साळुंखे, हणमंत काशिनाथ
हणमंत काशिनाथ साळुंखे उर्फ एच. के. यांचा जन्म कलेढोण येथे झाला. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले, त्यामुळे मातेनेच त्यांचा सांभाळ केला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कलेढोण येथेच झाले. सातवीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते नाशिक येथील अनाथ विद्यार्थी वसतिगृहात गेले. आठवीसाठी ते पुण्याच्या अनाथ विद्यार्थी वसतिगृहात गेले. तेथूनच त्यांनी ११ वी ची परीक्षा दिली व उत्तीर्ण झाले.
महाविद्यालयीन शिक्षणासाठी एच.कें.नी सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयमध्ये प्रवेश घेतला. कमवा व शिका या योजनेत सहभागी होऊन त्यांनी इंटरची परीक्षा दिली. इंटरनंतर पदवीसाठी प्रवेश घेणे त्यांना आर्थिक अडचणीमुळे शक्य नसल्याने त्यांनी लवकरात लवकर स्वावलंबी बनण्यासाठी १९५६ मध्ये टी.डी.ची परीक्षा दिली.
टी.डी झाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेने त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथे मुख्याध्यापक (१९५४-५६) म्हणून काम करण्यास सांगितले. त्यांनी या विद्यालयाच्या विकासाचा पाया घातला. त्यांची प्रयोगशीलता व अंत:करणपूर्वक काम करण्याची जिद्द यामुळे ते सतत कार्यरत होते, तरीही ते अस्वस्थ असत. त्यांचा स्वभाव त्यांना नोकरीच्या चाकोरीतून बाहेर पडण्यासाठी खुणावू लागला. त्यांनी संस्थेकडे नोकरीचा राजीनामा पाठविला.
त्यानंतर त्यांनी राष्ट्रसेवा दल व प्रजा समाजवादी पक्षाचे कार्य पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून केले. (१९५६-१९६०) या कालावधीत गोवा मुक्ती आंदोलन व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभाग घेतला. या कार्यात मग्न असतानाच त्यांना आपण आपल्या गावासाठी काहीतरी केले पाहिजे असे प्रकर्षाने वाटू लागले. कलेढोण हे गाव खटाव तालुक्यात एक मोठे गाव म्हणून ओळखले जाते. मायणीनंतर पंचवीस मैलाच्या परिसरात विद्यालयीन शिक्षणाची सोय नव्हती. या परिसरातील मुला-मुलींसाठी माध्यमिक शिक्षणाची सुविधा आपण उपलब्ध करून दिली पाहिजे असे एच. कें ना. प्रकर्षाने जाणवू लागले. आपल्या काही समवयस्क मित्रांशी व परिसरातील प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांनी ‘हनुमान शिक्षण संस्था, कलेढोण’ ची स्थापना केली. या संस्थेचे सचिव पद एच. कें. नी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे स्वीकारले व आजतागायत ते या पदावर काम करीत आहेत.
विद्यालयास परवानगी मिळाल्यानंतर पूर्वीचा अनुभव असल्याने मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची जबाबदारी एच. कें. नी सर्वांच्या आग्रहामुळे स्वीकारली व ती कर्तव्य भावनेने पार पाडली (१९६०-१९८७). सुरुवातीला शाळा भाड्याच्या इमारतीत भरत असे, मुलांची अपुरी संख्या असे, स्थानिक राजकारण, या सर्व अडचणींवर मात करून त्यांनी संस्थेच्या विद्या विकास मंदिरास स्थैर्य प्राप्त करून दिले. विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता टिकून राहावी यासाठी त्यांनी प्रारंभापासूनच विविध उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढावी यासाठी शिष्यवृत्तीचे तास नियमितपणे घेतले जातात. शाळेसाठी माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, सोने-चांदीच्या क्षेत्रात भारतभर पसरलेले लोक यांच्याकडून देणग्या गोळा करून शाळेला भव्य इमारत बांधली आहे. शाळेत आज १३ तुकड्या असून विद्यार्थी संख्या ७५० ते ८०० च्या दरम्यान असते. या विद्यालयामुळे परिसरातील विद्यार्थी, विशेषत: मुली, यांच्या शिक्षणाची सोय झाली आहे. विद्यालयास जोडूनच महात्मा फुले यांच्या नावे वसतिगृह सुरू केले आहे.
शिक्षण प्रसाराबरोबरच कलेढोण परिसरातील गावांचा विकास व्हावा या हेतूने एच. कें. नी सातत्याने प्रयत्न केले आहेत. परिसरातील लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी कॉटेज हॉस्पीटल कलेढोण येथे चालू करण्यात आले आहे. हनुमान सहकारी संस्था- कलेढोण, महाराष्ट्र राज्य सहकारी देखरेख संघ, पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक मंडळ, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक या सहकारी संस्थेंद्वारा परिसराचा विकास साधण्याचा प्रयत्न एच. कें. नी केला आहे. १९८२ मध्ये त्यांनी स्वत: द्राक्ष लावण्याचा प्रयोग यशस्वीपणे कार्यवाहीत आणला आहे. त्यामुळे कलेढोण परिसरात द्राक्षांची लागवड सुरू झाली. आज कलेढोणची द्राक्षे प्रसिद्ध असून लंडनच्या बाजारात त्यांना मागणी आहे.
१९९९ मध्ये एच. कें. नी ‘स्टेशनरी पॉईंट इंडिया लिमिटेड’ या कंपनीची स्थापना कलेढोण येथे करून ती चांगल्या प्रकारे चालविली जाईल इकडे लक्ष पुरविले आहे. या प्रकल्पात आज कलेढोण परिसरातील ३५० तरुणांना नोकरी मिळाली आहे.
त्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीमुळे त्यांना तालुका व जिल्हास्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. नुकताच सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाने त्यांना ‘उत्कृष्ट मुख्याध्यापक’ हा पुरस्कार प्रदान केला आहे.
शिक्षण, सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रातील त्यांच्या कामाचा गौरव तालुका व जिल्ह्यातील जनतेने २००२ मध्ये करून त्यांना ११ लाखांची थैली अर्पण केली होती. त्यात १११११ रु. घालून ती रक्कम समाजहितासाठी वापरली जावी यासाठी त्यांनी परत केली आहे.
एच. के. हे एक धडपडणारे व्यक्तिमत्व होय. आपल्या जीवनात त्यांनी नैतिकता व निःस्पृहपणा या मूल्यांची जपणूक केल्याने परिसरातील जनता त्यांना मानते हीच त्यांची खरी ओळख होय.