंचा आधार देण्याची पद्धत शोधून शेतकऱ्यांना आर्थिक मदतच केली.

- डॉ. प्रकाश पुंडलिक देशमुख

तिजारे, रामचंद्र राजेश्वर