Skip to main content
x

पाटील, रामगौडा अप्पासाहेब

           रामगौडा अप्पासाहेब पाटील यांनी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पशुवैद्यकीय पदवी प्राप्त केली. ते १९८०मध्ये वारणा सहकारी दूध प्रकल्पात पशु-वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांनी १९८३मध्ये वरिष्ठ पशु- वैद्यकीय अधिकारी या पदावर आणि १९८७मध्ये पदोन्नती मिळून मुख्य पशु-वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. सहकाऱ्यांना अचूक मार्गदर्शन करून प्रोत्साहित करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे १९८९मध्ये पशुवैद्यकीय विस्तारविभाग व्यवस्थापक म्हणून त्यांची निवड झाली.

           डॉ. पाटील यांची १९९२मध्ये दूध संकलन आणि विस्तार व्यवस्थापक या पदावर निवड झाली. पशुपालक व शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणे, शास्त्रीय पद्धतीने जोपासना करण्याबाबत व स्वच्छ दूध उत्पादनाबाबत मार्गदर्शन करण्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. जानेवारी २००५मध्ये त्यांची दूध संकलन विस्तार व पशुवैद्यकीय विभाग महाव्यवस्थापक या पदासाठी निवड झाली.

           डॉ. पाटील यांनी नेदरलँड येथील आंतरराष्ट्रीय कृषी केंद्रात १४ आठवड्यांचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी १९९४मध्ये इस्राएल देशात सहा आठवड्यांचे पशू उत्पादन व व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण घेतले. त्यांनी १९९७मध्ये  नेदरलँड येथे ६ महिने दूध व्यवसाय आणि दुधावरील प्रक्रियाविषयक पदविका प्राप्त केली. वारणा दूध प्रकल्पात डॉ. पाटील यांनी गावपातळीवर सहकारी दूध सोसायटी आणि दूध संकलन सुरू करायचे मूलभूत कार्य केले. व्यवस्थापकीय समितीच्या सदस्यांसाठी त्यांनी सोसायटी स्तरावर प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम हाती घेतले. दूध सोसायटीच्या सभासदांकडील जनावरांना पशुवैद्यकीय सेवा आणि कृत्रिम रेतनाची सोय उपलब्ध होण्यासाठी त्यांनी फिरती पशुवैद्यकीय पथके स्थापन केली. बेरोजगार तरुणांना दूध व्यवसायाबद्दल माहिती व प्रशिक्षण देण्याचे, तसेच दूध उत्पादकांना व्यवसाय फायदेशीर करण्याबाबतचे धडे देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. त्यांनी पशुखाद्याचा पुरवठा, वैरण विकास इत्यादी महत्त्वपूर्ण कामे केली. त्यांनी नियमित लसीकरण आणि कृत्रिम रेतनाद्वारे सुधारित, संकर पैदास यासाठी विशेष शिबिरे घेतली.

           डॉ. पाटील यांनी सुधारित पशू कळप तयार करण्यासाठी वंश परीक्षण कार्यक्रम राबवून, तसेच महिला दुग्ध व्यवसाय सहकारी नेतृत्व कार्यक्रम व स्वसाहाय्यता गट स्थापन करण्यासाठी प्रशिक्षण देणे सुरू करून दुग्ध व्यवसायाची व्याप्ती वाढवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.

- संपादित

पाटील, रामगौडा अप्पासाहेब