Skip to main content
x

मुळगावकर, रघुवीर शंकर

          घुवीर मुळगावकर देवदेवतांच्या मनमोहक  चित्रांनी धार्मिक व सात्त्विक मनोवृत्तीच्या असंख्य लोकांना मंत्रमुग्ध करणारे चित्रकार म्हणून ओळखले जात. नावीन्याची आवड आणि पाश्‍चिमात्य कलाप्रवाहांचा पगडा भारतातील आधुनिक म्हणवणार्‍या कलावंतांवर १९४०-५० या दशकात प्रामुख्याने दिसून येत होता. त्याच दरम्यान भारतीय संस्कृतीचा विषय घेऊन पवित्र व भावपूर्ण चित्रनिर्मिती करणारे काही कलावंतदेखील होते. अशा काही चित्रकारांमध्ये अग्रक्रमाने घेतले जाणारे नाव म्हणजे चित्रकार रघुवीर मुळगावकर.

रघुवीर शंकर मुळगावकर यांचा जन्म निसर्गसौंदर्याने नटलेल्या गोव्याच्या भूमीत, अस्नोडा येथे झाला. मुळगावकरांचे कुटुंब हे कलाकारांचे-चित्रकारांचे होते. वडील शंकरराव उत्तम चित्रकार होते. त्यांचे मोठे बंधूसुद्धा चित्रकारिता करणारे होते. गोव्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे संस्कार मुळगावकरांवर झाले. लहानपणी वडिलांचे, तसेच शेजारी राहणार्‍या त्रिंदाद मास्तरांसारख्या ज्येष्ठ चित्रकाराचे मार्गदर्शन त्यांना लाभले. त्रिंदाद यांनी मुळगावकरांमधले कलागुण ओळखले व आर्थिक स्थिती बेताची असतानाही त्यांनी वडील शंकररावांना समजावले की, ‘‘हा मुलगा स्वस्थ बसणार नाही. त्याच्यातील चित्रकार मारू नका. एक दिवस असा येईल, की त्याच्या चित्रकारितेमुळे उत्कर्षाचा, यशाचा पाया रचला जाईल.’’ आणि पुढे खरोखरच तसे घडले!

पुढे रघुवीर मुळगावकर मुंबईत आले. प्रसिद्ध चित्रकार एस.एम.पंडित यांच्याकडे ते काही काळ राहिले. शाळेत असताना वयाच्या चौदाव्या वर्षी आपल्या चित्राला पोर्तुगीज सरकारचे बक्षीस मिळवणाऱ्या मुळगावकरांनी चित्रकलेचे शास्त्रशुद्ध व पद्धतशीर असे कोणतेच कलाशिक्षण घेतले नव्हते. फक्त एस.एम.पंडित यांच्याकडची काही काळ केलेली कलासाधना आणि कलेची निसर्गदत्त देणगी हीच त्यांना आयुष्यात मोलाची ठरली.

पंडितांकडे राहत असताना त्यांची प्रत्यक्ष चित्र काढतानाची शैली, ही त्यांना पाहायची होती. पण त्या काळी काही प्रथितयश चित्रकार आपली कामाची पद्धत सहजासहजी दाखवण्यास तयार नसत. मुळगावकरांची उत्सुकता तर शिगेला पोहोचली होती. मग त्यांनी पंडितांचे चरित्र लिहिण्याच्या निमित्ताने त्यांच्या शेजारीच टेबल ठेवण्याची परवानगी मिळवली, जेणेकरून चरित्र लिहिताना, पंडितांकडून माहिती घेता-घेता त्यांचे चित्रकाम बघण्याचीही संधी मिळेल.

पुढे मुळगावकर गिरगावच्या भटवाडीत स्थायिक झाले. त्यांच्या पत्नीचे नाव कला होते. हळूहळू त्यांना पुस्तकांच्या मुखपृष्ठांची कामे मिळू लागली. यातूनच केशव भिकाजी ढवळे, ग.पां. परचुरे, जयहिंद प्रकाशन यांसारख्या प्रकाशन संस्थांशी त्यांचा परिचय झाला. त्यांनी साहित्य क्षेत्रात प्रभाव असणाऱ्या लेखकांसाठी कथाचित्रे आणि मुखपृष्ठे रंगविली. म.ल.सांबारे, बाबूराव अर्नाळकर, आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे, अ.वा.वर्टी, स.कृजोशी, आबासाहेब आचरेकर, बा.द.सातोस्कर इ. लेखकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे, तसेच ‘नंदा’, ‘पैंजण’, ‘धनुर्धारी’, ‘दीपलक्ष्मी’, ‘वसंत’, ‘हंस’, ‘रत्नदीप’ इत्यादी दिवाळी अंकांसह  अनेक मासिके आपल्या कुंचल्याने सजवली.

राजा रविवर्मानंतर देवदेवतांना सुंदर, मनमोहक रूप व व्यक्तिमत्त्व बहाल करण्याचे कार्य मुळगावकरांनी केले आहे. या चित्रांमुळे मुळगावकरांना भरभरून पैसा व प्रचंड कीर्ती मिळवून दिली. त्यांनी जवळपास पाच ते सात हजारांपर्यंत कृष्णधवल व रंगीत चित्रांची निर्मिती केली असावी. अनेक व्यावसायिक संस्था-कंपन्यांच्या दिनदर्शिकांसाठी मुळगावकरांनी चित्रांची निर्मिती केली.

मुळगावकरांच्या चित्रांतील स्त्री-पुरुषांचा मर्यादशील शृंगार आणि स्त्रियांचे सौंदर्य मनमोहक व जिवंत असे. राधा-कृष्ण, लक्ष्मी-विष्णू, राम-सीता, शिव-पार्वती यांच्या अनेक भावमुद्रा; बालरूपातील कृष्ण, शिव, हनुमान; दत्तात्रेय, गणेश, राम यांची अगणित रूपेे; विठ्ठल-रुक्मिणी, सर्व संतपरिवाराची रूपे त्यांनी अशा काही तन्मयतेने चितारली आहेत, की मुळगावकर या दैवीशक्तीशी एकरूप झाले असावेत.

‘रत्नदीप’ मासिकासाठी त्यांनी मुखपृष्ठे, कथाचित्रे व विषयानुरूप सप्तरंगी चित्रे साकारली. पुढे स्वत:च्या ‘मुळगावकर आर्ट स्टूडिओ’चे प्रकाशन म्हणून ‘रत्नप्रभा चित्रांजली’ हा दिवाळी अंक बरीच वर्षे ते प्रकाशित करत असत. उंच, गौरवर्ण, सडपातळ बांधा, स्वच्छ तलम धोतर, रेशमी सदरा, त्यावर चकाकणारी सोनेरी बटणे, रेशमी कोट, डोळ्यांना सोनेरी फ्रेमचा चष्मा; मितभाषी, गंभीर स्वभाव, अत्यंत व्यवहारकुशल, सावध, भरपूर कष्टाची आवड असणारे असे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व होते.

मुळगावकरांचे समकालीन चित्रकार म्हणजे दीनानाथ दलाल. दलालांच्या चित्रांमध्ये शैलीची विविधता आणि प्रायोगिकता अधिक होती. मुळगावकरांच्या चित्रांमधील यथार्थवादी चित्रण अधिक सांकेतिक होते. पण या दोघांनी मराठी समाजाची अभिरुची घडवली.  मुळगावकरांचे कर्करोगामुळे निधन झाले.

- प्रा. सुभाष पवार

 

मुळगावकर, रघुवीर शंकर