Skip to main content
x

हजारे, किसन बाबूराव

अण्णा हजारे

       किसन बाबूराव ऊर्फ अण्णा हजारे यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार या गावी झाला. ते अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी येथील रहिवाशी आहेत. ते १९५५मध्ये शालेय शिक्षण पूर्ण करून मुंबईला कामधंद्यासाठी गेले. ते १९६३मध्ये फुलांचा व्यवसाय सोडून सेनेत वाहनचालक या पदावर रुजू झाले. अण्णा १९६५च्या भारत-पाक युद्धात खेमकरण बॉर्डरवर कार्यरत असताना शत्रूच्या हल्ल्यातून त्यांचा जीव वाचला. त्यानंतर जीवनाची निरर्थकता जाणून आत्महत्येचा विचार करणाऱ्या अण्णांमध्ये स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकाच्या वाचनामुळे वैचारिक क्रांती झाली व जीवनाचा अर्थ कळला. त्यांनी आळंदीला ज्ञानेश्‍वर माऊलींच्या समाधीवर तुळशीमाळ अर्पण करून आपले जीवन सेवा करण्यात घालवण्याची शपथ घेतली व त्यासाठी आजन्म ब्रह्मचारी राहण्याचा निर्णय घेतला. ते १९७५मध्ये लष्करातून स्वेच्छानिवृत्ती घेऊन राळेगणसिद्धीला आले व त्यांनी ग्रामविकास कार्याला सुरुवात केली. राळेगणसिद्धी गावचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान जेमतेम ३०० मि.मी., चारही बाजूंनी डोंगर, उतारपाठी हलक्या प्रकारची जमीन अशी भौगोलिक परिस्थिती होती. दुष्काळग्रस्त गाव असल्यामुळे पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याची टंचाई होती. गावातील बहुतांश जनता, विशेषतः मागासवर्गीय उपासमारीचे जीवन जगत होते. अशातच १९७२मधल्या दुष्काळाची भर पडली. अण्णांनी या सर्व परिस्थितीची माहिती घेऊन युवकांबरोबर चर्चा केली व गावकऱ्यांना एकत्र करून श्रमदानाच्या माध्यमातून १९७२च्या दुष्काळी कामांच्या वेळी बांधण्यात आलेल्या पाझर तलावाच्या दुरूस्तीचे काम केले. त्यामुळे तलावात पाणी साठले व खालच्या विहिरीचे पुनर्भरण शक्य झाले. कृषी खात्याच्या मृदा व जल संधारण विभागाने कंटूर बंडिगचे तसेच ३५ नालाबंडांचे काम गावकर्‍यांच्या सहभागातून यशस्वीरीत्या पूर्ण केले. सामाजिक वनीकरण खात्याने सरकारी जमिनीवर व रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवडीची कामे केली. पाटबंधारे विभागाने पाझरतलावाची कामे केली. अण्णांच्या प्रेरणेमुळे या सर्व कामांना गावातून लोकसहभाग लाभला. ग्रामविकासाच्या कामांमध्ये लोकसहभागातून श्रमदान होऊ लागले. पाणलोटक्षेत्र विकासासाठी अण्णांनी चराईबंदी व कुऱ्हाडबंदी केली. अण्णांनी राळेगणसिद्धीमध्ये ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हा नारा साध्य केला. त्यामुळे पिण्यासाठी व शेतीला पाणी उपलब्ध झाले.

       पाणलोट विकासकार्यामुळे ५ सामुदायिक सिंचन विहिरी व कालव्यांवरील उपसिंचन यामुळे अनुक्रमे २५२ एकर व ५२५ एकर जादाचे क्षेत्र सिंचनाखाली आले. आधी केवळ ६० एकर क्षेत्र होते. त्यात ७७७ एकर सिंचन क्षेत्राची भर पडली. पीक पद्धतीत बदल झाले. उसासारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी कांदा पिकाचा अंतर्भाव करण्यात आला. पाणलोटक्षेत्र विकासामुळे चाऱ्याचे उत्पादनही वाढले. गावात मोठ्या प्रमाणात संकरित गाई आणण्यात आल्या. जनावरांचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे दुधाच्या उत्पन्नात वाढ झाली. दुधाचे उत्पादन ३५० लीटरहून ३००० लीटर झाले. विकासाच्या आधी दरडोई उत्पन्न रु.२७०/- होते ते १९८०मध्ये रु.२२५०/- आले. अण्णांच्याच भाषेत सांगायचे झाले तर पाणलोटक्षेत्र विकास कार्यक्रम हा ‘क्रांतिकारी’ आहे; कारण यामुळे हाताला काम व पोटाला भाकरी मिळते. या कार्यक्रमामुळेच राळेगणचे नाव जगाच्या नकाशावर आले. राळेगणसिद्धीचे पाणलोटक्षेत्र विकासाचे काम हे राज्यासाठी व देशासाठीही एक ‘आदर्श’ (मॉडेल) म्हणून झाले आहे.

       १९९२ हे ‘चले जाव’ चळवळीचे सुवर्णजयंती वर्ष होते. हे सुवर्णजयंती वर्ष सभा-संमेलने भरवून साजरे न करता अण्णांच्या राळेगणप्रमाणे विकासासाठी प्रत्येक जिल्ह्यात अशी गावे निवडावीत, अशी सूचना अच्युतराव पटवर्धन यांनी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना  केली,  त्याप्रमाणे १९९२मध्ये शासन निर्णय झाला. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने १९९५मध्ये अण्णांच्या अध्यक्षतेखाली राज्य स्तरावर समिती नेमून या आदर्श गाव योजनेस गती देण्याचे ठरवले. अण्णांनी राज्यांतील निरनिराळ्या भागांतील हजारो गावांच्या प्रमुखांना पत्रे लिहिली. त्यातील ३०० गावांमध्ये ही योजना राबवण्याचे राज्य शासनाने ठरवले. महाराष्ट्र व भारत सरकारच्या सूचनेप्रमाणे अण्णांच्या अध्यक्षतेखाली हिंद स्वराज्य ट्रस्टची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या संचालक मंडळावर एन. के. फिरोदिया, बाळासाहेब भारदे, डॉ. व्ही.जी. भिडे, प्रदीप मुनोत होते व डॉ. द.र. बापट संचालक होते.

       आदर्शगाव योजना राबवण्यात अण्णा हजारेंना म.फु.कृ.वि.च्या विविध विषयांच्या शास्त्रज्ञांचे तसेच कृषी खात्यातील मृदा व जल संधारण विभागातील तज्ज्ञांंचेही मार्गदर्शन लाभले. त्याच वेळी केंद्र शासनाच्या ‘कपार्ट’ या काऊन्सिलने देशभरात सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून पाणलोटक्षेत्र विकास कार्यक्रम राबवण्याचे ठरवले. त्यासाठी विविध स्तरांवरील कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी राळेगणसिद्धीला राष्ट्रीय पाणलोट क्षेत्र विकास प्रशिक्षण संस्था १९९६-९७मध्ये प्रस्थापित केली गेली. यामध्ये ९० अभियंते व ९० सामाजिक कार्यकर्ते यांचे ३ महिन्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय स्तरावर समन्वयक नेमण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात झाल्यापासून १ ते १॥ वर्षातच ४० ते ५० गावे राळेगणसिद्धीच्या धर्तीवर कामे करू लागली.

       अण्णांचे सरकारशी या योजनेच्या कार्यपद्धतीबाबत १९९७च्या मध्यास काही मतभेद झाल्यामुळे अण्णांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तांत्रिक व सामाजिक समन्वयकांच्या मुलाखतीच्या वेळी हिंद स्वराज्य ट्रस्ट ५ वर्षे मदत करेल, पण त्यानंतर या समन्वयकांनी स्वतःच्या संस्था स्थापून नवीन गावे घ्यावी व ही चळवळ वाढवावी, अशी संकल्पना अण्णांनी सांगितली. त्यास अनुसरून काहींनी अशा संस्था स्थापन केल्या, तर काहींनी चांगल्या संस्थांबरोबर काम करावयाचे ठरवले. अशा २९ संस्थांनी ५९ गावे निवडली. या गावांमध्ये ‘कपार्ट’मार्फत आदर्श गाव योजनेप्रमाणे पाणलोट विकासाची कामे करावयाचे ठरले. राष्ट्रीय पाणलोटक्षेत्र विकास प्रशिक्षण संस्था, राळेगणसिद्धी येथे या २९ संस्थांचे विविध स्तरांवरील कार्यकर्ते तसेच ५० गावांचे सरपंच, संस्था अध्यक्ष, पाणलोट समिती सदस्य, पाणलोट विकास चमूचे सदस्य तसेच पाणलोट समितीचे सचिव इ.चेे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले. कपार्टने हिंद स्वराज्य ट्रस्टची निवड सपोर्टिव्ह व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन (एस.व्ही.ओ.) म्हणून केली, तर राज्य शासनाने प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पी.आय.एस. व एस.टी.आय. म्हणून निवड केली. या प्रशिक्षण संस्थेमध्ये १९९८ ते ३० जून २०११पर्यंत एकूण २२,११० प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले. राळेगणसिद्धी येथे पाणलोट क्षेत्र विकासाच्या यशस्वितेमुळे १९९८मध्ये केंद्र शासनाने ‘कपार्ट’च्या स्थायी समिती व कार्यकारी समितीवर अण्णांची नियुक्ती १९९८ ते २००८ या कार्यकालासाठी केली. त्याचप्रमाणे कपार्टच्या पश्‍चिम क्षेत्राच्या (महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात)  प्रदेश समितीचे १९९९ ते २००५ या कालावधीसाठी  अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. राळेगणसिद्धीच्या पाणलोटक्षेत्र विकासाच्या प्रगतीमुळे आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश व राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी राळेगणसिद्धीस भेटी दिल्या व आदर्श गाव योजना समजावून घेतली आणि चंद्राबाबू नायडू, दिग्विजय सिंह व अशोक गहलोत यांनी अण्णांना आपापल्या राज्यात निमंत्रित करून ‘आदर्श गाव’प्रमाणे योजना राबवण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन घेतले व धोरण आखले. अशा प्रकारे अण्णा हजारे पाणलोट क्षेत्र विकासकार्यामुळे देशपातळीवर तसेच जागतिक पातळीवर प्रसिद्ध झालेेले असे व्यक्तिमत्त्व आहे.

       - विजय दंडवते

हजारे, किसन बाबूराव