Skip to main content
x

रेगे, गजानन एम.

     जाहिरात लेखनकला, व्यावसायिक कार्यपद्धती आणि संकल्पन अशा विविध अंगांनी जाहिरात क्षेत्रात काम करणारे जाहिराततज्ज्ञ गजानन एम. रेगे यांनी १९५३ साली सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमधून पदविका प्राप्त केली. त्यात त्यांचा दुसरा क्रमांक आला. त्यांनी १९५६ मध्ये तत्त्वज्ञान या विषयातील पदवी घेतली आणि १९५८ मध्ये समाजशास्त्र घेऊन ते  एम.ए. झाले.

रेगे १९५८ मध्ये लंडनला गेेले. तिथे त्यांनी वर्षभरात जाहिरातसंस्थेच्या विविध विभागांत प्रशिक्षण घेतले. कॉलेज फॉर द डिस्ट्रिब्युटिव्ह टे्रड्स, लंडन येथे त्यांनी ए.ए.आय.पी.ए.चा अभ्यासक्रम पूर्ण केला. प्रसारमाध्यमे आणि जाहिरातमोहिमांची आखणी, कॉपिराइटिंग आणि जाहिरात व्यवस्थापन यांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवले. ‘पब्लिसिटी अ‍ॅण्ड प्रपोगॅण्डा फॉर सोशल वेल्फेअर इन इंडिया’ या विषयावर त्यांनी पीएच.डी. केली

रेगे यांनी एशियन पेन्ट्समध्ये पब्लिसिटी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले. एशियन पेन्ट्सचा रंगाचा ब्रश व डबा घेतलेला गट्टू नावाचा मुलगा आर.के. लक्ष्मण यांच्या कुंचल्यातून साकारला असला, तरी त्याची मूळ कल्पना रेगे यांची आहे. लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी रंगाचा ब्रश आणि डबा घेतलेला मुलगा एशियन पेन्ट्सच्या जाहिरातींमधून दिसू लागला. त्याला मिळणारा प्रतिसाद जोखण्यासाठी रेगे यांनी त्याच्या नामकरणाची स्पर्धा ठेवली. त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला आणि या प्रतिक्रियांमधून ‘गट्टू’हे नाव निश्चित झाले. त्यामुळे एशियन पेन्ट्सचा काही लाखांमध्ये असलेला खप अल्पावधीतच काही कोटींमध्ये जाऊन पोहोचला. आता हा मॅस्कॉट कंपनीच्या जाहिरातींमधून अदृश्य झाला असला तरी काही काळ तो विशेष गाजला.

रेगे यांनी ‘अ‍ॅडव्हर्टायझिंग आर्ट अ‍ॅण्ड आयडियाज’ आणि ‘द वर्ल्ड ऑफ व्हिज्युअल कम्युनिकेशन’ ही दोन पुस्तके लिहिली. उपयोजित कलेच्या आणि दृक्संवाद कलेच्या विद्यार्थ्यांना आणि अभ्यासकांना ती मार्गदर्शक आहेत. उपयोजित कलेतील पदविकेसाठी कला-संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि मुंबई विद्यापीठाच्या बी.एफ.ए. पदवीसाठी या पुस्तकांना क्रमिक पुस्तके म्हणून मान्यता मिळालेली आहे.

रेगे यांनी आपल्या पुस्तकांमधून आणि कलासंस्थेमध्ये दिलेल्या व्याख्यानांमधून जाहिरात आणि दृक्संवादकलेशी संबंधित संकल्पना, त्याची धोरणात्मक आणि कायदेशीर बाजू, ग्रहकांची मानसिकता आणि जाहिरातींच्या संकल्पनाची, मांडणीची मूलतत्त्वे यांवर भर दिला आणि वैचारिक आशयाचे जाहिरात संकल्पनेत असलेले महत्त्व सांगितले.

जाहिरातकलेच्या उद्देशांची रेगे यांनी व्याख्या केली आहे. त्यानुसार, ‘कोण काय सांगते, कोणत्या माध्यमातून सांगते आणि कोणाला सांगते’, हे महत्त्वाचे आहे. जाहिरातकलेची ही मूलभूत बैठक आहे. मानवी इच्छा-आकांक्षा आणि त्यांना आलेले दृश्य रूप यांची वर्गवारी रेगे यांनी एका कोष्टकात दिली आहे. पैशांची बचत, आकर्षक दिसण्याचा प्रयत्न, प्रेमभावना, सकारात्मक मूल्यकल्पना, उपभोग अशा सतरा प्रकारांपैकी कोणत्याही एका अथवा एकापेक्षा अधिक इच्छा-आकांक्षांना विविध उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये मूर्तरूप दिलेले असते.

रेगे यांनी दृक्संवादकलेच्या उत्स्फूर्त सर्जकतेला आवश्यक असलेली विचारांची शिस्त आणि संकल्पनांची स्पष्टता दिली. त्याचा उपयोग उपयोजित कलेच्या शिक्षणक्रमामध्ये आणि विद्यार्थ्यांना झाला. आज दृक्संवादकलेतील निर्मितीचे मूल्यमापन अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने केले जाते; पण सुरुवातीच्या काळात जाहिरातींच्या सर्जक व्यवसायाची व्याप्ती आणि उद्देश यांचे सम्यक भान गजानन रेगे यांनीच विशेषत्वाने दिले आहे.

- रंजन जोशी, दीपक घारे 

रेगे, गजानन एम.