Skip to main content
x

लोंढे, लक्ष्मण बाळकृष्ण

     लक्ष्मण बाळकृष्ण लोंढे यांचा जन्म बाळकृष्ण-राधाबाई या माता-पित्यांच्या पोटी सातघर (अलिबाग) या गावी  झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण वरसई (पेण), आगाशी येथे झाले व नंतरचे (विज्ञानशाखेची पदवी) महाविद्यालयीन आणि कायदेविषयक शिक्षण (एल.एल.एम.) मुंबईत झाले.

     त्यांनी रिझर्व बँक, न्यू इंडिया अ‍ॅश्युअरन्स कंपनी, आय.सी.आय.सी.आय.बँक येथे कायदेविषयक सल्लागार म्हणून काम केले व त्यानंतर निवृत्ती घेतली.

     त्यांना आधी लेखनाची पार्श्वभूमी नव्हती; परंतु त्यांचे विविध विषयांवर भरपूर वाचन होते. त्यातूनच त्यांना लिखाणाची ऊर्मी आली आणि त्यांनी पहिली कथा लिहिली: ‘मग मी तुझीच आहे.’ आणि एका गमतीदार योगायोगाने ती प्रथम कन्नड मासिकात व नंतर मराठी मासिकात छापून आली. त्यांच्या सुरुवातीच्या कथांना असे कन्नड-मराठी भाषांतर लाभले. त्यांचे विषय कौटुंबिक, सामाजिक, प्रेमविषयक होते व कथा छोटेखानी होत्या.

     परंतु, खर्‍या अर्थाने त्यांची पहिली विज्ञानकथा म्हणजे, ‘मला फाशी द्या.’ प्रथम पदार्पणातच या कथेला मराठी विज्ञान परिषदेचे पारितोषिक मिळाले.

     विज्ञान साहित्याला मराठीत परंपरा-इतिहास म्हणावे, असा अवधी लोटलेला नाही. सुरुवातीच्या भाषांतरांनंतर काही तुरळक प्रयत्न सोडले, तर १९५५ सालानंतर तिला थोडा आकार येऊ लागला. परंतु, वैज्ञानिक क्षेत्रातील संशोधनात्मक कार्याचे वलय असलेल्या डॉ.जयंत नारळीकर यांच्यामुळे विज्ञानकथेला लक्षणीयता प्राप्त झालीच, पण तिच्याकडे गांभीर्यतेने पाहिले गेले.

     ते लिहीत असतानाच निरंजन घाटे, बाळ फोंडके, सुबोध जावडेकर, इत्यादी मंडळी विज्ञान साहित्याचे दालन समृद्ध करू लागली. लक्ष्मण लोंढे यांनी विज्ञान-कथेला स्थिरपद केले. १९७१-१९७२मध्ये या लेखनाला सुरुवात झाली.

     विज्ञाननिष्ठ लेखन

     लोंढे यांची आजवर ३१ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ‘देवांसी जीवे मारिले’ (१९८३), ‘गिनिपिग’ (१९८४), ‘पाण्यात राहणारा मासा’ (१९८५), ‘विज्ञानयात्रा’ (१९८८), ‘दुसरा आइन्स्टाइन’ (१९८९), गुंता इत्यादी विज्ञान कादंबर्‍या; ‘झोका’, ‘झरोका’, ‘लक्ष्मणझुला’, ‘वाळूचं गाणं’ यांसारखे ललित लेख; ‘आभाळ फाटलंय’ हे सत्यघटनेवर आधारलेले चित्तथरारक लेखन; ‘युरोसफर’ हे प्रवासवर्णन, ‘तप्तमुद्रा’ हा गूढकथासंग्रह; ‘कोऽहम्’, ‘आरण्यक’(१९९५) यांसारख्या चिंतनात्मक दीर्घकथा. अशा विविध प्रांतांत ते लीलया विहरत असले, तरी त्यांच्या लिखाणात केंद्रस्थानी माणूस आहे.

     विज्ञान-तंत्रज्ञान यांत होणारे बदल आणि त्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम ते तपासून पाहतात. अनेक वेगवेगळे संदर्भ, श्रुतयोजना ह्यांचा ते वापर करतात. ‘कुंती’, ‘परशुराम’ या पुराण-व्यक्तींना वेगळी परिमाणे लावतात. कीटकसृष्टी, वात्स्यायन, राजकीय संघर्ष, परग्रह, यंत्रमानव, ‘आत्महत्यारा’मध्ये क्लोनिंग, ‘इहलोक’मध्ये श्रॉडिंजरचे समीकरण, ‘प्रेषित’मध्ये विविध मिती, ‘नारदाच्या चिपळ्या’मध्ये ज्ञान आणि देव या संकल्पनांचा वेगळा पैलू दिसतो. ‘आमेन’ या कथेतही देव ‘एकमेवाद्वितीय’ म्हणून एकाकी, ‘सर्वज्ञ’ म्हणून नवे शिकण्याचा आनंद नाही, त्याला  ‘अशक्य’ काही नाही म्हणून प्रयत्नांनी काही मिळवण्याची गोडी नाही, ‘अमर’ म्हणून जन्माचा आनंद नाही आणि मृत्यूच येणार नसल्यामुळे जीवनात असणारा थरारही नाहीसा झालेला; त्यामुळे ‘तुम्ही देव बनू नका’ असा संदेश देवच देतो, अशी गमतीदार कल्पनाही ते मांडतात. त्यांच्या व्यक्तिरेखाही कधी सरळ-साध्या तर कधी व्यामिश्र, कधी कणखर तर कधी मोडून पडणार्‍या, कधी चैतन्यदायी तर कधी उदास असतात.

      विज्ञानकथेतील पार्श्वभूमी अधिक कल्पकतेने रंगवावी लागतेच. कारण, येथे जबाबदारी वाढलेली असते. कृतकतेचा धोका निर्माण झालेला असतो. पण मुळात समस्या विज्ञानाधिष्ठित असायला हवी. त्यामुळे व्यक्तिरेखांचे उन्नयन-अधःपात, घडणे-बिघडणे हवे; तरच त्याला विज्ञानकथा म्हणता येईल. मुळात कलात्मकतेला पर्याय नाही. लक्ष्मण लोंढे यांच्या कथा या ‘कथा’ म्हणून उत्तम दर्जाच्या आहेत. त्यातील ‘विज्ञान’ हा भाग त्या अनुषंगाने सहज येतो.

     विज्ञान हेच ‘जालीम औषध’ वा ‘विज्ञान भस्मासुर’ असा कुठलाही अट्टहासी पवित्रा ते घेत नाहीत. विज्ञानाचे भले-बुरे पैलू ते समोर आणतात. ते ‘नैतिकता’ हे मूल्य मानतात. धर्म, न्याय, राजसत्ता यांप्रमाणे विज्ञानाकरिता अशी एखादी आदर्श सत्ता असावी, की जी संपूर्ण मानवजातीचा साकल्याने आणि दूरदृष्टीने विचार करील अशी कल्पना ते मांडतात.

     विज्ञान हे दुधारी शस्त्राप्रमाणे आहे. त्याचा वापर तारतम्याने व्हायला हवा. त्यासाठी वैज्ञानिक साक्षरता वाढवणे, पूर्वग्रहरहित दृष्टी असणे, शाश्वत मानवी मूल्यांची कसोटी असणे, यासाठी संपूर्ण जीवसृष्टी - मानववंश यांचा विचार त्यांना अभिप्रेत आहे.

     माणसाला बुद्धीची देणगी मिळालेली असेल, तर भावना हे एक वरदान आहे. त्याच मानवाला एक उंची प्राप्त करून देतात. हे सर्व सांगणारी त्यांची भाषाशैली ओघवती व रसाळ आहेच, पण अतिशय नेमकेपणा पोहोचवणारी आहे. त्यासाठी ‘हिमदिव्य’सारखा शब्द वापरून ते ध्रुवप्रदेशातील थंडी जाणवून देतात. कधी ते तटस्थपणे भाष्य करतात, तर कधी मिस्कीलपणे समाजाचा आणि पृथ्वीचाही जणू एक उभा छेद घेऊन ते प्रत्येक पातळीवरील संघर्ष दाखवतात.

     निसर्गप्रेम

     ‘निसर्ग’ हा त्यांच्या आत्म्याचा गाभा आहे. त्या दृष्टीने ते कृतिशील आहेत. जाणकार रसिकांचा गट घेऊन ते निसर्गरम्य ठिकाणी जातात आणि आपण मानलेल्या पंचमहाभूतांशी आणि त्यापासूनच बनलेल्या आपल्या शरीराशी जिव्हाळ्याचे संबंध, पर्यावरणाशी असलेले नाते, सारे ते उलगडून दाखवतात. जग आहे त्यापेक्षा थोडेतरी सुंदर करून जाणे - हेच त्यांचे तत्त्वज्ञान!

     विज्ञानकथा लेखक म्हणून ते विशेष परिचित असले, तरी त्यांनी सामाजिक कथा, एकांकिका, नभोनाट्य, बालवाङ्मय, विज्ञान कादंबरी, ललित गद्य, प्रवासवर्णन, वृत्तपत्रीय स्तंभ-लेखन असे विविध साहित्यप्रकार हाताळले आहेत. ते विज्ञान-कथा-कथनही करतात.

     त्यांना पाच वेळा राज्यशासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीबद्दलचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांत ‘२२ जुलै १९९५’ आणि ‘दुसरा आइन्स्टाइन’ (१९८९) या विज्ञान कथांबरोबरच ‘लक्ष्मणझुला’- ललितगद्य, ‘धर्मयोद्धा’-लघुकथा, ‘ध...ध...धाडसाचा’ बालवाङ्मय हे वेगळे प्रकारही समाविष्ट आहेत.

     कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे दिला जाणारा कथावाङ्मयाचा पुरस्कार त्यांना २००५ व २००८मध्ये मिळाला.

जगातील सर्वोत्कृष्ट विज्ञान-कथासंग्रह - युनिव्हर्सिटी ऑफ कॅन्सासमध्ये ‘दुसरा आइन्स्टाइन’ ही एकमेव भारतीय कथा निवडली गेली.

     २००५मध्ये ब्राझील येथे भरलेल्या विज्ञानप्रसारकांच्या  जागतिक परिषदेत त्यांनी ‘विज्ञान प्रसारकांचे समाजाच्या विज्ञान-शिक्षणात स्थान’ या विषयावर शोधनिबंध सादर केला.

     त्यांच्या कथांचे भारतीय भाषांमध्ये आणि इंग्लिश, जर्मन, चिनी भाषांमध्येही अनुवाद झालेले आहेत. तसेच त्यांचे लेखन पाठ्यपुस्तकातही समाविष्ट करण्यात आलेले आहे.      

     मानवी मनाच्या समृद्धीसाठी ललित कथा, आनंदासाठी निसर्ग आणि बुद्धीच्या विकासासाठी विज्ञानदृष्टी हवी आणि यांचे एकजीव रसायन त्यांच्या लेखनात आढळते.

     - प्रा. मीना गुर्जर

लोंढे, लक्ष्मण बाळकृष्ण