जोशी, यशवंत बाळकृष्ण
ग्वाल्हेर घराण्याचे गायक यशवंत बाळकृष्ण जोशी यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे वडील भजने वगैरे गात असत. यशवंत जोशी यांना बालपणापासूनच संगीताची आवड होती. त्यांचे प्रारंभिक संगीत शिक्षण त्यांचे चुलते नथूबुवा जोशी यांच्याकडे झाले. नथूबुवांचे संगीत शिक्षण विष्णू दिगंबर पलुसकरांच्या गांधर्व महाविद्यालयात झाले होते. नथूबुवांची इच्छा होती की यशवंतांनी बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांचे शिष्य, मिराशीबुवा (यशवंत सदाशिव पंडित) यांच्याकडे तालीम घ्यावी. जवळजवळ १९३६-३७ पासून म्हणजे वयाच्या दहाव्या वर्षापासून चौदा-पंधरा वर्षे यशवंत जोशी यांनी मिराशीबुवांकडे तालीम घेतली.
यशवंतांचे शालेय शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालय येथे, त्या काळची इंग्लिश सहावीपर्यंत झाले. गायन हाच पेशा करायचा असे ठरवून १९५० साली ते मुंबईला आले. पं. राम मराठे यांच्या मध्यस्थीने १९५० पासून आग्रा घराण्याचे गायक, रचनाकार पं. जगन्नाथबुवा पुरोहित, ‘गुणिदास’ यांच्याकडे त्यांनी १९६८ पर्यंत शिक्षण घेतले. पं. गजाननबुवांचा सहवासही यशवंतबुवांना लाभला होता. त्यांच्याबरोबर ते अनेकदा साथीलाही बसत. मिराशीबुवांच्या उदार दृष्टिकोनामुळे त्यांनी इतरांचीही गाणी मन:पूर्वक ऐकली. त्यांनी अनेक बंदिशींचा उत्तम संग्रह केला. पं. छोटा गंधर्व यांच्या बंदिशी व नवनिर्मित रागही त्यांनी मैफलींत गाऊन रसिकांसमोर आणले.
यशवंतबुवांच्या गायनावर ग्वाल्हेर-आग्रा घराण्याचे संस्कार होते . स्वच्छ, खणखणीत आवाज, खुला आकार, आरोही-अवरोही सपाट तानांचे विलक्षण वेगवान सट्टे आणि तयार बोलअंग ही त्यांच्या गायनाची वैशिष्ट्ये. लयकारीच्या गाण्याकडे त्यांची विशेष ओढ आहे. मुखबंदीची तान हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य होय. हमीर, पूर्वी, केदार, छायानट, भैरव बहार, देवगिरी बिलावल इत्यादी राग ते विलक्षण तयारीने गात. कृश प्रकृती असूनही त्यांच्या गाण्यात भरपूर दमसास व जोरकसपणा दिसून येतो. त्यांना १९९४ साली महाराष्ट्र सरकारचा राज्य पुरस्कार मिळाला, तसेच २००५ मध्ये ‘संगीत नाटक अकादमी’तर्फे त्यांचा गौरव करण्यात आला.
‘स्वरश्री’तर्फे हमीर गौडमल्हार, बहार या रागांची त्यांची ध्वनिफीत असून मॅग्नासाउण्ड कंपनीनेही त्यांची ध्वनिफीत काढली . ‘अत्यंत उत्तम रीतीने ख्यालगायकीची तालीम देणारे गानगुरू’ असा त्यांचा लौकिक होता व अनेक कलाकारांनी त्यांच्याकडून रागदारीचे पायाभूत शिक्षण घेतले . यशवंतबुवांच्या शिष्यवर्गातील राम देशपांडे, आशा खाडिलकर, कै. शिवानंद पाटील, कै. प्रकाश घांग्रेकर, इत्यादी काही प्रमुख नावे होत. वयाच्या ८५ व्या वर्षी यशवंतबुवा जोशी यांचे निधन मुंबईत झाले.