Skip to main content
x

शेळके, उद्धव जयकृष्ण

     आचार्य अत्रे यांना कादंबरीचा विषय बनवून त्यावर ‘साहेब’ नावाची कादंबरी लिहिणारे उद्धव ज. शेळके हे एक वैशिष्ट्यपूर्ण लेखक ठरले. ‘साहेब’मध्ये त्यांनी आ. अत्रे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू चांगल्या रितीने दाखविले. तसेच, त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन काय होता, हेही त्यांनी स्पष्ट केले. कादंबरीकार उद्धव शेळके यांचा जन्म हिंगणघाट, जिल्हा वर्धा येथे झाला. शिक्षण संपल्यावर त्यांनी ‘हिंदुस्थान’ दैनिकात सहसंपादक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी अमरावतीला डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या ‘जगदंबा कुष्ठनिवासातील मुद्रणालयात व्यवस्थापक म्हणून काम केले. पुढे काही काळ ‘किशोर’ या मुलांसाठी असलेल्या मासिकाचे संपादकपद त्यांनी सांभाळले.

      ही कामे करत असताना त्यांनी जीवनात जे पाहिले, ऐकले, अनुभवले; त्यांतून त्यांच्या लेखनाकृती तयार झाल्या. ‘अगतिका’, ‘आग’, ‘आडवाट’ वगैरे त्यांच्या कादंबर्‍या असून ‘शिळान’ हा त्यांचा कथासंग्रह प्रातिनिधिक समजायला हरकत नाही. याशिवाय त्यांनी नाटक, बालवाङ्मय, वैचारिक वाङ्मय या क्षेत्रांतही मुशाफिरी केली.

       ‘अनौरस’ ही त्यांची संपादकाच्या जीवनावर लिहिलेली कादंबरी असून तीमध्ये त्यांनी मनुष्यस्वभावाच्या विविध छटांचा चांगला मागोवा घेतलेला आहे. कुलशीलाच्या गोष्टी करून स्त्रीला फसविणार्‍या दांभिक पुरुषवर्गावरची कडवट टीका त्यांच्या ‘देवदासी’ या लघुकादंबरीत आलेली आहे. सुहास मंगेशकर ही या कादंबरीची नायिका, एका देवदासीची मुलगी, शिकलेली व सुसंस्कृत. देवदासीची मुलगी म्हणून तिचे लग्न जमत नाही, पण तिचा वापर करून घ्यायला मात्र पुरुष तयार. म्हणून ढोंगी पुरुषांबद्दल सुहासच्या मनात चीड, तुच्छता आहे. हाच या कादंबरीचा विषय आणि आशय. ‘अजब तुझा संसार’मध्ये एका विषयासक्त स्त्रीशी लग्न करून उद्ध्वस्त झालेल्या मनुष्याची परवड आलेली आहे.

      ‘धग’ ही १९६० साली प्रसिद्ध झालेली शेळके यांची सर्वांत श्रेष्ठ म्हणता येईल अशी कादंबरी आहे. कौतिक या कादंबरीची नायिका आहे. गरिबीसह अनेक संकटांची धग तिला भाजू पाहते. पण, अशा विपरीत परिस्थितीशी कुठेही, कधीही न वाकता झुंज घेणारे विलक्षण पीळदार, तसेच चटका लावणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. लेखकाने संपूर्ण कादंबरी वर्‍हाडी ग्रामीण बोलीत लिहिल्यामुळे तिची शैलीही वाचकाचे लक्ष वेधून घेते.

     ‘शिळान’ हा शेळके यांच्या अनेक कथासंग्रहांपैकी एक कथासंग्रह. यातील ज्या-ज्या कथांमधून स्त्री-नायिका आलेल्या आहेत, त्या सर्व नायिका विदर्भातील खेड्यांतील आहेत. त्या अत्यंत गरीब आहेत. पण तरीही, कुणासमोरही न वाकता जीवनाच्या खडबडीत रस्त्यावरून त्या संसाराचा गाडा जिद्दीने ओढत आहेत. श्री.शेळके यांच्या सर्वच लेखनांतून वैदर्भीय जीवन प्रकट होते. त्यांनी विपुल लेखन केले.

      - शशिकांत मांडके

शेळके, उद्धव जयकृष्ण