मोरे, नारायण रामचंद्र
नारायण रामचंद्र मोरे यांचा जन्म नवेदरबेली (अलिबाग) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण रेवदंडा येथे व नंतर मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण अलिबाग येथे झाले.
शालेय वयापासूनच त्यांना काव्यलेखनाची आवड निर्माण झाली. खानापूर येथून प्रसिद्ध होणार्या ‘लोकमित्र’ या मासिकात ‘कवितेस प्रणयपत्रिका’ ही त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली. त्यानंतर अनेक मासिकांतून त्यांचे काव्यलेखन प्रसिद्ध होत होते. १९२५ पासून १९३२ पर्यंत ते मासिक ‘मनोरंजन’चे प्रथम सहसंपादक आणि नंतर कार्यकारी संपादक होते. त्यानंतर त्यांनी आपली स्वतःची ‘नवजीवन’ आणि ‘सुवर्ण’ ही मासिके अनेक वर्षे उत्तम प्रकारे चालवली. ‘अशोक’ या टोपणनावाने मासिक ‘मनोरंजन’मध्ये अनेक लघुकथा कित्येक स्फुटलेखही त्यांनी लिहिले; पण त्यांना खरी ओढ होती ती कवितेचीच!
कवी माधव (माधव केशव काटदरे) यांच्यामुळे मोरे यांना इतिहासाची आणि काव्याची गोडी निर्माण झाली. तसेच त्यांच्या संगतीत कविताही अधिक विकसित झाली. १९२३-२४च्या सुमारास वयाच्या केवळ विसाव्या वर्षी मोरे यांनी चारचारशे पानांची दोन खंडकाव्ये लिहिली. मुरारबाजी देशपांडे यांच्यावर ‘संग्रामसिंह’ आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्फूर्तिप्रद पराक्रमावर ‘शिवशार्दुल’- ही दोन्ही काव्ये महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय झाली होती.
स्वभावाने भिडस्त, शालीन, प्रसिद्धिपराङ्मुख असलेले मोरे सार्वजनिक सभासंमेलनांत, कवींच्या मेळाव्यात फारसे नसायचेच; कारण सतत चौदा वर्षे त्यांना ध्यास होता तो ‘शिवायन’ या महाकाव्याचा!
“शिवाजी महाराजांचे संपूर्ण चरित्र अजून काव्यात कोणी लिहिले नाही. ही गोष्ट मराठी कवींना खासच स्पृहणीय नाही.” असे १९५२मध्ये शिवराज्याभिषेकानिमित्त मुंबईत शिवाजीपार्कवर भरलेल्या सभेत, प्रा.कृ.पां. कुळकर्णी यांनी विधान केले. सभा संपल्यावर बाहेर पडताक्षणीच कवी नारायण मोरे यांनी निश्चय केला की, मी शिवाजी महाराजांचे संपूर्ण चरित्र काव्यबद्ध करणार आहे. अखेर चौदा वर्षांच्या अखंड परिश्रमानंतर ८२७६ पद्यसंख्या असलेले, चंद्रकांता वृत्तातील ‘शिवायन’ हे महाकाव्य त्यांनी लिहिले. सुप्रसिद्ध संगीतकार स्नेहल भाटकर यांनी ‘शिवायन’मधील सर्गांना सुमधुर चाली लावल्या. प्रसंगानुकूल, सहजसुंदर, ओघवत्या भाषेतील हे काव्य आचार्य अत्रे यांना खूपच आवडले. ते मोरे यांचा उल्लेख ‘महाकवी’ असा करीत. अत्रे नेहमी म्हणायचे. “शिवायन म्हणजे मोरे आणि मोरे म्हणजे शिवायन!”