Skip to main content
x

आठवले, जयंत बाळाजी

     कोणिसाव्या शतकात इंग्रजांनी या देशावर आपले राज्य स्थापन करून ख्रिस्ती धर्माचा व इंग्रजी भाषेचा प्रसार केला. भोगवादी पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा भारतीयांवर पडून भारतीय संस्कृती व हिंदू धर्मावर काळे मेघ दाटले. सत्ता व खुर्चीच्या लोभापायी राज्यकर्ते आपली थोर भारतीय संस्कृती व हिंदू धर्माप्रती आपले मूलभूत कर्तव्य विसरले. अशा कठीण प्रसंगी काही त्यागी हिंदू विद्वानांनी भारतीय संस्कृती व हिंदू धर्म यांचे रक्षण करण्याचा विडा उचलला. या त्यागी विद्वानांमध्ये डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. जयंत आठवले यांचा जन्म त्यांच्या आजोळी, रायगड जिल्ह्यातील नागोठणे या गावी झाला. त्यांना तीन भाऊ होते. जयंताचे वडील शाळेत शिक्षक होते. विद्यार्थ्यांना ते मन लावून शिकवीत, त्यामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये अतिशय प्रिय होते. जयंता लहानपणापासूनच अतिशय हुशार. वडिलांच्या सुयोग्य मार्गदर्शनामुळे त्याने वर्गातील पहिला क्रमांक कधी सोडला नाही. अभ्यासाशिवाय अन्य उपक्रमांमध्येही त्याने भाग घेऊन आपल्या बुद्धीची चमक दाखविली.

     ड्रॉइंगच्या ‘एलिमेंटरी’ व ‘इंटरमीडिएट’ या परीक्षा व हिंदीच्या ‘कोविद’ या परीक्षेत त्याने पहिला क्रमांक सोडला नाही. त्याने अनेक छंद जोपासले होते. मर्फी रेडिओद्वारे आयोजित निबंध स्पर्धेत त्याने मराठी विभागात ५० रुपयांचे बक्षीस पटकावले. जयंतने इयत्ता सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश मिळविले. विद्यालयाच्या ‘आर्य’ या नियतकालिकासाठी त्याने अनेक लेख लिहिले व दोन वर्षे सहसंपादक म्हणूनही काम पाहिले.

     स्कूल पार्लमेंटमध्ये मुलांनी त्याला मंत्री म्हणून निवडून दिले. जयंत बुलबुलतरंग, हार्मोनिअम आणि माउथ ऑर्गन ही वाद्येही सहजतेने वाजवी. फोटोग्रफी व पोहणे यांचीही त्याला आवड होती. त्याचे शालेय शिक्षण मुंबईच्या गिरगाव येथील आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात झाले. विल्सन महाविद्यालयातून प्रथम वर्ष व जयहिंद महाविद्यालयातून द्वितीय वर्ष उत्तम रितीने उत्तीर्ण केल्यानंतर जयंतरावांनी १९६१ साली ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला व १९६४ साली ते एम.बी.बी.एस. उत्तीर्ण झाले. १९६४-६५ या सालात नियमानुसार इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र मिळाले.

     एम.बी.बी.एस. उत्तीर्ण झाल्यानंतर चार वर्षांनी डॉ. जयंत आठवले इंग्लंडला रवाना झाले. त्या वेळी विदेशी चलनाची स्थिती फारच गंभीर होती. त्यामुळे त्यांना अत्यंत काटकसरीने दिवस कंठावे लागले. कधी पाव, पिझ्झा, बिस्किटे व केक खाऊन, दूध पिऊन त्यांना झोपावे लागे. कारण, मिळणारा पगार अत्यंत कमी व आठवड्यातून एकदा मिळत असे. १९७८ साली डॉ. जयंत इंग्लंडहून भारतात परतले.

      डॉ. जयंत आठवले यांच्या अभ्यासाचा प्रवास : १९६५ ते १९६७, स्थूलदेहाशी संबंधित अभ्यास (एम.डी. मेडिसिन); १९६८ ते १९७०, मनोदेहाशी संबंधित अभ्यास (मनोविकार); १९७१ ते १९८६, चित्ताशी संबंधित अभ्यास (संमोहनशास्त्र), १९८७ पासून आत्म्याशी संबंधित अभ्यास: गुरुप्राप्तीनंतरची साधना असा प्रवास झाला.

     मानसशास्त्राप्रमाणेच बरेचसे रुग्ण संमोहनशास्त्रानेही बरे होत नाहीत असे आढळून आल्यानंतर डॉ. आठवले अध्यात्माकडे वळले. त्यांनी अध्यात्माचा अभ्यास केला. प.पू. मलंगबाबा, प.पू. विद्यानंद, प.पू. करंदीकर, प.पू. भक्तराज महाराज या महाराजांकडे जाऊन त्यांनी अध्यात्माचे बरेच ज्ञान प्राप्त केले. १९९५ साली डॉ. जयंत आठवले भक्तराज महाराजांच्या अमृत महोत्सवानिमित्त पंधरा दिवस इंदूरला राहिले. त्या वेळी महाराजांनी त्यांना कृष्ण-अर्जुनाचे महत्त्व व मोठेपण सांगितले व त्यांच्या हातात कृष्णार्जुन असलेला चांदीचा रथ दिला व म्हणाले, ‘‘गोव्याला आपले कार्यालय होईल, तिकडे ठेवा.’’

     प.पू. भक्तराज महाराजांसारखे गुरू मिळाल्यावर डॉ. आठवले नामस्मरण, साधना, बाबांच्या तत्त्वांचे आचरण व बाबांचे कार्य करू लागले. त्यातच त्यांना आनंद मिळू लागला. बाबांचा अध्यात्म-प्रसार करणे त्यांना आवडू लागले. डॉ. आठवले यांनी ‘गुरुकृपायोग’ हा सर्वांत सोपा, सहज व जलदगतीने आध्यात्मिक प्रगती करणारा योग सांगितला. स्वत: या साधना-मार्गाचा अवलंब करून नंतर इतरांकडून तो करवून घेतला. गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अंदाजे ३३ साधक अल्पावधीतच संतपदाला पोहोचले. प.पू. भक्तराज महाराज यांचा आशीर्वाद घेऊन डॉ. जयंत आठवले यांनी १९९० साली ‘सनातन संस्थेची’ स्थापना केली. ‘नित्य नूतन: सनातन: ।’ म्हणजे जे नित्यनूतन आहे, चैतन्य आहे, कधी जुने-पुराणे होत नाही, त्याला ‘सनातन’ म्हणतात. सनातन संस्था म्हणजे जगभरातील सर्व धर्म व पंथांतील साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी कार्यरत असलेली चैतन्यमय संस्था!

     सनातन संस्थेच्या कार्याचे उद्देश :

१) जिज्ञासूंना साधना सांगणे,

२) साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी वैयक्तिक मार्गदर्शन करणे.

३) जगभर हिंदू धर्म आणि अध्यात्मशास्त्र यांचा वैज्ञानिक परिभाषेत प्रसार करणे.

४) हिंदू समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या जागृतीचे सेवाभावी कार्य करणे.

५) भारतात साधना करण्यास पोषक असे ‘ईश्वरी राज्य’ म्हणजे धर्माधिष्ठित ‘हिंदू राष्ट्र’ स्थापन करणे.

     डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली १५,००० साधक तन-मन-धनपूर्वक साधना करीत आहेत. तसेच ते समष्टी साधना म्हणून हिंदू समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताचे कार्य करीत आहेत.

     डॉ. जयंत आठवले यांनी जीवनाच्या सर्वांगांना स्पर्श करणार्‍या अलौकिक ग्रंथसंपदेची निर्मिती केली आहे. अध्यात्मशास्त्री, देवतांची उपासना, साधना, आचरपालन, बालसंस्कार, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, ईश्वरप्राप्तीसाठी कला इत्यादी विविध विषयांवरील सनातन निर्मित २११ ग्रंथांच्या ११ भाषांमध्ये ५६ लाख प्रती प्रकाशित झाल्या आहेत.

     समाजाला धर्मशिक्षण मिळावे यासाठी सनातन संस्था ‘सत्संग’, ‘अध्यात्मविषयक प्रवचने’, ‘बालसंस्कार वर्ग’ इत्यादी माध्यमांतून अध्यात्मप्रसाराचे कार्य करीत आहे. सनातन संस्थेच्या माध्यमातून शाळांमधून ‘नैतिक मूल्यांचे संवर्धन’, ‘आध्यात्मिक प्रश्नमंजूषा’ इत्यादी  उपक्रम राबविले जात आहेत. हिंदूंना धर्मशिक्षण मिळावे म्हणून देवळांमध्ये सनातन संस्थेने नि:शुल्क धर्मशिक्षण फलक लावले आहेत. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, होळी इत्यादी सार्वजनिक उत्सवांतील गैरप्रकार रोखणे, देवतांचे विडंबन रोखणे, धर्मांतर रोखणे इत्यादी महत्त्वाच्या धर्मरक्षणाच्या कार्यांत सनातन संस्थेचे साधक भाग घेतात. ‘इलेक्ट्रोसोमॅटोग्रफिक स्कॅनिंग’ या तंत्रज्ञानाच्या आधारे मांसाहार सेवन व शाकाहार सेवन, मद्यपान, पाश्चात्त्य संगीत आणि भारतीय संगीत ऐकणे इत्यादींचा, व्यक्तींच्या शरीरातील षट्चक्रावर काय परिणाम होतो, याचा सनातनने विविध प्रयोगांद्वारे अभ्यास केला. या प्रयोगांद्वारे साधना करण्याचे महत्त्व, तसेच हिंदू आचार, हिंदू संगीत, हिंदू संस्कृती आदींचे महत्त्व सिद्ध झाले आहे.

     ‘पॉलिकॉन्ट्रॉस्ट इंटरफिअरन्स फोटोग्रफी’ या तंत्रज्ञानाद्वारे सनातनने हिंदू धर्मशास्त्रानुसार बनविलेली देवतांची चित्रे आणि गणेशमूर्ती यामध्ये अधिक सात्त्विकता असल्याचे सिद्ध झाले. तसेच, या तंत्रज्ञानाद्वारे संतांची छायाचित्रे, त्यांच्या वापरातील वस्तू आणि खोली, तसेच यज्ञकुंड, साधना करणारी व्यक्ती इत्यादींतील सात्त्विकता सप्रमाण सिद्ध झाली आहे.

     ‘इलेक्ट्रो स्कॅनिंग मेथड’, ‘गॅस डिस्चार्ज्ड व्हिज्युअलायझेशन’ आणि ‘रेझोनन्ट फिल्ड इमेजिंग’ या वैज्ञानिक उपकरणांद्वारे वाईट शक्तींचे त्रास, संतांच्या सात्त्विकतेचा वस्तूंवर होणारा परिणाम यांसारखे अध्यात्मशास्त्राचे महत्त्व सिद्ध करणारे संशोधन सनातनने केले आहे. ‘सनातन संस्थे’ने केलेले आध्यात्मिक संशोधन ऑस्ट्रेलियातील ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउण्डेशन डॉट कॉम’ या संकेतस्थळाने उपलब्ध केले आहे. यामुळे हजारो परदेशी नागरिक हिंदू धर्मानुसार साधना करू लागले आहेत.

     सात्त्विक रांगोळी, सात्त्विक मेंदी, सात्त्विक अक्षरे इत्यादी विषयांतही सनातनने संशोधन केले आहे. ‘सात्त्विक रांगोळी’ आणि ‘सात्त्विक मेंदी’ हे ग्रंथही सनातनने प्रकाशित केले आहेत. धार्मिक विधींचा आध्यात्मिक लाभ होण्यासाठी पुरोहित हे सात्त्विक, तसेच प्रत्येक विधी साधना म्हणून करणारे असणे आवश्यक असते. असे साधक-पुरोहित हिंदू समाजाला देण्यासाठी सनातन ही पाठशाळा चालवते. हे पुरोहित केवळ विधी करीत नाहीत, तर यजमानाला त्या विधीच्या संदर्भातील धर्म-शिक्षणही देतात.

    प्राचीन ‘गुरु-शिष्य’ परंपरेचे जतन करण्यासाठी ‘सनातन संस्थे’कडून भारतात दरवर्षी अंदाजे १५० गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन केले जाते. प.पू. डॉ. जयंत आठवले यांनी हिंदु संघटन, राष्ट्र रक्षण आणि धर्म जागृती या तीन कार्यांना वाहून घेतले. हिंदूधर्म, देवता, धर्मग्रंथ, संत आणि राष्ट्रपुरुष या हिंदू समाजाच्या श्रद्धास्थानांच्या हेटाळणीच्या विरोधात आवाज उठविण्याचे स्फुल्लिंग त्यांनी समाजात चेतविले.

    समाजाला राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती करायला शिकवायची, तर समाजमनावरील निष्क्रियतेची काजळी सातत्याने पुसून वैचारिक क्रांतीचा वन्ही पेटविण्याचे माध्यम हवे, म्हणून त्यांनी ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह स्थापन केला. या माध्यमातून सध्या मराठी भाषेतील दैनिकाच्या चार आवृत्त्या, मराठी व कन्नड भाषांतील साप्ताहिक, तसेच हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषांतील मासिके चालू आहेत.

प्रा. नीलकंठ पालेकर

आठवले, जयंत बाळाजी