Skip to main content
x

फर्नांडिस, जॉन बास्पियन

                मानवाकृतिप्रधान रंगचित्रे, स्थिरचित्रे आणि निसर्गचित्रे या तीनही चित्रप्रकारांवर समान प्रभुत्व असलेले वास्तववादी शैलीत काम करणारे चित्रकार जॉन बास्पियन फर्नांडिस यांचा जन्म बेळगावला झाला. त्यांच्या आईचे नाव ज्युलिएट होते. पत्नीचे नाव अग्नेस. त्यांचे वडील उत्पादनशुल्क निरीक्षक होते. वडिलांची इच्छा होती, की जॉनने एल.एल.बी. करून वकील व्हावे; परंतु जॉन मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय घेऊन कर्नाटक विद्यापीठातून पदवीधर झाले.

घरातून चित्रकलेला पोषक किंवा प्रेरक अशी पार्श्वभूमी नसतानाही जॉनना जात्याच चित्रकलेची बालपणापासून आवड होती. त्यांचे एक मामा व्यवसायाने होमिओपथीचे डॉक्टर असून हौशी चित्रकारही होते. इतकाच काय तो त्यांना चित्रकलेचा कौटुंबिक वारसा लाभला होता.

मोठ्या बंधूंनी जॉन यांची लहानपणापासून  चित्रकलेची आवड आणि गती पाहून त्यांना बेळगावचे प्रसिद्ध चित्रकार के.बी.कुलकर्णी यांच्या ‘चित्र मंदिर’ कलाशाळेत दाखल केले. वयाच्या तेराव्या वर्षापासून सलग नऊ वर्षे जॉन यांनी के.बीं.च्या सान्निध्यात चित्रकलेची साधना केली. जॉन हा के.बी.कुलकर्णींचा आवडता विद्यार्थी होता.

पुढे चित्रकलेसाठी जॉन मुंबईत आले. मुंबईत ‘इंटर पब्लिसिटी’ या जाहिरात कंपनीत त्यांनी काही काळ  इलस्ट्रेटर म्हणून काम केले. तसेच नवनीत प्रकाशनाच्या शालेय व लहान मुलांच्या पुस्तकांसाठीदेखील त्यांनी भरपूर रेखाचित्रे काढली. काही कंपन्यांच्या दिनदर्शिकांसाठी त्यांनी चित्रे काढली होती. मानवी देह व निसर्गातील आकर्षकता व्यक्त करणारी त्यांची चित्रशैली उपयोजित कलेच्या जगात लोकप्रिय ठरली.

त्यांनी पेन्सिल, चारकोल, जलरंग, तैलरंग आणि खडू अशा सर्व माध्यमांतून काम केले. मानवाकृती रंगचित्रे (फिगर पेंटिंग) आणि त्यातही विशेषतः स्त्रियांची व्यक्तिचित्रे त्यांनी जास्त रंगविली. त्यांत वयाने तरुण असलेल्या स्त्रियांच्या अर्धनग्न व नग्न चित्रांचाही अंतर्भाव असे. त्यासाठी मॉडेल म्हणून परिचित मुली व स्त्रिया चित्रकारासमोर बसण्यासाठी आनंदाने तयार होत; कारण फर्नांडिस यांचे व्यक्तिमत्त्व. त्यांचे वैशिष्ट्य असे की, त्यांचे लक्ष केवळसुंदर चित्र काढण्यावरच असे व समोर बसलेल्या व्यक्तीचे रूपांतर ते आकर्षक व आदर्श अशा सौंदर्यपूर्ण स्त्री-प्रतिमेत करीत. त्यामुळेच त्यांची अशी चित्रे प्रेक्षकांनाही आकर्षून घेत. स्त्रीचे सौंदर्यप्रधान, काहीसे मादक आविर्भाव (पोझेस), तसेच वस्त्रप्रावरणांची नाट्यपूर्ण योजना त्यांच्या चित्रात अधिक गोडवा आणणारी असे. अचूक रेखांकन, रंगांची आणि रंगछटांची सतेजता, रंगलेपनातला जोरकसपणा आणि आवश्यक तेथे आकारांचा भरीवपणा त्यांच्या मानवाकृतिप्रधान चित्रांतून विशेष जाणवतो.

तैलरंगाइतकीच जलरंग माध्यमाची सहज हाताळणी त्यांच्या व्यक्तिचित्रांत दिसून येते. जलरंगांची पारदर्शकता आणि रंगांचे ओघळ चित्रातील अचूक प्रमाणबद्धतेमुळे सहजप्राप्त वाटतात. चित्रांतील रेखांकनापेक्षा घनआकारांकडे (मास) त्यांचे विशेष लक्ष असे.

के.बीं.च्या चित्र मंदिरातून कलाशिक्षण घेतले तरी त्यांच्या चित्रांवर, विशेषतः मानवाकृतिप्रधान रंगचित्रांवर पाश्‍चात्त्य व विशेषतः अमेरिकन चित्रकारांचा प्रभाव जास्त दिसून येतो. इंप्रेशनिस्ट चित्रकार देगा, रेम्ब्रा, निसर्गचित्रकार जॉन पाइक, अ‍ॅण्ड्र्यू ल्यूमी, रिचर्ड स्क्मिथ, डेव्हिड लाफेल हे त्यांचे आवडते चित्रकार होते.

मानवाकृतिप्रधान चित्रे हा जॉन यांचा आवडता विषय असूनही त्यांनी व्यावसायिक व्यक्तिचित्रे रंगविल्याचे कधी ऐकिवात नाही. त्यांनी आर्ट स्कूलचा पदवी अभ्यासक्रम केला नसला तरी त्यांनी अनेक कलाशाळा आणि कलासंस्थांमधून व्यक्तिचित्रे आणि निसर्गचित्रे यांची अनेक प्रात्यक्षिके दिली. कला विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष जिवंत मॉडेलवरून मानवाकृतीचा रेखांकनाद्वारे अभ्यास करावा आणि निवडक स्थळी जाऊन निसर्गचित्रे काढावीत असा त्यांचा आग्रह असे.

चित्रकलेविषयी जॉन यांची स्वतःची काही ठाम मते होती. चित्रातील सौंदर्य हे ‘कलेसाठी कला’ या पठडीतले असावे असे ते म्हणत. चित्रातील विषय किंवा कथनक्षमतेपेक्षा त्यात चिरंतन असे केवळ दृश्य सौंदर्य असावे असे ते मानत. कलाकृती पाहणाऱ्यास  चित्र हे कायम आनंद आणि समाधान देणारे असावे. चित्रांच्या दृश्यमाध्यमातून समग्र दर्शन घडावे, असे ते सांगत.

आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या १९९१ मध्ये झालेल्या अमृत महोत्सवी प्रदर्शनात ड्राय पेस्टल माध्यमातील त्यांच्या पत्नीच्या व्यक्तिचित्राला पारितोषिक प्राप्त झाले. याव्यतिरिक्त कोणत्याही स्पर्धा प्रदर्शनात त्यांनी कधी आपली कलाकृती पाठविली नाही. परंतु १९९१ पासून २००० पर्यंत त्यांनी आपल्या चित्रांची एकल प्रदर्शने आयोजित केली.

आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष (व्हाइस प्रेसिडेण्ट) म्हणून त्यांनी २००० ते २००३ पर्यंत पदभार सांभाळला. आर्ट स्कूलचे अनेक विद्यार्थी त्यांच्या स्टुडीओवर जाऊन स्वतंत्रपणे मार्गदर्शन घेत.

सतत चित्रकलेच्या आणि केवळ चित्रकलेच्या साधनेत रममाण असलेल्या जॉन फर्नांडिस यांना  मूत्रपिंडाच्या (किडनी) आजाराने ग्रसले. शेवटची चार-पाच वर्षे डायलिसिसवर उपचार घेतानादेखील त्यांनी पेंटिंग करणे थांबविले नव्हते. आयुष्याच्या अखेरीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेले असताना त्यांनी खिडकीतून दिसणाऱ्या सूर्यास्ताचे शेवटचे चित्र रंगविले. के.बी.कुलकर्णी सरांच्या या आवडत्या विद्यार्थ्याचा के.बीं.च्या मृत्यूनंतर बरोबर दोन दिवसांनी मृत्यू झाला. नवनीत प्रकाशनातर्फे जॉन फर्नांडिस यांची रेखाचित्रे व चित्रकला माध्यमावरील पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांच्या चित्रशैलीपासून अनेकांनी प्रेरणा घेतलेली दिसते.

- वासुदेव कामत

फर्नांडिस, जॉन बास्पियन