Skip to main content
x

चन्ने, चंद्रकांत लक्ष्मण

चित्रकार 

चित्रकार चंद्रकांत लक्ष्मण चन्ने हे कला इतिहासाचे अभ्यासक व प्रसारक म्हणून कार्यरत असले तरी प्रामुख्याने ‘बसोली’ या बालचित्रकला-विषयक कला चळवळीतील लक्षणीय कार्याबद्दल प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म लक्ष्मणराव व इंदिराबाई यांच्या पोटी चिमूर येथे झाला. त्यांचे वडील भंडार्‍याला एका मुसलमान व्यापार्‍याकडे मुनीम होते. विदर्भ बुनियादी शाळा, चिमूर येथे चौथीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर चंद्रकांत चन्ने पुढील शिक्षणासाठी शेजारच्या देवरावजी भाऊ सोबत नागपूरला आले.

सी.पी. अ‍ॅन्ड बेरार शाळेतील गाडगे मास्तरांनी शाळेच्या मासिकासाठी चित्र काढण्याची संधी चन्ने यांना दिली, रांगोळी काढण्यास प्रोत्साहन दिले. तत्कालीन जनरीतीप्रमाणे शालेय शिक्षण संपल्यावर चन्ने यांनी मोहता विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण चित्रकलेच्या आवडीमुळे व विज्ञानात मन रमत नसल्याने अखेरीस त्यांना काकडे मास्तरांनी १९६८ मध्ये चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घेण्याची प्रेरणा दिली. त्यामुळे विज्ञान महाविद्यालयांपेक्षा वेगळ्या वातावरणामध्ये आणि त्याच काळात विदर्भ साहित्य संघाच्या विविध उपक्रमांतून त्यांचे अनुभवविश्‍व समृद्ध होत गेले.

चन्ने यांचे अभ्यासक्रमातील फोटोग्रफी, इलस्ट्रेशन सोबत असणार्‍या कला इतिहास या विषयाचे आकर्षण वाढले. १९७२-७३ मध्ये बीएफएनंतर कला इतिहास या विषयातील पदव्युत्तर अभ्यास करण्यासाठी चंद्रकांत चन्ने यांनी बडोद्याच्या सयाजीराव विद्यापीठात प्रवेश घेतला. बडोदा विद्यापीठात त्या वेळी के.जी. सुब्रमण्यन, गुलाम महंमद शेख, जेराम पटेल, रतन परिमू असे शिक्षक होते. अशा चित्रकार व अभ्यासक असलेल्या शिक्षकांच्या सहवासातून तसेच ग्रंथालय व संग्रहालयांमध्ये वेळ घालविल्यामुळे त्यांना बरेच काही शिकायला मिळाले. त्यानंतर १९७६ ते १९७८ या काळात त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे कला इतिहासाचे शिक्षक म्हणून काम केले.

चन्ने यांनी १९७८ मध्ये जे.जे. सोडून त्रिवेंद्रम, शांतिनिकेतन येथे स्थिरावण्याचा प्रयत्न केला. पण १९७९ मध्ये ते त्रिवेंद्रम सोडून नागपुरातच परतले. बडोद्यात असल्यापासूनच लहान मुलांमध्ये कलाविषयक जाणिवा वाढविण्यासंदर्भात काहीतरी करावे असे त्यांना मन:पूर्वक वाटत असे. नागपुरात परतल्यावर नानाजी देशमुखांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या ‘बालजगत’ या संस्थेत बसोली ग्रूप स्थापन करून मुलांची निरागसता जपण्यासाठी व त्यातून कला वृद्धिंगत व्हावी यासाठी ते प्रयत्नशील राहिले. ‘बसोली’च्या माध्यमांतून त्यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नृत्य, नाट्य, चित्र-शिल्प, लेखन, वाचन या कलांसाठी वाव व प्रोत्साहन दिलेे. यातून अनेक बालचित्रकार, भारत सरकारच्या ‘गुरुशिष्य’ या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले व पुढील काळात चित्रकार होण्यासाठी धडपडत राहिले. या काळात चन्ने अर्थार्जनासाठी नागपूर बच्छराज व्यास विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत होते.

बालचित्रकलाविषयक चन्ने यांच्या कार्याव्यतिरिक्त नागपूर, बडोदा, मुंबई, त्रिवेंद्रम आणि दिल्ली येथे त्यांच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. इंडोजर्मन सोसायटी, मुंबई; महाकोशल कला परिषद, रायपूर; तेरावे-चौदावे राज्य कला प्रदर्शन, १९७०-७३; दक्षिण मध्य क्षेत्र, नागपूर, २००२; बॉम्बे आर्ट सोसायटी, २००३ या प्रदर्शनांत त्यांच्या कलाकृतींना  पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना कॅम्लिन या कंपनीतर्फे आयोजित केलेल्या २००७ मधील ‘युरो टूर’साठी, त्यांच्या बालचित्रकला क्षेत्रातील कार्याबद्दल सन्मान म्हणून आमंत्रित केले होते. कलानिर्मितीबरोबरच आदिवासी भागांतील मुलांची चित्रप्रदर्शने आयोजित करणे, कलाविषयक लेखन करणे इत्यादी उपक्रमासाठी ते वेळ देतात.

‘चन्ने सिस्फा’ या नागपूरमधील कलामहाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून ते कार्यरत आहेत. स्वत:ची व विद्यार्थ्यांची सर्जनशील निर्मिती करताना अनेक कलाविषयक उपक्रमांचे आयोजन करणारा संघटक अशी त्यांची ओळख आहे. या कार्यासाठी त्यांना ‘मानव मंदिर’ या संस्थेचा ‘उत्कृष्ट संघटक’ पुरस्कार २००८ मध्ये मिळाला आहे.

- विकास जोशी

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].