Skip to main content
x

पलुसकर, विष्णू दिगंबर

पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचा जन्म नारळी पौर्णिमेच्या दिवशी कुरुंदवाड येथे झाला. त्यांचे मूळ आडनाव गाडगीळ असे होते; पण पलुस गावचे म्हणून पलुसकर हे आडनाव प्रचलित झाले. त्यांचे वडील दिगंबर गोपाळ पलुसकर हे कुरुंदवाडचे प्रसिद्ध कीर्तनकार होते. कुरुंदवाडच्या धाकट्या पातीचे राजे श्रीमंत दाजीसाहेब यांचे दिगंबरबुवांवर, त्यांच्या कीर्तनावर फार प्रेम होते. खेरीज त्यांचे चिरंजीव राजपुत्र नानासाहेब आणि लहानगा विष्णू हे समवयस्क असल्याने दोघांचे पालनपोषण, व्रतबंध समारंभ एकत्रच झाले.

बालवयात विष्णू एक हुशार, चुणचुणीत विद्यार्थी होता. शाळेत त्याची प्रगती चांगली असायची. पण १८८७ साली कुरुंदवाडच्या प्रख्यात दत्तजयंतीच्या उत्सवात फटाक्यांच्या दारूने त्याच्या डोळ्यांना इजा झाली आणि श्रीमंत दाजीसाहेबांनी डोळ्यांवर उपचार करण्यासाठी त्यांना मिरजेला पाठविले. डोळ्यांची जखम बरी झाली; पण दृष्टी अधू झाली. आणि यापुढे लिहिण्या-वाचण्याचे काम करता येणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.

या घटनेमागे दैवी संकेत असावा असे पुढे घडलेल्या घटनाक्रमावरून अनेकांचे मत झाले. शालेय शिक्षण सोडून संगीत शिक्षण सुरू करायचे ठरले. मिरजेतही कुरुंदवाडप्रमाणे श्रीमंत बाळासाहेब मिरजकर या संस्थानिकांचा आश्रय लहानग्या विष्णूला लाभला. या बाबतीत ते मोठे सुदैवी ठरले. त्या वेळी मिरज दरबारात पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे गायनाचार्य दरबार गवई होते. तत्कालीन पद्धतीप्रमाणे विष्णू दिगंबर गुरुगृही कामे करीत, गुरुसेवा करीत आणि बाळकृष्णबुवांकडून प्रत्यक्ष तालीम घेत. सवड मिळाली की शिकलेल्या ज्ञानावर मेहनत, उजळणी यांत वेळ खर्च करीत असत. सकाळी स्वरसाधना, नंतर सकाळच्या रागांची मेहनत, दुपारचे भोजन, थोडी विश्रांती, पुन्हा दुपारच्या रागांचे अध्ययन, संध्याकाळी, रात्री मेहनत असा क्रम असे.

पं. बाळकृष्णबुवा रागांचे आलाप, बंदिशी, लयकारी, ताना, सर्वकाही बारकाव्यांसह घोटून घेत. एकट्याने मेहनत करताना विष्णूबुवा एकेक पलटा, तुकडा शेकडो वेळा घोटून पक्का करीत. मुळात पहाडी असलेल्या आवाजाला त्यांनी मेहनतीने फिरत आणली आणि ते आपल्या गुरुजींसारख्या ताना घेऊ लागले. त्यांचा आवाज घुमारदार, पल्लेदार आणि त्याचबरोबर चपळ, फिरतदार असा तयार झाला. ख्याल, धृपदे, धमार, टप्पे, तराणे, भजने वगैरे सर्व गीतप्रकार गाण्यासाठी योग्य असा दमसासयुक्त भरदार आणि फिरतीचा आवाज बनल्यामुळे त्यांचे गाणे प्रभावपूर्ण वाटू लागले. गुरुजींचे ते प्रिय शिष्य झाले. कुरुंदवाडच्या राजकुमारांचा - नानासाहेबांचा विवाह ठरला आणि त्याच मंडपात विष्णूबुवांचा विवाहदेखील पार पडला. काही काळ थांबून मिरजेच्या अधिपतींनी विष्णूबुवांना परत मिरजेस बोलावून घेऊन साधनेत गुंतवले. भरपूर शिक्षण झाल्यावर १८९६ साली दोन शिष्यांना घेऊन विष्णूबुवा मैफली करण्यासाठी बाहेर पडले.

संस्थानिकांच्या सहवासात असताना विष्णूबुवांनी समाजाचे सूक्ष्म निरीक्षण करून आपल्या मनाशी काही एक ध्येय निश्चित केले होते.संगीताला व कलाकाराला समाजात मानाचे स्थान मिळवून देणे, तसेच संगीतविद्या सर्वांना सुलभ व्हावी म्हणून संगीत विद्यालय काढणे, त्यासाठी शिक्षित असा शिष्यवर्ग तयार करणे, अशा त्यांच्या मनातील योजना होत्या. पण त्यासाठी आधी स्वत: प्रथितयश गायक होणे ही पहिली पायरी होती. त्या दिशेने त्यांनी प्रयत्न सुरू केले. प्रथम सातारा, औंध करत ते बडोद्यास गेले. त्यांच्या गायनाचा बडोद्यातील श्रोत्यांवर व मुख्यत्वे बडोद्याच्या राणीसाहेब जमनाबाई यांच्यावर खूप प्रभाव पडला. राणीसाहेबांनी गुजरात, काठेवाड आणि राजस्थानातील काही राजेलोकांसाठी शिफारसपत्रे दिली. त्यामुळे त्या सर्व ठिकाणी पं. पलुसकरांचे कार्यक्रम यशस्वी झाले. मानसन्मान व धनप्राप्तीही बरीच झाली. कैक संस्थानिकांनी दरबार गवई म्हणून राहण्याचा आग्रह केला. पण आपल्या ध्येयाकडे दृष्टी ठेवून पलुसकरांनी त्यांना नम्रपणे नकार दिला.

ध्येेयसिद्धीसाठी एखाद्या शहरी कायम वास्तव्य करणे आवश्यक होते. याच सुमारास गिरनार पर्वतावरील दत्तात्रेयाच्या मंदिरी जाणे झाले. विष्णूबुवांच्या घराण्यात दत्तभक्ती होती, त्यांच्या मूळ गावाजवळ ‘नरसोबाची वाडी’ हे दत्तक्षेत्र आहे. त्या कारणाने ते गिरनारच्या दत्तमंदिरात गेले. तिथे एका सिद्धपुरुषाने त्यांना पंजाबात जाऊन कार्य सुरू करण्याविषयी आशीर्वादपूर्वक सांगितले. काठेवाडचा दौरा संपवून गायकांची पंढरी, जी ग्वाल्हेरनगरी, तिथे जायचे ठरवून ते मार्गस्थ झाले.

ग्वाल्हेरच्या रसिकांना महाराष्ट्रीय गायकाने खास त्यांचे ग्वाल्हेरी गायन ऐकवल्याने तेथे विष्णूबुवांचा दबदबा निर्माण झाला. ते सुमारे चार महिने ग्वाल्हेरात राहिले. शंकर पंडित, बाळ गुरुजी, आपटे गुरुजींसारख्या तत्कालीन बुजुर्गांनी विष्णूबुवांच्या गाण्याचे कौतुक केले. ग्वाल्हेरच्या महाराजांनी त्यांचे गाणे ऐकले व खुश होऊन मानसन्मान केला, शिवाय भरतपूर, मथुरा वगैरे पुढील मुक्कामांची व्यवस्था लावून दिली.

पुढे विष्णू दिगंबर मथुरेस गेले, तेथे सात महिने वास्तव्य झाले. या काळात पलुसकरांनी गाणी केलीच; पण ब्रजभाषेचा अभ्यासही केला, हिंदीवर प्रभुत्व मिळविले, पुढील कार्यासाठी वक्तृत्वकलेची साधना केली. ग्रंथांचे अध्ययन, परिशीलन केले. त्या शास्त्राचा आधुनिक संगीताशी कसा मेळ घालता येईल यासंबंधी त्यांच्या मनात विचार सुरू झाले. त्यांनी धृपद गायकीचा अभ्यास केला, काही नवीन धृपदांची रचना केली. एकूण या काळात पुढील कार्यसिद्धीसाठी योग्य असे व्यक्तिमत्त्व घडत गेले. जोधपूरच्या मुक्कामात जेम्स या बॅण्डमास्तरांनी बुवांना पाश्चात्त्य नोटेशन दाखविले. या व इतर अर्जित ज्ञानाच्या आधारे त्यांनी आपली स्वरलिपी तयार केली. त्या पद्धतीने काही पुस्तके लिहिली. ५ मे १९०१ रोजी पलुसकरांनी लाहोरला गांधर्व महाविद्यालय सुरू केले.

अशा प्रकारे मनात ठरविलेल्या योजनेनुसार प्रथम स्वत:ला सिद्ध करणे, अर्थात नावाजलेला कलाकार बनणे आणि सर्वसामान्यांना संगीत शिक्षण सुलभ व्हावे यासाठी संगीत विद्यालय स्थापित करणे या गोष्टी झाल्या. गावोगावची मुले या विद्यालयात दाखल होऊ लागली. प्राचीन गुरुकुलांप्रमाणे वसतिगृह निर्माण करून त्यांच्या निवासाची व्यवस्था झाली. नऊ वर्षांचा सलग अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी हौशी विद्यार्थ्यांना शिकवावे आणि प्रचाराचे कार्य सुरू ठेवावे, यासाठी विशेष असा ‘उपदेशक वर्ग’ नऊ वर्षांसाठी तयार झाला.

या अभ्यासक्रमातून उत्तीर्ण झालेले बरेच विद्यार्थी पुढे नामांकित गायक, शिक्षक, प्रचारक झाले. या विद्यालयाचा पुढे मुंबईत गांधर्व महाविद्यालयाची शाखा काढून विस्तार झाला. पुढेपुढे मुंबईचे विद्यालय मुख्य केंद्र बनले. संगीताच्या परीक्षा घेण्यास सुरुवात झाली. पदवीदान समारंभ इतर क्षेत्रांतील नामवंतांच्या अध्यक्षतेखाली पार पाडले जाऊ लागले. संगीत परिषदा भरविण्याचे मोठे कार्य पं. विष्णू दिगंबरांनी केले. संगीताचे जलसे वारंवार भरवून जनसामान्यांना उत्तम संगीत ऐकविण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. मुंबईत स्वत:ची इमारत होईपर्यंत सात वर्षे इतरत्र व नंतर आपल्या हक्काच्या इमारतीत, असे जलसे होत असत. जलशांचे उत्पन्न विद्यालयाच्या खर्चासाठी, अर्थात लोककार्यासाठीच वापरले जाई.

भारतातील सर्व प्रांतांत पंडितजींनी संगीताचा प्रसार केला. वेळेवर कार्यक्रम सुरू करून वेळेवरच संपविणे ही शिस्त विष्णूबुवांनी सुरू केली. संगीताच्या प्रांतात हे सर्व नवीनच होते. कुलीन स्त्रिया व मुलींना, सर्व जातीजमातींतील मुलींना रंगमंचावर/व्यासपीठावर बसवून गाण्याची संधी देण्याचे मोठे कार्य पंडितजींनी केले. त्यामुळे पुढील काळात स्त्रियांना गाण्याचा मार्ग प्रशस्त झाला.

मुळात संशोधक वृत्तीचे असल्याने पं. विष्णू दिगंबरांनी जलशांमध्ये नाविन्य आणले. त्यांनी तबलातरंगाची कल्पना प्रत्यक्षात आणली. प्रत्येक स्वरात तबला मिळविणे, रागात लागणारे स्वर आणि बसवलेल्या पदात किती उंच जावे लागते तितके तबले मिळवून प्रत्येक तबल्यावर एकेक मनुष्य बसवून तबलातरंग वाजवून घेणे हे अभिनव वाटणारे तबलातरंग- वादनाचे कार्य केले. इंग्रजी ऑर्केस्ट्राचे डोळसपणे निरीक्षण करून त्यांनी आपल्या भारतीय वाद्यांचा वाद्यवृंद बसवला. मुळात पंडितजींच्या अभ्यासक्रमात मुलांना गायनाबरोबर किमान २-३ वाद्यांचे वादन शिकावे लागे, त्यामुळे विद्यार्थ्यांचा वाद्यवृंद बसविताना त्यांना फारसे अवघड गेले नाही.

व्यायामाला संगीताची जोड दिल्यास तो सुखद, सहज वाटू शकतो हे लक्षात आल्यावर बनारसच्या मुक्कामात त्यांनी व्यायामपटू प्रो. माणिक यांच्या क्लब ड्रिल, फ्लॅग ड्रिल व बारबेल ड्रिल या व्यायामांचे, प्रोफेसर माणिक यांच्याकडून आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देवविले आणि त्याला संगीताची जोड दिली. शरीराशी संबंधित कार्य: व्यायाम आणि हृदयाला जाऊन भिडणारी ललितकला: संगीत या दोन्हींचा समन्वय प्रत्यक्ष जलशात श्रोत्यांकडून टाळ्यांचा कडकडाट मिळविणारा ठरला. पारतंत्र्यातील भारताला राष्ट्राभिमानी बनविण्यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांत पं. विष्णू दिगंबर सहभागी झाले होते. अनेक मोठमोठ्या राष्ट्रीय पुढार्‍यांचा त्यांच्यावर लोभ जडला होता. महात्मा गांधींना नारायण मोरेश्वर खरे हा आपला विद्यार्थी पलुसकरांनी राष्ट्रसेवेसाठी समर्पित केला होता. पाचवे जॉर्ज बादशहा भारतात आले, तेव्हा मुंबई त्यांना पाहायला लोटली होती. पण ‘‘माझा हिंदुस्थानचा राजा मंडालेच्या तुरुंगात असताना या राजाचे तोंड मी कधीच पाहणार नाही,’’ असे बाणेदार उद्गार काढून पंडितजींनी आपले जाज्वल्य देशप्रेमच प्रकट केले!

उण्यापुर्‍या ५९ वर्षांच्या आयुष्यात विष्णू दिगंबरांनी ओंकारनाथ ठाकूर, विनायकराव पटवर्धन, नारायणराव व्यास, पाध्येबुवांसारखे नामवंत गायक-शिष्य तयार केले. ना.मो. खरे, गोविंदराव देसाई, बोडस बंधू, ठकार इत्यादी प्रचारक, गायक, शिक्षक तयार केले. शंकरराव व्यास, ना.मो खर्‍यांनी उत्तम बंदिशी, लक्षणगीते वगैरे बांधली. विनायकबुवा, ओंकारनाथ, बी.आर. देवधरांनी संगीतविषयक पुस्तके लिहिली. पं. पलुसकरांनी स्वरलिपी बनवून, पुस्तके लिहून स्वत:चा छापखाना घेऊन मुलांना छपाईचे शिक्षणही दिले. त्यांनी सुरू केलेले ‘संगीतामृत प्रवाह’ हे मासिक याच छापखान्यात छापले जात असे.

डोळ्यांनी अधू असलेल्या विष्णू दिगंबरांचे द्रष्टेपण व दूरदृष्टी स्तुत्य होती. संगीताला व सांगीतिकाला समाजात प्रतिष्ठा मिळावी यासाठी ते जन्मभर झटले. स्वत:ची उत्तम गायकाची कारकीर्दही गाजविली. कौटुंबिक आयुष्यात स्वत:ची १०-११ मुले अल्पायुषी झालेली, लहानपणीच देवाघरी गेलेली पाहिली. मुंबईच्या गांधर्व महाविद्यालयाच्या इमारतीचा लिलाव झाल्यावर, ‘‘माझे भारतात ठिकठिकाणी संगीताचे कार्य करीत असलेले विद्यार्थी याच माझ्या इमारती आहेत,’’ अशा आशयाचे उद्गार काढणारे विष्णू दिगंबर आयुष्याच्या उत्तरार्धात वीतरागी होऊन, कफनी परिधान करून नाशिकमध्ये रामनाम आधार आश्रम स्थापून रामायणावर प्रवचने करीत राहिले होते. तिथेच त्यांचे देहावसान झाले.

मुंबई महानगरपालिकेने ऑपेरा हाउसजवळील अत्यंत रहदारीच्या चौकाला ‘पं. विष्णू दिगंबर पलुसकर चौक’ हे नाव दिले. फिल्म्स डिव्हिजनने त्यांच्या जीवनावर अनुबोधपट बनवून देशातील सिनेमागृहांतून तिचे प्रदर्शन केले. भारतातील सर्व प्रमुख शहरांत त्यांची जन्मशताब्दी (१९७२ साली) थाटामाटाने साजरी झाली. पुढे त्यांच्या जगलेल्या एकुलत्या एक सुपुत्राने, पं. दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांनी, नामांकित गायक म्हणून लौकिक मिळविला.

डॉ. सुधा पटवर्धन

संदर्भ :

१. देवधर, बा.र.; ‘थोर संगीतकार’ पॉप्युबर प्रकाशन, १९९९.

२. पटवर्धन, वि.ना.; ‘माझे गुरुचरित्र’. 

पलुसकर, विष्णू दिगंबर