Skip to main content
x

सुकथनकर, दत्तात्रेय महादेव

          भारतीय प्रशासकीय सेवेत सुमारे तीन दशकांहून अधिक काळ सेवा करणाऱ्या दत्तात्रेय महादेव सुकथनकर यांचा जन्म बडोदा येथे झाला. त्यांचे आईवडील हे दोघेही बडोदा संस्थानात नोकरी करीत होते. दत्तात्रेय सुकथनकर १९४७ मध्ये मुंबई विद्यापीठातून मॅट्रिक परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. पुढे बडोद्याच्या सर प्रतापसिंहराव कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्यांनी बी.कॉम ही बडोदा विद्यापीठाची पदवी वरच्या श्रेणीत प्राप्त केली. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण मुंबईच्या पोद्दार महाविद्यालयामध्ये झाले, तेथून त्यांनी  एम.कॉम. ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी सुरत येथील के.पी. वाणिज्य महाविद्यालयात व्याख्याता म्हणून काम केले. एकीकडे अध्यापनाचा अनुभव घेत असताना त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश करण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारीही होत होती. वयाच्या चोविसाव्या वर्षी (१९५६) त्यांची आय.ए.एस.साठी निवड झाली. तेव्हापासून सुमारे साडेतीन दशके त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत विविध खात्यांमध्ये  विविध अधिकारपदे भूषविली. शिक्षण खात्यात उपसचिव व सचिवपदी ते सर्वाधिक काळ राहिले.

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर त्यांच्या प्रशासकीय कार्याला विशेष बहर आला. १९६२ मध्ये वसंतराव नाईक यांच्या काळात नव्यानेच स्थापन झालेल्या पुणे जिल्हा परिषदेचे ते पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. १९६४ ते १९७२ अशी आठ वर्षे ते महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात उपसचिव होते. पुढे १९७६ ते १९७९ पर्यंत त्याच खात्याचे सचिव म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली.

नंतर त्यांनी औद्योगिक विभागाचे सचिव म्हणून काम पाहिले. पुढे वर्षभर मुंबई महानगराचे आयुक्त व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी आपले उत्तरदायित्व पार पाडले. पुढील दोन- तीन वर्षे ते भारत सरकारच्या नगरविकास मंत्रालयात सचिव म्हणून काम पाहत होते.  नंतर महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिवपद भूषवून ३१ ऑगस्ट १९९० रोजी सुकथनकर रोजी आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले.

सेवानिवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झालेले सुकथनकर सतत कार्यमग्न राहिले. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध उपक्रमांशी त्यांनी आपला अनुभव-संबंध जोडला. ते अनेक शासकीय समित्यांचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. सरकारी समित्यांप्रमाणे विविध औद्योगिक समूहांचे कार्यकारी संचालक म्हणूनही ते काम पाहतात.

पुण्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, तसेच सांस्कृतिक संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध आहे. संगीत महाभारतीआणि मुंबई प्रथमह्या संस्थांचे ते उपाध्यक्ष आहेत. शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले. नवी दिल्ली येथील नागरी संघटना जीवनक्रमया राष्ट्रीय संस्थेच्या नियंत्रक मंडळाचे ते अध्यक्ष होते. मोडकळीस आलेल्या  जुन्या निवासी इमारतींची वेळीच पुनर्बांधणी करणे हे उद्दिष्ट ठेवून काम करणार्‍या महाराष्ट्र शासनाच्या एका विशेष समितीचे सुकथनकर प्रमुख सल्लागार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या वेतन आयोगाच्या विविध समित्यांवर सुकथनकर यांनी सदस्य, अध्यक्ष, सल्लागार या नात्याने काम पाहिले. १९९७-१९९८ मध्ये स्थापन झालेल्या पाचव्या वेतन आयोगाशी सुकथनकर संबंधित होते. आयोगाच्या शिफारशी प्रत्यक्षात कशा अमलात आणाव्यात यासंबंधी त्यांनी केलेले मार्गदर्शन विशेष मोलाचे ठरले.

त्यांनी नागरी पाणीपुरवठा आणि सांडपाण्याची व्यवस्था आणि विल्हेवाट समितीवर महत्त्वाचे काम केले. सुंदर शहर, स्वच्छ शहरया विचाराला चालना देण्यात सुकथनकर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे होते.

एक आदर्श प्रशासक या नात्याने त्यांनी सतत प्रशासकीय सुधारणांचा विचार केला. प्रशासन साधे, स्वच्छ, पारदर्शी आणि गतिमान असावे ह्यावर सुकथनकर यांचा भर असतो. २००३ मध्ये त्यांनी प्रशासकीय सुधारणा समितीचा अहवाल शासनाला सादर केला होता. भारत सरकारच्या पर्यावरण आणि वनसंपदा मंत्रालयाकडून  इ.स. २००० मध्ये किनारपट्टीवरील पर्यावरण संवर्धन आणि रक्षण यासाठी एक समिती नियुक्त केली गेली. सुकथनकर त्या समितीचे सदस्य होते. किनारपट्टीवरील नियंत्रण सर्व घटक राज्यांना लागू करण्याचे काम आणि त्यासंबंधीचे नियम तयार करण्याचे काम या समितीकडे सोपविण्यात आले होते.

ते कोकण भूमी प्रतिष्ठानया बिगर शासकीय सेवाभावी संघटनेचे सल्लागार सदस्य आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीचा निसर्गप्रिय उपयोग करून कोकण भूमीचा सर्वांगीण विकास कसा घडवून आणता येईल, याबाबत ही संघटना कार्यरत आहे. सेवानिवृत्तीनंतर ही बिगर शासकीय सेवाभावी संस्था, शासन आणि खाजगी उद्योग यांचा सुयोग्य मेळ घालून काही भरीव कार्य करणे ही फारच कठीण बाब म्हणावी लागेल. परंतु एक सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी किती भरीव कामगिरी करू शकतो ह्याचे सुकथनकर हे एक चांगले उदाहरण आहे. 

- प्रा. विजय देव

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].