Skip to main content
x

हर्षे, माई

     पश्चिम महाराष्ट्रातील पराडकर नावाच्या एका शिक्षकाच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. सात भावंडातील हे मोठे अपत्य. लग्न लवकर झाले. त्यांचे पती लवकर मृत्यू पावले. त्यांच्या आत्यांनी माईंना शिक्षणासाठी आपल्या घरी आणले. पण मॅट्रिक होण्यापूर्वीच त्यांना शाळा सोडावी लागली कारण त्यांच्या वडिलांना अर्धांगाचा झटका आला. आपल्या आई-वडिलांची, भावंडांची जबाबदारी स्वीकारून सेवासदनमध्ये शिक्षिकेचे प्रशिक्षण घेतले. यवतमाळला शिक्षिकेची नोकरी केली. भावंडांचे शिक्षण पूर्ण केले.

     उत्तम शिक्षिका म्हणून त्यांचा लौकिक होता. मुलांबद्दल जिव्हाळा आणि दुसऱ्याला मदत करण्याचा त्यांचा स्वभाव त्यामुळे अडचणीत असलेल्या एका मुलाला, मुलीला त्यांनी सांभाळले. चौंडीकर बाईंना आसरा दिला. या सर्वांनी त्यांचे हे नाते जपले हे विशेष.

     अमरावतीला मुलींचे पहिले विद्यालय शासनातर्फे काढण्यात आले. शेजारी वसतिगृहाचीही व्यवस्था होती. सुरूवातीला मुख्याध्यापिका व मेट्रन अँग्लो इंडियन होत्या. पण मराठी मुलींशी संवाद साधण्याच्या दृष्टीने त्या मराठी असणे अगत्याचे होते. म्हणूनच माईंची मेट्रन म्हणून नेमणूक झाली. मुलींना आनंद झाला. माई स्वभावाने प्रेमळ पण त्यांची शिस्त कडक. मुलींनी शांतपणे अभ्यास करणे, संध्याकाळी प्रार्थना, अभंग म्हणणे यावर त्यांची नजर असे. त्यांना ‘स्वच्छ, रूचकर जेवण मिळावे’ याकडे त्यांचे लक्ष असे. आपले जेवण मात्र त्या स्वतःच बनवायच्या. त्यांना गाण्याची, खेळण्याची हौस होती.

      १९४३ मध्ये माई निवृत्त झाल्या. काही दिवस त्यांनी सरकारच्या नर्सेस ट्रेनिंग सेंटरवरही देखरेखीचे काम केले. पुढे तेही बंद झाले. थोडे दिवस शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्याबरोबर मागास वस्तीत साक्षरता प्रसाराचे काम केले. ताराबाईंनी अमरावती सोडले. पण माईंना स्वस्थ बसवेना.

      अमरावतीतल्या आपल्या शाळेतील शिक्षिकांच्या लहान मुलांना शिकविण्याचे काम त्यांनी स्वीकारले. त्यामुळे शिक्षिका निर्धास्त झाल्या. ५,६ मुलांना घेऊन वयाच्या साठीतही नव्या जोमाने त्यांनी ‘बालशिक्षण मंडळ’ याची मुहूर्तमेढ रोवली. शाळेसाठी लागणारी पुस्तके व साधने, लागणारा पैसा त्यांनी पेइंग गेस्ट ठेवून मिळविला. शाळेच्या गरजा जशा वाढू लागल्या तसा मार्ग माईंनी काढला. त्यांना चौंडीकर बाई, विद्याधर देशपांडे, राजवाडे पतिपत्नी यांचे साहाय्य मिळाले. राजवाडे यांनी खापर्डे बगीचातील त्यांच्या प्लॉटवर एक मोठा हॉल व दोन खोल्या बांधून दिल्या. शाळा स्थिरावली, मुलांची संख्या वाढू लागली. मुलांच्या विकासात शाळेबरोबर त्यांच्या मातांचाही सहभाग आवश्यक आहे हे त्यांना जाणवले. शाळेत काही उपक्रम चालू केले. वाचनालय, गृह विज्ञानाचे वर्ग, प्रथमोपचाराचे वर्ग सुरू केेले. त्यांच्या ख़ेळाचीही सोय केली. मातांचा विकास झाला तर मुलांच्या सर्वांगीण विकासास चालना मिळेल हाच त्यामागचा हेतू होता.

      शाळा एक खांबी तंबू न राहता त्याला व्यापक स्वरूप यावे यासाठी संस्थेची रीतसर नोंद केली. तिची घटना लिहिली. कार्यकारी मंडळाची निवड झाली. त्यात दादासाहेब राजवाडे, निळूभाऊ, राजदेकर यांची निवड झाली. अशा रीतीने ‘बालशिक्षण मंडळ’ ही संस्था स्थापन झाली.

      शाळेची फी नाममात्र होती. सकाळच्या कल्याण केंद्रामध्ये मुलांना दूध व कडधान्यही दिले जाई. मुलांची संख्या वाढू लागली. इयत्ता पहिली, दुसरी नंतर तिसरीची गरज भासू लागली. माईंची शिक्षणाविषयीची तळमळ, अखंड प्रयत्न व जिद्द पाहून समाजही त्यांना मदत करू लागला. शाळेजवळ राहणाऱ्या ‘रियासतबी’ या मुसलमान स्त्रीने आपले स्वतःचे  घर रू. ४०,०००/- ना देऊ केले. पण माई डगमगल्या नाहीत. विविध मार्गांनी त्यांनी काही पैसा उभा केला व उरलेला दर महिन्याच्या बचतीतून फेडण्याचे मान्य केले. शेजारी राहणारे राजवाडेबंधू हेही आपल्या मुलांकडे राहावयास जाणार असल्याने त्यांचे घरही ४०,००० रु. ना विकत घेतले. कर्जफेड अर्थातच हप्त्याहप्त्याने. पण आपणास पूर्ण रक्कम मिळणार याचा (माईंविषयी) त्यांना पूर्ण विश्‍वास होता. पुढे भागिरथीबाई कलंत्री यांनी देणगी दिली. मात्र यावेळी त्यांच्या अटीनुसार शाळेचे नाव भागीरथीबाई कलंत्री बालक मंदिर असे झाले. शाळा इयत्ता चौथी पर्यंत वाढली. पुढे अनेक तुकड्याही काढल्या. शाळेच्या विस्तारात अमरावती येथील शिक्षणप्रेमी मंडळी, दरवर्षी सिनेमाच्या तिकिटांची विक्री करणाऱ्या भगिनी, पालकवर्ग आणि अल्पवेतनावर काम करणाऱ्या शिक्षिका या सर्वांचा सहभाग होता.

      शाळेचे कार्य, यश हे केवळ समाजाच्याच नव्हे तर शासनाच्याही नजरेत भरले. शाळेला शिक्षणखात्याकडून ६६% अनुदान मिळू लागले. शाळेच्या वाढीस चालना मिळाली. स्टेजसारखा उपयोग करता येईल असा हॉल बांधला. तेथे मुलांचे कार्यक्रम होत, प्रदर्शन असे.

     संस्था चांगली चालली म्हणून माई स्वस्थ बसल्या नाहीत. अमरावतीला भाजीबाजारामध्ये लक्ष्मीनारायण मंदिराच्या जागेमध्ये शाळा सुरू केली. पालक मुलींना महाविद्यालयामध्ये पाठवत नाहीत हे लक्षात घेऊन ‘किशोरी मंडळ’ काढले. तिथे मुलींच्या सुप्त गुणांना वाव मिळाला. त्यातल्याच एक भगिनी विमलाताई हिर्लेकर (पूर्वाश्रमींच्या विमल नगरनाईक) अधिकार वाणीने ज्ञानेश्‍वरीची प्रवचने करू लागल्या. अशा कामासाठी अनेक माणसांची मदत लागते. माणसे जोडणे, त्यांच्याकडून काम करवून घेणे ही फार मोठी कला त्यांना साध्य होती.

- रोहिणी  गाडगीळ

हर्षे, माई