Skip to main content
x

हिवाळे, भास्कर पांडुरंग

     १९१२ च्या एस.सी.एम. (स्टुडंटस् ख्रिश्‍चन मुव्हमेंट) च्या त्रैवार्षिक अधिवेशनात, जे सेरायपूर (बंगाल) येथे संपन्न झाले, त्यात भारत, सिलोन व ब्रह्मदेशातील अनेक ख्रिस्ती युवक सहभागी झालेले होते. त्यावेळी जॉन मॉट (ज्यांना १९४६ साली शांतता नोबेल पुरस्कार मिळाला) यांनी या महाविद्यालयीन युवकांना प्रश्‍न विचारला, “येथे बसलेल्यांपैकी किती जणांची आपले जीवन देशाच्या सेवेकरिता देण्याची इच्छा आहे?” त्यावेळी फक्त सहा हात वर आले. त्यापैकी एक डॉ. भा. पां. हिवाळे यांचा होता आणि त्यांनी हे वचन आयुष्यभर पाळले.

      डॉ. भा. पां. हिवाळे, ज्यांना त्यांचे विद्यार्थी ‘बाप्पा’ म्हणूनच ओळखत, यांचा जन्म १८८९ मध्ये  सोलापूर येथे २२ जानेवारी रोजी झाला. शिकण्याकरिता त्यांना अमेरिकन मराठी मिशनच्या वसतिगृहात ठेवले गेले. केवळ चौदा वर्षांचे असताना साथीच्या रोगाने आई-वडिलांचे छत्र गेले आणि सहा भावंडांची जबाबदारी घेणे त्यांना भाग पडले.

      मॅट्रिक परीक्षेनंतर ते एक वर्ष काम करून पैसे जमा करीत. नंतर दुसऱ्या वर्षी महाविद्यालयीन शिक्षण घेत. आपल्या भावंडांच्या प्रत्येक गरजेचा विचार करीत. फर्गसन महाविद्यालय पुणे येथील एका वर्षानंतर विल्सन महाविद्यालय मुंबई येथे त्यांनी तत्त्वज्ञान हा विषय घेऊन पदवी मिळविली.

      त्यांचा हा संघर्ष व निश्‍चय अमेरिकन मराठी मिशनच्या मिशनर्‍यांच्या नजरेत भरला आणि ‘अ‍ॅडोवर थिऑलाजिकल सेमिनरी’ अमेरिका येथे धर्मशास्त्राची पदवी (बी.थिओ) घेण्यासाठी त्यांना पाठविण्यात आले. तेथे असतानाच या निश्कांचन अशा महत्त्वाकांक्षी तरुणाने हॉवर्ड विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहिले. याचवेळी उच्चशिक्षण प्राप्त भारतीय ख्रिस्ती समाजातील होतकरु तरुणांवर अमेरिकन मराठी मिशनच्या जबाबदार्‍या टाकण्याचा स्वागतार्ह असा निर्णयही मिशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आणि डॉ. हिवाळे यांच्यावर मराठी ज्ञानोदयांच्या संपादनाची जबाबदारी टाकली होती.

       जून १९२१ ला त्यांचा विवाह ‘रुथ मालिनी’ हिच्याशी झाला. त्या अमेरिकन मराठी मुलींची शाळा अहमदनगर येथे शिक्षिका म्हणून रुजू झाल्या होत्या.

       त्यानंतर काही महिन्यातच पदव्युत्तर पदवी व पीएच. डी. करिता अमेरिकेस जाण्याचे ठरले. त्याकरिताही त्यांना संघर्षातूनच जावे लागले. तेथील शिक्षणाचा आणि कुटुंबाचा खर्च भागविण्याकरिता ते व्याख्याने देत.

       त्यांच्या या कालावधीतच त्यांना विल्सन महाविद्यालय, मुंबई येथे अध्यापनाची जबाबदारी देण्याचे ठरले होते. मात्र १९२३ च्या या निर्णयाला प्रत्यक्षात येण्यास काही वर्षे गेली. दरम्यान त्यांनी जर्मन व फ्रेंच या भाषांचेही ज्ञान मिळविले आणि १९२८ ला हॉवर्ड विद्यापीठाची डॉक्टरेट मिळविली.

       भारतात परतल्यावर त्यांना विल्सन महाविद्यालय, मुंबई येथे प्राध्यापक म्हणून घेण्यात आले. त्या काळातच ‘पूर्ण मिशनरी’ हे पदही मिळाले. अमेरिकन मराठी मिशनने एक स्वतंत्र विचारांचा भारतीय ख्रिस्ती म्हणून त्यांना ओळखले होते. हा काळ असहकार चळवळीचा होता. त्यावेळी ब्रिटिश कापडांचे सूट वापरण्याऐवजी ते खादीचे सूट वापरू लागले. अर्थात त्यानंतर त्यांना गर्व्हनरच्या निवासस्थानी चहा अथवा चर्चेला बोलावणे थांबले.

       विल्सन महाविद्यालयामध्ये त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांसाठी अनेक सामाजिक प्रकल्प हाती घेतले. त्याचवेळी त्यांच्यावर ह्युम मेमोरियल चर्च, नागपाडा येथे ‘मॉडरेटर’ ही जबाबदारी देण्यात आली.

      मात्र त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा काळ १९४५ हा होता. ‘युनायटेड चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’ यांची अजमेर येथे सभा झाली. त्यावेळी झालेल्या चर्चेमध्ये मराठी भाषिक सहभाग घेऊ शकले नाहीत कारण त्यांना इंग्रजी येत नव्हते. रात्री ही मंडळी डॉक्टर साहेबांना भेटली आणि म्हणाली, “तुम्हीच मदत करू शकता, डॉक्टरसाहेब, अहमदनगर येथे महाविद्यालय सुरू करून ....”

      डॉ. हिवाळे मुंबई विद्यापीठाच्या रजिस्ट्रारांना भेटले, विल्सन महाविद्यालय व अहमदनगर येथे सुरू होणारे महाविद्यालय एकाच व्यवस्थापनाखाली असावे ही त्यांची संकल्पना होती. सोलापूर येथील अमेरिकन मराठी मिशनच्या १९४५ च्या सभेमध्ये हा विचार त्यांनी मांडला. त्यामध्ये एका गटाने तीव्र विरोध केला. डिपॉझिट म्हणून रु. १,००,०००/- उभारणे अवघड होते. त्यांनी एका वर्षाची रजा घेतली आणि अमेरिकेस प्रयाण केले. प्लीमथ चर्चने त्यांना पूर्ण पाठिंबा अगदी सहभागासह दिला. मात्र डिपॉझिटसाठी आवश्यक असलेले एक लाख रु. अद्याप मिळालेले नव्हते. डॉ. भा. पां. हिवाळे यांनी, नावाजलेले दानशूर विल्यम् डॅनफोर्थ यांच्या ‘आय डेअर यू’ या पुस्तकाचे भाषांतर केले होते. त्यांनी या डिपॉझिट करिता एक लाख रुपये दिले.

      शेवटी १९४७ मध्ये मराठी मिशनच्या “पिवळी माडी” या इमारतीत अहमदनगर महाविद्यालयाची सुरुवात झाली. २२ जून १९४७ ला अहमदनगरच्या दुष्काळी भागात ज्ञानगंगा अवतरली. डॉक्टरांच्या सहचारिणीने आपले दागिने देऊन या वाटचालीत सक्रिय भाग घेतला. कला व विज्ञान शाखांचे वर्ग सुरू झाले. पहिल्या वर्षी आणि नंतरही काही वर्षे संमिश्र वयोगटाचा विद्यार्थीवर्ग असे.

      हा भाग दुष्काळी असल्याने शिक्षण घेण्याची ऐपत नसणार्‍या पण शिक्षणाची इच्छा असणार्‍यांना ‘कमवा आणि शिका’ या योजनेखाली शिकवले गेले. दुष्काळाच्या काळात स्वत: रुथबाईंनी खीर/शिरा यासारखे पदार्थ तयार करून नाममात्र शुल्क घेऊन विद्यार्थ्यांस न्याहारी पुरविली. त्याचवेळी विद्यार्थ्यांना महाबळेश्वर सारख्या ठिकाणी राहून काही शिकता यावे म्हणून जागा व इमारती घेतल्या.

       जानेवारी १९५१ ला निवृत्त झाल्यावरही त्यांचे महाविद्यालय व विद्यार्थी विकासाचे प्रयत्न चालूच होते. डॉ. थॉमस बार्नबस व ख्रि. रेव्ह. जोसेफ बार्नबस यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि डॉ. मनोरमा व डॉ. सरला बार्नबस यांच्या सक्रिय सहभागाने महाविद्यालय विकसित होत राहिले.

     याच काळात डॉ. हिवाळे यांनी ‘उषा’ हे द्वैभाषिक साप्ताहिक संपादित केले. विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी-मराठी शब्दकोश स्वत: तयार करून अल्प किमतीमध्ये उपलब्ध करून दिला. निवृत्त झाल्यावरही ते ‘नीती-प्रशिक्षणाचे वर्ग स्वत: घेत असत.

     महाविद्यालयातील प्राध्यापकांना स्वतः उत्तेजन देऊन त्यांनी लिखाण करावयास लावले आणि ते ‘अहमदनगर महाविद्यालय प्रकाशना’तर्फे प्रकाशितही केले. ‘ख्रिस्तपुराणातील सौंदर्यस्थळे’ हे याच मालिकेतील पुस्तक होय. प्राध्यापकांना संशोधनासाठी सतत संधी उपलब्ध करून दिली जाई.

      अहमदनगर महाविद्यालय, अहमदनगर मधील केवळ मातृशिक्षण संस्थाच नसून प्रयोगशील, सामाजिक समरसतेच्या विचारांना वाव देणारी, नव्या प्रकल्पांना जन्म देणारी व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अग्रगण्य अशी संस्था झाली आहे.

विश्वास काळे

संदर्भ
१. अहमदनगर महाविद्यालय वार्षिक  १९६१/६२;  संपादक मंडळ, प्राचार्य, अहमदनगर महाविद्यालय,  अहमदनगर
२. बार्नवस डॉ, सरला; ‘विंग्ज ऑफ द मॉर्निंग’.
३. बार्नबस डॉ. सरला;  ‘सच प्रेशियस थिंग्ज’.
४. रुथबाई खि. ख्रि; ‘आमचे कृतार्थ सहजीवन’
५. अहमदनगर महाविद्यालय सुवर्ण महोत्सवी स्मरणिका-
        १९४७  - १९९७,अहमदनगर महाविद्यालय.
हिवाळे, भास्कर पांडुरंग