Skip to main content
x

कोट्याळकर, भरमण्णप्पा आर.

चित्रकार

राजा रविवर्मा यांचा वारसा चालविणारे चित्रकार भरमण्णप्पा आर. कोट्याळ-करांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील कोट्याळ या गावातील कुंभार घराण्यात झाला. वयाच्या बाराव्या वर्षी ते सोलापूर येथे, मामाकडे आले. पूर्वी कुंभारांकडे मूर्तिकाम होत होते. मूर्ती तयार करून कोट्याळकर ती भाजून, रंगवून विकत असत. सोलापुराच्या बाजारात शंकर, नंदी, राम, कृष्ण, मोर, हत्ती, सिंह, वाघ यांच्या मूर्ती विकून ते उदरनिर्वाह करीत. त्यातूनही काही पैशांची बचत करून, कागद व रंग आणून त्यावर चित्रे काढत. अशी चित्रे लोकांना खूप आवडत. त्या काळात घरातल्या औरस-चौरस भिंतीवर व देवळातल्या भिंतींवर रामायण, महाभारत, वीरशैवाच्या कथेतील अनेक प्रसंगांवर लोक चित्रे काढून घेत असत.

कोट्याळकर हे मनस्वी कलावंत होते. सोलापुरातील एका कुस्तीगीर व्यापार्‍याने, कोट्याळकरांकडून रंगवून घेतलेले भित्तिचित्र, त्यांनी आधी चित्र पाहू नये अशी ताकीद दिलेली असूनही सांगितलेल्या मुदतीआधीच पाहिले. दुसर्‍या दिवशी चित्राच्या भिंतीला तिरपा तडा पडलेला होता. कोट्याळकरांनी पुन्हा त्या घरात पाऊल ठेवले नाही.

कला ही साधना तर आहेच; परंतु यात योग आणि सिद्धीही आहे अशी कोट्याळकरांची श्रद्धा होती. श्रीसिद्धरामेश्‍वराचे चित्र काढण्यासाठी ते दररोज सोलापूरच्या ग्रमदैवत श्रीसिद्धरामेश्‍वराच्या योगसमाधीसमोर बसून ध्यानधारणा करीत होते. तीन महिन्यांनंतर त्यांना झालेल्या दृष्टान्ताप्रमाणे त्यांनी श्रीसिद्धरामेश्‍वराची प्रतिमा चित्रबद्ध केली.

कोट्याळकर कलासाधना करताना शुचिर्भूतपणाला व सात्त्विकतेला अधिक प्राधान्य देत. दत्तात्रेय बळवंत निशाणदार सराफांच्या ओतकामाच्या पेढीवर कोट्याळकरांनी १९२९ मध्ये काढलेले श्रीगुरुदेवदत्तांचे तैलरंगातील चित्र असेच भावपूर्ण आहे. त्यांनी ते चित्र १९२७ च्या गुरुपुष्यामृत योगावर सुरू करून १९२९ च्या गुरुपृष्यामृत योगावरच पूर्ण केले. काही दिवस त्यांचा मुक्काम जोडभावी पेठेतील किरीटमठात होता, तेव्हा त्यांनी किरीटेश्‍वराचे चित्र काढले होते.

सोलापूर मुक्कामी बालगंधर्वांच्या नाटकासाठी एका पडद्याचे काम त्यांनी अल्पावधीत करून दिले आणि बालगंधर्वांनी त्यांच्या कलागुणांची कदर करत त्यांचा यथोचित सत्कारही केला.

कोट्याळकरांनी काढलेल्या छापील चित्रांचा संग्रह सराफ श्री काशीनाथ विश्‍वनाथ महाराज यांच्याकडे आहे. त्यांच्याकडील चित्रसंग्रहाचा कालखंड १९२१ ते १९३४ पर्यंतचा आहे. त्यात श्रीबसवेश्‍वर, श्रीसिद्धेश्‍वर, श्रीमन्मथस्वामी, निलांबिका लिंगैक्य, त्रिपुरासुरवध, भवानी तलवार शिवरायास भेट, श्रीमहादेव कालकूट, विषपान, श्रीविष्णू सुदर्शनचक्रलाभ, अनुभव मंडपात श्रीअल्लमप्रभूंची पादपूजा, श्रीसिद्धराम-श्रीशैल्य मल्लिकार्जुन भेट, चन्नबसव जन्म, शरण बसवेश्‍वर, श्रीवीरभद्र, नटराज, शिवतांडव, बेडर कण्णप्पा, कोदंडराम, बसवजन्म, कपिलधार मन्मथेश्‍वर, मूळ पंचाचार्य पीठ श्रीबसवेश्‍वर कुडलसंगमैक्य मडिवाळ माचिदेव, भक्त हनुमानास श्री विरभद्राकडून लिंगदीक्षा, पंचमुखी परमेश्‍वर, रेणुकाचार्य लिंगोद्भव (कालीपाक), शिवराज्याभिषेक इत्यादी देवादिकांच्या पुराणकथांवरील चित्रांचा समावेश आहे.

सोलापूर येथे किर्लोस्करांच्या घरी औंधचे राजे पंतप्रतिनिधी आले असताना कोट्याळकरांची भेट झाली. त्यांची चित्रे पाहून कोट्याळकरांना त्यांनी औंधला नेले. औंध (सातारा) येथे गेल्यावर त्यांच्या चित्रकारितेला बहर आला. आजही औंध संस्थानाच्या चित्रसंग्रहालयात कोट्याळकरांनी काढलेले शिवतांडवाचे चित्र विराजमान आहे. तेथील मुक्कामात श्रीमंत राजे भवानराव पंतप्रतिनिधी त्यांच्या सोबत बसून चित्रे काढत. राजचित्रकाराचा मान देऊन कोट्याळकरांना ‘चंद्रवर्मा’ ही पदवी त्यांनीच दिली.

राजा रविवर्मा यांच्यापासून भरमण्णप्पा कोट्याळकर यांनी प्रेरणा घेतली आणि आपली चित्रे राजापासून रंकापर्यंत पोहोचतील अशी त्यांनी व्यवस्था केली. रविवर्मांनी स्वत:ची चित्रे छापण्यासाठी मळवली येथे शिळा प्रेस सुरू केला. रविवर्मांची चित्रे मुद्रणाच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि देशभर घरोघरी पोहोचली. चंद्रवर्मांची (भरमण्णप्पा कोट्याळकरांची) चित्रे मात्र महाराष्ट्र, कर्नाटकाच्या बाहेर गेली नाहीत.

राजा रविवर्मा यांच्या चित्रकलेचा वारसा पुढे चालवणारे चित्रकार म्हणून कोट्याळकरांचा उल्लेख करावा लागेल. मात्र, कोट्याळकरांच्या कलेमागच्या सश्रद्धतेचे नाते रविवर्मांपेक्षा रेनेसान्स काळातल्या फ्रा अँजेलिकोसारख्या चित्रकारांशी होते हेही लक्षात घ्यायला हवे. कोट्याळकरांचे वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी औंध येथे अल्पशा आजाराने निधन झाले.

- मल्लिनाथ बिलगुंदी

संदर्भः‘चंद्रवर्मा भरमण्णप्पा कोट्याळकर’, दै. संचार, १९९८

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].