Skip to main content
x

रानडे, श्रीधर बाळकृष्ण

     श्री.बा. तथा श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए., एम.एस्सी.पर्यंत शिक्षण घेतले. ते प्राध्यापक होते. ते स्वतः आणि त्यांच्या पत्नी मनोरमाबाई या दोघांनी लिहिलेल्या ७५ स्फुट कवितांचा संग्रह ‘श्रीमनोरमा’ या नावाने प्रसिद्ध आहे.

     त्यांचे ‘काळाच्या दाढेतून’ हे खंडकाव्य १९१५ साली प्रसिद्ध झाले. ते एकदा कॉलर्‍याने आजारी पडले असता बालपणीच्या अनेक आठवणी त्यांच्या मनात जाग्या झाल्या. प्रत्यक्ष मृत्यूच्या दारात जाऊन परत येण्याचा अनुभव त्यांनी घेतला. त्या वेळच्या मनःस्थितीचे वर्णन या खंडकाव्यात आहे. ‘माधुकरी’ आणि ‘लेझीम’ या त्यांच्या कविता विशेष गाजल्या. त्यांनी संपादन केलेले ‘महाराष्ट्र रसवंती’चे भाग १ ते ३ १९३५ ते १९३९ या काळात प्रसिद्ध झाले. तसेच त्यांनी संपादन केलेल्या ‘मराठी गद्यवैभव’ भाग १ ते ३ यांचे प्रकाशनही १९३५ ते १९३९ या काळात झाले. तसेच ‘नवयुगवाचनमाला’चे संपादनही त्यांनी केले. या तिन्ही संपादनकार्यांत त्यांना श्री.ग.दे.खानोलकर यांचे सहकार्य लाभले.

     श्री.बा.रानडे यांनी ‘तिंबूनानांचा रेडिओ’, ‘दिवाळीची डाली’ (१९३८) ही प्रहसने लिहिली. तसेच ‘कुंपणावरून’(१९४७) आणि ‘बोबडकांदा’, ‘कवडसा’, ‘गोपाळकृष्ण’, ‘चिक्कूमामा’, ‘येरेयेरे पावसा’ या बालसाहित्याचे लेखन केले. त्यांच्या बालसाहित्याचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांच्या भावनांशी व विचारांशी एकरूप होऊन त्यांनी बालसाहित्याची निर्मिती केली. अगदी ढेकूण, डास, झुरळ, माशी हेही त्यांच्या कवितांचे विषय झाले. अत्यंत सोपी, रसाळ, चमत्कृतीपूर्ण आणि खेळकर भाषा असल्याने त्यांची कविता लोकप्रिय झाली. निरनिराळे कीटक, त्यांच्या सवयी त्यांची वैशिष्ट्ये हेही त्यांच्या काव्याचे विषय झाले. आपल्या देशातल्या आणि परदेशांतल्या नद्या, पर्वत, निसर्ग यांचे वर्णन त्यांनी केले. ‘तिंबूनानांचा रेडिओ’ हा त्यांच्या नवकल्पनेचा चमकदार आविष्कार आहे. वस्तुनिष्ठ कुमारकथा लिहिणारे, मुलांना नवनवे प्रयोग करायला उद्युक्त करणारे निष्ठावंत बालसाहित्यकार म्हणून त्यांना गौरवले जाते. म्हणूनच आधुनिक बालसाहित्यकार त्यांना गुरुस्थानी मानतात.

     १९१२ साली त्यांनी आपल्या पत्नी मनोरमाबाई यांच्यासह काव्यरचनेला सुरुवात केली. १९२०नंतर मराठी कवितेला नवीन वळण मिळाले. १९२० ते १९२३ या काळात पुण्यात वास्तव्य करणारे कवी एकत्र जमत. दर रविवारी कुणा एकाकडे जमून कवितांचे वाचन किंवा गायन करायचे, त्यावर चर्चा करायची ही प्रथा सुरू झाली. या मंडळाला ‘सन-टी-क्लब’ म्हणत असत. याचेच पुढे ‘रविकिरण मंडळा’त रूपांतर झाले. श्री.बा.रानडे आणि त्यांच्या पत्नी मनोरमाबाई हे या मंडळाचे संस्थापक सदस्य होते. ह्या दांपत्याला रविकिरण मंडळाच्या काव्यात्म जीवनाचे अधिष्ठान मानले जाते.

     श्री.बा.रानडे यांनी ‘काळाच्या दाढेतून’ या खंडकाव्यामधून जीवनासंबंधी मार्मिक विचार मांडले. त्यांची कविता केशवसुतांच्या काव्यपरंपरेतली असूनही अधिक धीट बनली. त्यातून सर्वसामान्य माणसाच्या भावनांचा आविष्कार घडला. त्यामुळे ती लोकप्रिय झाली. सुनीतरचना, गझल, जानपदरचना ही रविकिरण मंडळाची वैशिष्ट्ये होती. मात्रावृत्तांचे प्रयोगही केले गेले. मंडळातील सर्व कवींनी प्रथम सामूहिक आणि नंतर वैयक्तिक काव्यसंग्रह प्रसिद्ध केले. रविकिरण मंडळाने काव्यगायनाची प्रथा सुरू केली. त्यामुळे काव्यप्रकार लोकप्रिय होण्यास मदत झाली.

     साध्या सोप्या भाषेतल्या रचनांमुळे लोकप्रिय झालेल्या रविकिरण मंडळाच्या कवितेने वाचकांना कवितेकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला. या दृष्टीने श्री.बा.रानडे यांचे काव्यक्षेत्रातले आणि बालसाहित्यातले योगदान निश्चितच महत्त्वाचे आहे.

- डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर

रानडे, श्रीधर बाळकृष्ण