Skip to main content
x

जोशी, नारायण हरिपंत

साखरे, नानामहाराज

ज्ञानेश्वरी, भागवतगाथा या ग्रंथांतील वचनांचे अखंड व्यासंगी श्री नानासाहेब साखरे हे थोर सत्पुरुष होत. साखरे महाराजांच्या ज्ञानेश्वरी पाठास पुष्कळ श्रीमंत व विद्वान लोक येत असत. वारकरी मंडळी, वासकरांच्या फडातील भाऊ काटकर, गंगूकाका, नाना चितळे, सातारकर, भावे, कोल्हापूरकर, कृष्णबोवा श्रीगोंदेकर, सखाराम मास्तर, अप्पाराव वैद्य, तात्यासाहेब खासगीवाले, वासुदेवबुवा गोसावी, कृष्णाजीपंत भिडे, गणपतबोवा भिंगारकर, विष्णूबुवा जोग इत्यादी हरिभक्तपरायण मंडळी, प्रसंगोत्पात श्री नाना- महाराजांच्या ज्ञानेश्वरीच्या पाठास श्रद्धापूर्वक येत. त्यांच्या व्याख्यानाचा मोठ्या कौतुकाने गौरव करीत असत. यावरून नानामहाराजांच्या मुखातून निघालेल्या ज्ञानेश्वरीच्या अर्थाचे किती महत्त्व होते ते कळून येते.

ब्रह्मीभूत नानामहाराज साखरे प्रणीत श्रीसंतग्रंथरत्नमाला’, अर्थात सार्थ ज्ञानेश्वरी’, ‘अमृतानुभव’, ‘चांगदेव पासष्टी’, ‘गाथापंचकइत्यादी ग्रंथांचे प्रकाशन शके १८२३ पासून सलग २५ वर्षे व पुढेही चालू राहिले. नानामहाराज साखरे कृत सार्थ ज्ञानेश्वरीच्या कितीतरी आवृत्त्या निघाल्या. सदाशिव पेठेतील श्री. आवटे हे संतग्रंथ प्रकाशक होते. ते परमश्रद्धेने हे प्रकाशन करीत.

नानामहाराजांच्या वंशजांना साखरेनाव का व कसे पडले हे जाणून घेणे उद्बोधक असून महत्त्वाचेही आहे. चिमाजीअप्पांचे खासगी कारभारी रामचंद्रपंत जोशी होते. ते एके रात्री घोड्यावरून जात असताना बुधवार पेठेत, पासोड्या मारुतीच्या देवळात चालू असलेले अच्युतराव महाराजांचे कीर्तन ऐकत क्षणभर उभे राहिले. ज्ञान-भक्ती-वैराग्ययुक्त अप्रतिम वक्तृत्व ऐकून रामचंद्रपंतांना उपरती झाली. त्यांना संतती नव्हती. दुसर्‍या दिवशी अच्युतमहाराजांकडे जाऊन त्यांनी अनुग्रह मागितला. तेव्हा अच्युतराव म्हणाले, ‘‘बाबा, आम्ही गरीब आहो... परमार्थाला द्रव्य फार प्रतिबंधक आहे.’’ लगेचच रामचंद्रपंत जोश्यांनी २१ लाख रुपयांवर उदक सोडले व हौदातले पाणी भरून आणले.

अच्युतराव महाराजांनी उपदेश देऊन ज्ञानेश्वरी ग्रंथाचे त्यांच्याकडून अध्ययन करविले आणि २१ लाख रुपये ब्राह्मण भोजनात खर्च कर म्हणून सांगितले. पुणे व आळंदी येथे ब्राह्मण भोजनाचे कार्यक्रम पार पडल्याने तिथल्या व्यापार्‍यांच्या दुकानात तूप व साखर मिळेनाशी झाली. तेव्हापासून जोशींचे नाव साखरेबोवापडले.

साखरेबोवा शनिवार मारुतीसमोर आंग्रेवाड्यात राहत. त्यांच्या भाऊबंदांपैकी गोविंदपंत जोश्यांचे चारी मुलगे त्यांचे शिष्य झाले. साखरेबोवांविषयी गुरुभक्ती अप्रतिम होती. साखरेबोवा, अर्थात रामचंद्रपंतांनी संन्यास घेतला व आपले संस्थान बाराशे शिष्यांपैकी हरिपंत व पंढरी या जोशी बंधूंस दिले. तेव्हापासून या जोश्यांच्या घराण्यास साखरे नाव पडले. रामचंद्रपंत पुढे समाधिस्थ झाले तेव्हा त्यांच्या या पट्टशिष्यांनी त्यांच्या इच्छेनुरूप त्यांची समाधी आळंदीस, सिद्धबेटात नेऊन दिली. रामचंद्रपंतांच्या संस्थान (देवस्थान) चा उत्सव श्री नानामहाराज साखरे-जोशी यांच्या वंशाकडे चालू आहे.

हरिपंतांचे संसाराकडे अजिबात लक्ष नसे. त्यांच्या मुलांना वळण लावण्याचे, त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करण्याचे काम हरिपंतांचे बंधू पंढरी यांनी उत्तम प्रकारे केले. पंढरी अविवाहित होते. त्यांनी नानामहाराजांकडून ज्ञानेश्वरी सांगण्या-वाचण्याचे काम करविले. १२-१५ वर्षे असा अभ्यास झाल्यामुळे तो ग्रंथ नानामहाराजांना मुखोद्गत झाला. स्वप्नातही नाना ज्ञानेश्वरीचा अर्थच बरळत असत. गुरुकृपेने त्यांच्या वक्तृत्वास मोहकपणा, माधुर्य आले.

नानामहाराजांनी सारे आयुष्य ज्ञानेश्वरीच्या अध्ययन-अध्यापनात घालविले. नानामहाराजांचे पूर्ण नाव (नारायण हरिपंत साखरे-जोशी) होते. त्यांच्या चिरंजीवांनी (विनायक नारायण जोशी-साखरे) नानामहाराजांचे कार्य पुढे चालविले. १९६९ साली नानामहाराज प्रणीत ज्ञानेश्वरीची तेरावी आवृत्ती प्रसिद्ध झाली. यावरून या ग्रंथाची लोकप्रियता किती अपार होती हे समजून येते. त्यांनी सार्थ ज्ञानेश्वरीबरोबरच अमृतानुभव’, ‘चांगदेवपासष्टी’, ‘गाथापंचकइ. ग्रंथांचे संपादन केले. एकनाथी भागवतार्थपारायणीय तुकारामगाथाप्रसिद्ध करून त्यांनी भक्तगणांची मोठीच सोय केली.

वि.ग. जोशी

संदर्भ
१. प्रस्तावना, ‘सार्थ ज्ञानेश्वरी’; आवृत्ती तेरावी,१९६९.
जोशी, नारायण हरिपंत