Skip to main content
x

विखे-पाटील, विठ्ठल एकनाथ

हमदनगर जिल्ह्यात प्रवरा नदीच्या परिसरात लोणी नावाचे लहानसे गाव आहे. त्या गावात दोन शतकांपासून विखे-पाटील यांच्या सहा पिढ्या नांदल्या. विठोजी पाटील यांना एकनाथ आणि तात्याबा दोन मुलगे होते. त्यापैकी एकनाथ यांना मुलगा झाला. त्याचे नाव विठ्ठल असे आजोबांचे नाव ठेवण्यात आले. त्यांना शंकर नावाचे थोरले बंधू व पाच बहिणी होत्या. विठ्ठलाची प्रकृती मुळात नाजुक, अशक्त होती. त्यातून तो लहानपणी नदीत बुडताना वाचला. तेव्हा त्याची आजी त्यांच्याकडे विशेष लक्ष देऊ लागली. विठ्ठल वयाच्या 9 व्या वर्षी शाळेत जावू लागला. त्याचे अभ्यासात बरे लक्ष असे पण एकनाथरावांनी चौथीत गेल्यावर त्याची शाळा बंद करून शेतीकडे लक्ष देण्यास सांगितले. परंतु याचकाळात पोथ्या-पुराण वाचण्याची जडलेली सवय सुटली नाही व त्यामुळे त्यांच्या आध्यात्मिक वृत्तीला खतपाणी मिळत गेले. वयाच्या 14-15 व्या वर्षी विठ्ठलाचा लोणीजवळच्याच पाथरे गावचे गणपतराव घोलप पाटील यांची कन्या, पार्वतीबाई हिच्याशी विवाह झाला. विठ्ठल यांची वडिलोपार्जित जमीन 60 एकर होती, पण ती एकसंद नव्हती. याचकाळात धार्मिक वृत्तीच्या विठ्ठलराव विखे-पाटील यांचे मन संसारात रमेना. परंतु त्यांच्या थोरल्या बंधूच्या निधनाने त्यांच्यावर सर्व कुटुंबाची जबाबदारी पडली.

कर्जामुळे शेतकर्‍यांची दैना होते हे विठ्ठलराव विखे-पाटील यांनी पाहिले होते. त्यांनी त्यामुळे प्रथम वडिलोपार्जित कर्ज फेडून टाकले. शेती करताना त्यांनी अंगमेहनतीची कामे केली. तसेच उपस्थित राहिलेल्या सर्व प्रश्नांना ते धीराने सामोरे गेले. त्यांना शेती करत असताना लाभलेली ही दृष्टी व वृत्ती पुढे साखर कारखान्याच्या वेळी उपयोगी पडली. 1923 मध्ये ऊसाची शेती करताना पाण्याची टंचाई आल्यामुळे विखे-पाटील हवालदील झाले. परंतु आलेल्या प्रसंगातही त्यांनी निर्धाराने विहिरीला पाणी लागण्याची वाट पाहिली व त्यामुळे भरात आलेला   ऊस वाचला. त्याचवर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हापासून विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या जीवनात नवे पर्व सुरू झाले.

या सुमारास गावाचे कर्तेपणही विखे-पाटील यांच्याकडेे येऊ लागले. त्याचवर्षी लोणीबुद्रक सहकारी पतपेढी या संस्थेची नोंदणी झाली. पण तो काळ भयंकर आर्थिक मंदीचा होता. लोणीची सोसायटी त्या तडाक्यात सापडली. तिला विखे-पाटील यांनी आपल्या सहकार्‍याच्या साथीने हात दिला. शेतकर्‍यांच्या मागचा सावकार हटवायचा तर सहकार हा एकच मार्ग आहे, हे त्यांनी ओळखले. पहिला प्रांतिक सहकारी कायदा 1925 मध्ये अस्तित्वात आला. त्यांनी आर्थिक मंदीच्या काळात या सोसायटीचा सांभाळ केला. त्यांनी या सोसायटीत मार्गदर्शकाची भूमिका बजावली. त्यांनी शेतकर्‍यांना कर्जाबरोबरच चांगले बी-बियाणे अवजारे पुरविण्याची सोयही केली. 1924-1925 च्या सुमारास लोणीच्या परिसरातील शेतकरी ऊसाचे पीक घेऊ लागले होते. त्यासाठी पाणीपुरवठा हा कळीचा प्रश्न होता. नगर जिल्ह्यात भंडारदरा धरणातील पाणी ओझर, लोणी, बेळापूर आदी भागातील ओसाड जमिनीला ओलावा देण्यासाठी वापरण्यात येऊ लागले होते. तथापि, पारंपरिक समजुतींमुळे शेतकरी वर्ग पाटपाण्यापासून उदासीन व विन्मुख राहात असे.

विखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी बुद्रुकच्या मंडळींनी विहिरी खणून ऊसाचे पीक घ्यायला सुरुवात केली होती. त्यातच धरणाचे पाणी मिळाल्यामुळे शेतकर्‍यांना ऊसाचे अमाप पीक घेता आले. याच सुमारास नगर जिल्ह्याच्या परिसरात साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. 1924-1925 मध्येच साखरेऐेवजी गूळ बनविण्यास प्रारंभ केला होता. लवकरच त्या भागातील ‘दि बेलापूर शुगर कं.’ हा पहिला साखरेचा कारखाना अस्तित्वात आला. महाराष्ट्र सरकारने 1931 मध्ये नेमलेल्या कामत समितीच्या कारखाना समितीसंदर्भातील मार्गदर्शक शिफारशी उपलब्ध झाल्या व महाराष्ट्रात कृषी-औद्योगिक पर्वच सुरू झाले. राज्यात 1930 ते 1940 या दशकात आणखी तेरा खाजगी साखर कारखाने निघाले. या सर्व घडामोडी तिशी-चाळीशीच्या विखे-पाटलांच्या नजरेसमोर होत होत्या. या उमेदीच्या काळातच त्यांच्या सामाजिक कार्याचा पाया घातला गेला. गावच्या सोसायटीची देखभाल करतानाच ते परिसराच्या सर्वांगीण विकासाकडे व अन्य गोष्टींकडे लक्ष देऊ लागले. तेव्हा ते लोकांच्या अडी-अडचणी सोडवू लागले. सावकारांच्या तावडीत सापडलेल्या शेतकर्‍यांच्या जमिनी त्यांनी सोडवून दिल्या. त्यामुळे ते समाजनेते झाले. सुरुवातीच्या काळात ज्येष्ठ मंडळींना त्यांची सुधारकी मते अमान्य असल्यामुळे त्यांना विरोध झाला. पण कालांतराने गावातील तंटेबखेडे कमी झाले. त्यामुळे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवू लागले. तोपर्यंत देशात गांधीयुग सुरू झाले होते. दुसरे महायुद्धही ऐन भरात होते. याच्याच आगेमागे गावच्या सोसायटीला विखे-पाटील यांनी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे रूप दिले. युद्धकाळात ते संगमनेर तालुका विकास मंडळाचे सदस्य बनले. त्यांनी ऊस बागायतही जोमाने फुलवली. त्यापासून गूळ बनविण्याखेरीज दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने 1943-1944 मध्ये त्यांनी स्वत:च एक यंत्र आणून खांडसरी बनविण्यास सुरुवात केली. एकवार ते जिल्हा लोकलबोर्डावर निवडून गेले. पाणीपट्टीच्या बाबतीत अन्याय झाल्यामुळे त्यांनी बोर्डाचा राजीनामा दिला. ते 1946 मध्ये पुन्हा निवडून आले व उपाध्यक्ष झाले. हिराबाई भापकर या महिलेला अध्यक्ष बनविण्यातही त्यांचा पुढाकार होता. त्याच काळात नगर जिल्ह्यात 6 साखर कारखाने सुरू झाले होते. त्या दरम्यान सामान्य शेतकर्‍याची होणारी दैना व शोषण पाहून विखे-पाटील अस्वस्थ होऊन जात. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी चळवळ सुरू केली व शेतकर्‍यांचे प्रबोधन केले. त्यामुळे खेड्यापाड्यांतील असंख्य शेतकरी त्यांच्या मागे उभे राहिले. योगायोगाने त्यांना यावेळी दि बॉम्बे प्रोव्हिजनल को-ऑप बँकेचे कार्यकारी संचालक वैकुंठभाई मेहता यांचे पाठबळ लाभले. या सुमारास विखे-पाटील यांच्या मनात साखर उत्पादनासाठी सहकारी साखर कारखाना काढावा असा विचार येऊ लागला होता. वैकुंठभाई मेहता त्यांच्याकडून या विचाराला उत्तेजन मिळाले. अशाच विचाराच्या काही शेतकर्‍यांनी 1945 च्या उत्तरार्धात शेतकर्‍यांची एक परिषद भरवली. त्यावेळी नवगाव येथे सहकारी साखर कारखाना काढण्याचा विचार झाला. याच वेळी देवळाली प्रवरा येथेही शेतकर्‍यांची सभा घेण्यात आली. तिथेही सहकार साखर कारखाना काढण्याची कल्पना उचलून धरण्यात आली.

अशा प्रकारे वातावरण निर्मिती झाल्यावर त्या कामाला वजन व वेग येण्याच्या दृष्टीने योग्य ते कार्य आवश्यक होते. कारण खाजगी भांडवलदारांचे नव्या कारखान्यासाठी जोराने प्रयत्न सुरूच होते. म्हणून बेलापूररोड येथे एक ‘दि डेक्कन कॅनॉल्स बागयतदार परिषद’ घेण्याचे ठरले. 14 डिसेंबर 1945 रोजी बेलापूर रोड (श्रीरामपूर) येथे ही परिषद घेण्यात आली. त्या वेळी झालेल्या बैठकीत विखे-पाटील यांनी मोठ्या चातुर्याने ‘खुद्द खातेदार’ असणार्‍यांनाच समभाग खरेदी करता येतील अशी दुरुस्ती करून घेतली. त्यामुळे मोठ्ठ्या बागायतदार खातेदार ठरत नसल्याने त्यांच्या हाती कारखाना जाणे टळले. मग पुढच्या हालचालींना प्रारंभ झाला. परिषदेत निवडलेल्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष धनंजयराव गाडगीळ होते तर प्रमुख सभासदांमध्ये विखे-पाटलांचे नाव होते. त्यानंतर ‘सहकारी तत्त्वावरील साखर कारखान्याची योजना’ तयार झाली. विखे-पाटील व त्यांचे सहकारी कामाला लागले. ते ‘खुद्द खातेदार’ संघाचे अध्यक्ष होते. कारखाना उभारणीसाठी त्यांनी अथक प्रयत्न केले त्यासाठी ते गावोगावच्या लोकांना भेटले, त्यांना कारखान्याचे महत्त्व पटवून दिले व त्यांना समभाग खरेदी करण्यास भाग पाडले. त्यांत त्यांना अडचणी आल्या, व्यापारी-सावकारी लोकांनी त्यांची बरीच टिंगल केली. परंतु ते कशाला ही बधले नाहीत. 1947 मध्ये देश स्वतंत्र झाल्यावर शेतकर्‍यांची कामे झटपट होतील अशी त्यांची अपेक्षा होती, परंतु नोकरशाहीच्या विळख्यातून लोकांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत. म्हणून कारखान्याच्या परवानगीसाठी त्यांना मुंबईच्या वार्‍या करायची वेळ आली. त्या वेळेस शेतकरी कारखाना काढणार या कल्पनेची मंत्रीही चेष्टा करीत. या काळात वैकुंठभाईंची खूप मदत झाली. या टोलवाटोलवीत 1-2 वर्षांचा काळ गेला. त्यामुळे विखे-पाटील निराशेच्या टोकाला पोचले होते. त्या दरम्यान शंकरराव तांबवेकरांचे पाठबळ लाभले. अखेर पुरेसे भागभांडवल बँकेत जमा झाले व 14 डिसेंबर 1948 रोजी केंद्र सरकारने साखर कारखान्यास परवानगी दिली. संस्थेची नोंदणी झाली. विखे-पाटील यांनी कारखान्यासाठी आधीच जागा निश्चित केली होती. तिला त्याकाळी ‘भुताचा माळ’ असे म्हणण्यात येत असे. त्यांना कारखान्याच्या कामासाठी तीन-चार वर्षे सतत प्रवास करावा लागला. पण त्या खर्चापोटी त्यांनी किंवा त्यांचे सहकारी धुमाळ, टेकावडे यांनी एक पैसाही घेतला नाही. मुंबई सरकारने कारखान्याचे 6 लाखांचे समभाग विकत घेतले. त्यातून इमारती उभ्या राहिल्या आणि 30 डिसेंबर 1950 रोजी रीतसर कारखाना सुरू झाला. आशिया खंडातील हा पहिला सहकारी साखर कारखाना, अनंत अडचणींवर मात करत उभा राहिला. 1952 मध्ये सोसायटीचे ‘दि प्रवरा सहकारी साखर कारखाना’ असे नामकरण करण्यात आले व वसाहतीही प्रवरानगर म्हणून ओळखली जाऊ लागली. नंतरही पाटाच्या पाण्याकरता विखे-पाटिलांना सरकारशी दीर्घकाळ संघर्ष करावा लागला. डॉ. धनंजयराव गाडगीळ यांनी 1960 मध्ये कारखान्याचे अध्यक्षपद सोडले व त्यांच्याच सूचनेवरून विखे-पाटील यांची त्या पदावर निवड झाली. त्यांच्या जागी अण्णासाहेब शिंदे उपाध्यक्ष म्हणून काम पाहू लागले. याच वर्षी विखे-पाटील यांची षष्ठब्दपूर्ती मोठ्या समारंभाने साजरी झाली. लागोपाठ 26 जानेवारी 1961 रोजी भारत सरकारने त्यांना पद्मश्री अर्पण करून त्यांचा बहुमान केला. त्यापाठोपाठ यांनी 15 मे 1961 रोजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू प्रवरानगर कारखान्याला भेट दिली. त्याच्या आयुष्यातील ही सर्वात अभिमानाची घटना होती. पुढे नोव्हेंबर 1964 मध्ये विखे-पाटील यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नंतरच्या काळात दोन-तीन वर्षे वगळता ती धुरा त्यांचे चिरंजीव बाळासाहेब यांनी समर्थपणे सांभाळली.

जन्मभर धडपड करणार्‍या विठ्ठलरावांना केवळ स्वस्थ बसणे शक्यच नव्हते. तेव्हा त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक, गोदावरी विकास मंडळ, रयत शिक्षण संस्था अशा विविध संस्थांतून महत्त्वाच्या जबाबदार्‍या सांभाळल्या. त्यामध्ये ‘प्रवरा पब्लिक स्कूल’ ही त्यांनी प्रवर्तित केलेली संस्था अत्यंत साहसी, अभिनव व उपयुक्त अशी ठरली. 1971 मध्ये पद्मश्री विखे-पाटील कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्सही सुरू झाले. ग्रामीण भागातील जनतेला आरोग्यविषयक सेवा शुश्रुषा व औषधोपचार उपलब्ध करून देण्यासाठी ‘प्रवरा मेडिकल ट्रस्ट’ची स्थापन करण्यात आली. ट्रस्टमार्फत जानेवारी 1975 मध्ये हॉस्पिटलही सुरू करण्यात आले. विखे-पाटील यांचा 1976 मध्ये अमृतमहोत्सवी सत्कार औरंगाबाद व मुंबई येथे करण्यात आले. त्यांना 1978 मध्ये पुणे विद्यापीठाने डी.लिट्.ची पदवी बहाल केली. त्याचवर्षी ते रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले. त्यांना 1979 मध्ये राहुरीच्या कृषी विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी दिली. वार्धक्यामुळे हे सन्मान स्वीकारण्यास हजर राहणे त्यांना शक्य झाले नाही.

- सविता भावे

विखे-पाटील, विठ्ठल एकनाथ