टिळक, कमलाबाई विष्णू
पूर्वाश्रमीच्या कमला अनंत उकिडवे. मॅट्रिकला मुलींत पहिली आलेली युवती अशीही त्यांची ओळख आहे. संस्कृतसाठी जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती, चॅटफिल्ड, तसेच यमुनाबाई दळवी पारितोषिक मिळाले. इंग्रजी साहित्य घेऊन एम.ए. प्रथम वर्गात उत्तीर्ण व त्यानंतर हुजूरपागेच्या मुलींच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणून कार्यरत होत्या. त्याचप्रमाणे बनारस येथे मुलींच्या महाविद्यालयात इंग्रजीच्या प्राध्यापक आणि नंतर प्राचार्या म्हणून नियुक्ती झाली. निवृत्तीनंतर फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या सल्लागार समितीचे काम आठ वर्षे केले.
त्यांचे ‘हृदयशारदा’ (१९३२), ‘आकाशगंगा’ (१९४४), ‘अश्विनी’ (१९६३), ‘सोन्याची नगरी’ (१९८५) हे कथासंग्रह; तर ‘शुभमंगल सावधान’ (१९७५) ही कादंबरी; शिवाय वैचारिक लेखनामध्ये ‘स्त्री-जीवन विषयक काही प्रश्न’ (१९४१), ‘स्त्री-जीवनाची नवी क्षितिजे’ (१९६५), ‘युधिष्ठिर’ (१९७१) इत्यादी. १९७५नंतर बालवाङ्मय आणि एकांकिका असे लेखन केले.
‘रत्नाकर’, ‘मनोहर’, ‘यशवंत’, ‘स्त्री’ या मासिकांमधून सुरुवातीच्या काळात त्यांनी कथालेखन केले. त्यांच्या कथांना दर्जेदार म्हणून अनेक नामवंतांनी नावाजले. वा.ना.देशपांडे यांनी, ‘प्रसंगांचा चटकदारपणा, चरित्र-चित्रणाचा मार्मिकपणा तंत्रावरील प्रभुत्व व भाषेचे सहज सौंदर्य...’ या त्यांच्या गुणांचा निर्देश केला आहे. ‘कमलाबाईंनी आपल्या गोष्टींतून स्त्रीहृदय आणि स्त्री-जीवन जास्त समरसतेने रेखाटले आहे...’ असे शांता माडखोलकरांनी म्हटले आहे (‘प्रतिभा’ ३०-०१-१९३३) ‘त्यांच्या कथांतील चिंतनशीलता हा दुर्मिळ विशेष आहे...’ असे वि.स.खांडेकर यांनी गौरविले आहे. (३०-०५-१९७०)
स्त्री-विश्वाचे चित्रण-
याआधी पुरुष आपल्या कल्पनेने स्त्रीच्या भावभावना रेखाटत होते. पण कमलाबाईंनी स्त्रीला जाणवलेली भिन्न-भिन्न स्त्री-रूपे रेखाटली आहेत. त्यांतील वेगवेगळ्या छटा, गुंतागुंत हे उलगडून दाखविले. तेसुद्धा अगदी अकृत्रिमपणे आणि तटस्थपणेही. ना त्यात स्त्री-कैवार होता; ना स्त्री-द्वेष्टेपणा आणि तरीही कथेची कलात्मक बाजू त्या कधी विसरल्या नाहीत.
स्त्रिया नव्याने शिकू लागल्या, आपल्या आयुष्याबद्दल विचार करू लागल्या; पण त्यातूनही काही प्रश्न निर्माण झाले आणि मग दुविधा! मनातील या खळबळीचा वेध अतिशय तरलपणे त्यांनी ‘हृदयशारदा’ या कथेत घेतला आहे. सरल आणि नलिनी यांचे हृद्गत आणि त्यानंतर नलिनीच्या मनातील सूक्ष्मातिसूक्ष्म भावना त्यांनी छान चित्रित केल्या आहेत. घर-संसार गृहिणीपण, तिचे सौंदर्य महत्त्वाचे की पतीच्या सर्जनशीलतेला समजून घेण्याची बौद्धिकता, शिक्षणामुळे आलेली परिपक्वता महत्त्वाची आहे का? हा प्रश्न जरी नलिनीला पडलेला असला, तरी तो तत्कालीन शिकणार्या मुलींच्या मनाचेच प्रतिनिधित्व करणारा आहे. हे सूक्ष्म विश्लेषण हा यासारख्या कथांचा महत्त्वाचा विशेष!
‘बाहुल्या’ मध्येही(१९३१) तिला बाहुल्यांशी खेळायचे असताना; तिने काळानुसार शिक्षणाला महत्त्व द्यावे म्हणून भोवतालची माणसे तिच्यावर दबाव आणतात. ‘प्रेमाचा वाटा’मधील(१९३०) नायिका निर्मला हिला आपल्या आयुष्यात आलेले दोघेही आवडतात आणि तिला निवड करणे अशक्य झाले आहे आणि त्यामुळे तिची झालेली उलघाल असा वेगळाच धक्कादायक विचार आहे. तर ‘शांती’मध्ये (१९३४) ज्या मुलावर सगळ्या आशा केंद्रित केल्या, तो आपल्या नवर्याकडे अधिक ओढ घेतो म्हणून मुलाबद्दल तिटकारा वाटणारी आई आहे.
‘वरयोजना’मध्ये(१९३१) मध्यमवर्गीय मुलींच्या विवाहाची समस्या हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडली असली, तरी तिची तीक्ष्णता जाणवते. जसा विषय, जशी समस्या; तशी त्यांची भाषाशैली वळण घेते. ‘पतिव्रता’ (१९३२) या कथेत व्यसनी, गुन्हेगार पतीला, कुटुंबाच्या भल्याचा विचार करून, लक्ष्मी घराबाहेर काढते.
काही कथांची बीजे उदाहरणार्थ ‘कोकणी वहाणा’ (१९३१), ‘माझी बाग’ (१९३१), त्यांच्या स्वानुभवात आहेत; तर काहींची बीजे भोवतालचे निरीक्षण, मैत्रिणींच्या, कुटुंबांतील स्त्रियांच्या मानसिकतेत आहेत.
अनुभवांची श्रीमंती-
त्या काळच्या स्त्रियांच्या मानाने त्यांच्या द्विपदवीचे शिक्षण, बनारस, बडोदा, पुणे, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणचे वास्तव्य, बालपणीच आई-वडिलांचे निधन आणि आजीने संभाळणे, भल्या थोरल्या वाड्यातून लहानशा जागेत राहणे; असे त्यांचे अनुभवविश्व वेगळे आणि समृद्ध होते. शिक्षणाने तोलामोलाच्या पतीची तितकीच समजूतदार साथ, प्राध्यापिका-प्राचार्या अशा पदांवर काम करण्यातून त्यांचे आयुष्य समृद्ध होत गेले आणि त्या अनुभवांची श्रीमंती त्यांच्या कथा-लेखनातून दिसते. समाजाकडे पाहण्याची सूक्ष्म निरीक्षण शक्ती, स्वतःची वैचारिक भूमिका यांतून ‘स्त्री-जीवनविषयक प्रश्न’ आणि ‘स्त्री-जीवनाची नवी क्षितिजे’ या पुस्तकांची निर्मिती झाली. शतकानुशतके स्थितीमान असलेली भारतीय स्त्री शिक्षणामुळे कसकशी बदलली आणि आता तिच्यापुढे कसे प्रश्न उभे राहिले आहेत? कोणते? का? त्यांवर काय उपाय करता येतील? वैयक्तिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या या प्रश्नांचा त्या समग्र आणि सखोल विचार करतात. विचारप्रवर्तक आणि प्रेरणादायी अशीच ही पुस्तके आहेत. तरीही शैली भारदस्त असून सुगम आहे. ‘युधिष्ठिर’मधील (१९७०) सर्वच व्यक्तिरेखा लक्षवेधी आहेत.
त्यांची विनोदबुद्धी लखलखीत होती. आपल्याला फारसे रूप नाही, याची त्यांना जाणीव होती. त्यांची आणि बालगंधर्वांची जन्मतारीख एकच म्हणजे ‘२६ जून’ तेव्हा त्या थट्टेने म्हणत, “त्या तारखेचे रूपसौंदर्य बालगंधर्वांनी घेतले. माझ्या वाटणीला काही उरलेच नाही.” त्यांची ही वृत्ती, कडू-गोड आठवणी, शिक्षणाने मिळालेली समृद्धी, वैचारिकता, सहृदयतेने स्त्रियांच्या मानसिकतेकडे पाहणे, प्रश्नांच्या सर्व पैलूंना स्पर्श करण्याची परिपक्वता, अंतर्मनाच्या गाभ्याला भिडण्याची क्षमता हे सारे त्यांच्या सर्व तऱ्हांच्या लेखनातून जाणवते.