Skip to main content
x

साठे, लक्ष्मण गणेश

     लक्ष्मण गणेश साठे यांचा जन्म पुणे येथे झाला. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मधून ते मॅट्रीक झाले. त्यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोल्हापूरच्या राजाराम विद्यालयामध्ये दाखल झाले. परीक्षेत त्यांना पहिला वर्ग व पदार्थविज्ञानामध्ये सुवर्णपदक मिळाले.

     १८९९ मध्ये ते मुंबईत आले व विल्सन महाविद्यालयामधून संस्कृत विषय घेऊन बी.ए. झाले. संस्कृतमधील ‘भाऊ दाजी’ पारितोषिकाचे मानकरी ठरले व महाविद्यालयात प्रथम आल्याने दक्षिणा फेलोशिप मिळाली. नंतर रसायन विषयात त्यांनी एम. ए. पदवी संपादन केली. त्याच वर्षी त्यांना सौराष्ट्रातील जुनागड येथील बाहुद्दीन विद्यालयामध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली आणि अध्यापकी जीवनास प्रारंभ झाला.

     साठे हे उत्तम शिक्षक होते. शिक्षणाच्या दृष्टीने मागे पडलेले काठेवाडमधील विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनामुळे पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र हे ऐच्छिक विषय घेऊन पास होऊ लागले. १९०६ मध्ये ते अजमेरच्या पेथो महाविद्यालयामध्ये विज्ञान शिक्षक म्हणून काम करू लागले. १९१८ पासून निवासी शिक्षकाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. राजपुत्रांनाही शिकविण्याचे काम ते करीत होते. विद्यार्थ्यांच्या खेळावर लक्ष ठेवण्यासाठी ते स्वत: संध्याकाळी मैदानावर हजर असत. मुलांना टेनिसचे मार्गदर्शन करीत.

     त्यांची अध्यापनाची तयारी उत्तम असायची. पाठांची टिपणे काढणे, प्रात्यक्षिकांची तयारी करणे, उत्तम शिकविणे या सर्व गोष्टी ते कटाक्षाने करीत. १९३३ मध्ये त्यांनी नोकरी सोडण्याचे ठरविले. पण जयपूरच्या सवाई मानसिंह या विद्यार्थ्याच्या विनंतीला मान देऊन जयपूरच्या ‘मान नोबल्स स्कूल’ चे काम त्यांनी सात वर्षे मोठ्या धडाडीने केले. शाळेत शिस्त आणली. स्वत:च्या संघटना चातुर्याचा व खंबीरपणाचा परिचय सर्वांना करून दिला. ही शाळा गोनेर या लहानशा गावातील होती.

     सर्व गावकरी साठे यांना ओळखत. स्वखर्चाने त्यांनी गावकऱ्यांच्या पाण्याची अडचण दूर केली, शंकराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

     अध्यापनाचे काम चालू असतानाच राष्ट्रीय शिक्षणमालेसाठी राष्ट्रीय शिक्षणाचा ओनामा, रसायन प्रवेश, सृष्टशक्तिशास्त्र ही पुस्तके लिहिली. रसायनशास्त्राची परिभाषा तयार करून ती त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रकाशित केली होती. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत झटणारे प्रा. लक्ष्मण गणेश साठे यांची शिक्षण क्षेत्रातील महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील कामगिरी निश्‍चितच अभिमान वाटावा अशीच आहे.

- वि. ग. जोशी

साठे, लक्ष्मण गणेश