रोहमारे, कारभारी भिमाजी
कारभारी भिमाजी रोहमारे यांचा जन्म कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथे झाला. त्यांचे मूळ गाव पोहेगाव होय. वडील भिमाजी गणपत रोहमारे व आई लक्ष्मीबाई हे परिसरातील प्रसिद्ध शेतकरी होते. आपल्याला शिक्षण घेता आले नाही, ही खंत असणार्या भिमाजीबुवांनी आपल्या मुलांना मात्र शिक्षित करण्याचे ठरविले. रोहमारे यांनी पोहेगाव येथील शाळेतून चौथीची परीक्षा 1931 मध्ये उत्तीर्ण करताच त्यांना पुढील शिक्षणासाठी नाशिक येथे पाठविण्याचा निर्णय भिमाजीबुवांनी घेतला. पुरुषोत्तममिरजकरांनीरोहमारे यांचे पालकत्व स्वीकारून त्यांना नाशिकच्या पेठे विद्यालयात दाखल केले. त्यांनी अल्पावधीतच हुशार व विद्यार्थिप्रिय विद्यार्थी म्हणून नावलौकिक प्राप्त केला. नाशिक हे त्याकाळात स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र होते. विद्यार्थीदशेत त्यांच्यावर म. गांधी, स्वा. सावरकर यांच्या विचारांचा प्रभाव पडला व 1942 च्या सरकार वाड्यावरील मोर्चात ते सहभागी झाले.
रोहमारे विद्यार्थीदशेतच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले असले तरी त्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही व 1944 मध्ये अर्धमागधी, मानसशास्त्र, आरोग्यशास्त्र, मराठी इ. विषय घेऊन त्याकाळातील मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे त्यांनी कृषी पदवीधर व्हावे ही त्यांची व वडिलांची इच्छा असली तरी अपुर्या शिक्षणामुळे त्यांना शेतीकडे लक्ष द्यावे लागले. त्यामुळे गावातील पहिला मॅट्रिक मुलगा शेती करण्यासाठी पुन्हा पोहेगावला परतला. 1945 मध्ये त्यांचा विवाह अकोले तालुक्यातील गणोरे येथील पंढरीनाथ जिजाबा आंबरे यांच्या तृतीय सुकन्या शकुंतलाबाई यांच्याशी झाला.
रोहमारे यांनी घरचा गुळाचा कारखाना, शेतीतील काम सांभाळत संसाराची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली. मात्र त्यांचा मूळ पिंड हा चळवळकर्त्याचा होता. त्यामुळे पोहेगावला त्यांनी काँग्रेस कमिटीची स्थापना केली. या काळात गोदावरी प्रवरा खरेदी-विक्री संघाच्या होणार्या वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये ते शेतकर्यांचे प्रश्न तळमळीने मांडत. त्यामुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाले व त्यांची 1947 मध्ये या संघाच्या संचालकपदी निवड झाली आणि त्यांच्या सार्वजनिक व राजकीय जीवनाचा शुभारंभ झाला.
रोहमारे यांनी खरेदी-विक्री संघाचे संचालकपद स्वीकारल्यानंतर शेतकर्यांच्या हिताच्या अनेक गोष्टी केल्या. त्यामुळेच त्यांची 1957 मध्ये या संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर 19 वर्षे म्हणजे 1976 पर्यंत तेच या संघाचे अध्यक्ष होते. ज्यावेळी त्यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला, त्या काळात संघाचे फक्त एक अडत दुकान मर्यादित व्यवहार व आर्थिक स्थिती साधारण होती. त्यांनी शेतकर्यांच्या मालाला भाव मिळवून देण्यासाठी 4-5 गोदामे बांधली, शेतकर्यांसाठी सहकार भांडारामार्फत रासायनिक खते, बी-बियाणे, अवजारे, वगैरेंची रास्त भावात विक्री सुरू केली. संघाच्या कोळपेवाडीपासून पुण्या-मुंबईपर्यंत शाखा काढल्या. कार्यालयाची भाडेपट्ट्याने असणारी जागा व इतर अनेक जागा शासनाकडून अत्यंत नाममात्र दरात विकत घेतल्या. त्यांनी शेतकर्यांच्या, संचालकांच्या अभ्यास सहली काढल्या. त्यांनी मुद्रणालय, धान्य व कापड दुकान इ. अन्य व्यवसायही सुरू केले. त्यामुळे संघाची आर्थिक स्थिती भरभक्कम झाली व आशिया खंडातील सर्वात मोठा दुसर्या क्रमांकाचा खरेदी-विक्री संघ म्हणून गोदावरी प्रवरा खरेदी-विक्री संघास नावलौकिक मिळाला. या काळात शेतीसाठी रासायनिक खताचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला होता. मात्र ऐन हंगामाच्या काळात खताचा तुटवडा जाणवू लागे व व्यापारी काळाबाजार करीत. त्यामुळे खरेदी-विक्री संघामार्फत रासायनिक खताचा कारखाना सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रोहमारे यांनी हाती घेतला. शासनाकडून अशा कारखान्यासाठी परवानगी दिली जात नसे. मात्र विशेष बाब म्हणून त्यांनी ती मिळविली. मात्र पुन्हा मंत्रालयाकडून आपण सांगू त्याच्याकडूनच यंत्रे घेण्याचे दडपण आले. परंतु त्यांनी ते झुगारले व स्वस्तात यंत्रे आणून यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईकांच्या शुभहस्ते कारखाना सुरू केला. या कारखान्यामुळे परिसरातील शेतकर्यांना स्वस्तात खत उपलब्ध होऊ लागले. खरेदी-विक्री संघाचा लौकिक राज्यभर पसरला. राज्यातील सहकारी चळवळीने एक क्रांतिकारक टप्पा गाठला.
ग्रामविकासासाठी ग्रामपंचायत व सहकारी सोसायटी ही आधुनिक युगातील पायाभूत संस्था आहे. त्याची जाणीव रोहमार यांना खरेदी विक्री संघाचे संचालक झाल्यावर झाली व त्यामुळेच त्यांनी 1952 मध्ये दादा शहाजी रोहमारे याच्या मदतीने पोहेगावला ग्रामपंचायतीची स्थापना केली व ते संस्थापक सरपंच झाले. ते 1953 मध्ये पोहेगाव खुर्द विविध सहकारी सोसायटीची स्थापना करून संस्थापक-अध्यक्ष झाले. प्रत्येक गावात ज्याप्रमाणे मारुतीचे एक मंदिर असते, त्याप्रमाणे किमान एक सहकारी सोसायटी असावी, म्हणून त्यांनी प्रत्येक गावात जाऊन सोसायट्या स्थापन करण्याची गरज लोकांना पटवून दिली. त्यामुळे हळुहळू अनेक गावात त्या स्थापन होऊ लागल्या व जिल्हा बँकेमार्फत त्यांना वित्तपुरवठा होऊ लागला आणि या दुष्काळी समजल्या जाणार्या जिल्ह्याचे रूप पालटू लागले.
रोहमारे स्वत: शेती करत व कसत होते. त्यामुळे सावकार शेतकर्यांचे शोषण करतात हे त्यांनी स्वत: अनुभवले होते. त्यासाठी सहकारी सोसायट्यांची स्थापना हा त्यांना उत्तम पर्याय वाटत होता. त्याचवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवतंराव चव्हाण यांनी 1957 मध्ये प्रत्येक जिल्ह्यात सहकारी बँक स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी फिरोदिया यांना संस्थापक अध्यक्ष तर के. बी. रोहमारे यांना संस्थापक उपाध्यक्ष करण्यात आले. पुढे 1962 मध्ये रोहमारे अध्यक्ष झाले व नंतर अनेक वर्षे ते संचालकही होते. त्यामुळे जिल्हा सहकारी बँकेच्या स्थापनेपासून विकासापर्यंत त्यांचा सहभाग मोलाचा ठरला. शेती व ग्रामविकासासाठी सहकारी सोसायटी ही पायाभूत तर जिल्हा सहकारी बँक ही जिल्ह्याच्या दृष्टीने शिखर संस्था आहे, हे त्यांच्या आरंभीच लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी सर्वप्रथम सहकारी सोसायट्यांना कॅश क्रेडिट देण्याची महत्त्वाची योजना सुरू केली. त्या माध्यमातून शेतकर्यांना पीक कर्ज, विहीर-पंपासाठीचे कर्ज अल्पदराने मिळू लागले व सावकाराच्या पाशातून शेतकरीे मुक्त होऊ लागला. त्यामुळे जिल्हा बँकेचा विकास होण्यासाठी मदत झाली. त्यामुळेच खरेदी-विक्री संघ, जिल्हा बँकेचा विकास व जिल्ह्यात सहकारी सोसायट्यांची स्थापना हे सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे तीन महत्त्वाचे पैलू मानावे लागतात.
या कार्यक्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची नाममुद्रा उमटवीत असताना तालुक्यातही सहकारी साखर कारखाना असावा, असे रोहमारे यांना वाटू लागले. कारण त्यांचा गुळाचा कारखाना असल्याने, त्यासाठी कराव्या लागणार्या कष्टाची त्यांना कल्पना होती. ती अडचण फक्त साखर कारखाना उभारण्याने दूर होऊ शकते, याची जाणीव त्यांना होती. कारण डॉ. धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, पद्मश्री विखे पाटील व पोहेगावच्या ग. र. औताडे पाटलांनी असा प्रयोग प्रवरानगर येथे करून आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना 1950 मध्येच सुरू केला होता व त्याला खरेदी विक्री संघामार्फत भागभांडवल उभारणीस त्यांनी मदतही केली होती. कोपरगाव सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीसाठी ज्यावेळी ग. र. औताडे पाटील व इतर मान्यवरांनी प्रयत्न करण्यास सुरुवात केली, त्यावेळी आर्थिक मंदीची लाट असल्याने शेतकरी समभाग घेण्यास तयार नसत. रोहमारे यांनी अनेकांना आग्रह व क्वचित जबरदस्तीने समभाग दिले व प्रसंगी अनेकांची रक्कम स्वत: भरली. त्यामुळे अल्पवधीतच कोपरगाव साखर कारखाना उभा राहिला व ते संस्थापक संचालक म्हणून कारखान्याच्या विकासासाठी प्रयत्न करू लागले. पुन्हा राजकीय कारणाने 1984 मध्ये कारखाना अडचणीत आला. त्यावेळीही त्यांनी शंकरराव काळेंना मदत करून संचालकपद भुषवून कारखान्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले.
जिल्ह्यात प्रवरानगर, कोपरगाव इत्यादी सहकारी साखर कारखाने निर्माण झाले व इतरत्र तसे प्रयत्न सुरू असले तरी तालुक्यातील ऊसाचे कार्यक्षेत्र लक्षात घेतल्यास आणखी एका कारखान्याची गरज असल्याचे रोहमारे यांच्या लक्षात आले. त्यांनी संजीवनी सहकारी साखर कारखाना उभारण्याचा संकल्प केला व या कारखान्याचे मुख्य प्रवर्तक म्हणून भागभांडवल उभारणीस सुरुवात केली. मात्र सरकारने ठरवून दिलेल्या मुदतीत भागभांडवल उभारणे अशक्य होऊन बसले. अशावेळी ते अध्यक्ष असलेल्या खरेदी विक्री संघाद्वारे एक रकमी वीस लाख रुपये उपलब्ध करून भागभांडवल पूर्ण केले. कारखान्याची उभारणी पूर्ण होऊन तो उद्घाटनास सज्ज झाला. मात्र पुन्हा अशीच आर्थिक अडचण निर्माण झाली. त्याहीवेळी ते अध्यक्ष असलेल्या जिल्हा सहकारी बँकेमार्फत ती त्यांनी एका दिवसात सोडविली. अशा रीतीने या तालुक्यातील दुसरा सहकारी साखर कारखाना त्यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
त्यांना पुढे 1957 मध्ये काँग्रेस पक्षाकडून विधानसभेसाठी उमेदवारी मिळाली. मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामुळे त्यांचा पराभव झाला. काँग्रेस पक्षाने त्यांना 1962 मध्ये पुन्हा उमेदवारी दिली. यावेळी मात्र ते प्रचंड मतांनी निवडून येऊन आमदार झाले.
रोहमारे यांना सहकार, राजकारणाबरोबरच शिक्षण क्षेत्रातही रस होता. इच्छा व परिस्थिती असूनही सोय नसल्याने त्यांना व वडीलबंधूंना पुढचे शिक्षण घेता आले नव्हते. त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची सोय व्हावी, म्हणून त्यांनी आपल्या अध्यक्षतेखाली 1963 मध्ये कोपरगाव तालुका शिक्षणसंस्थेची स्थापना केली व 1964 मध्ये कोपरगाव तालुक्यातील पहिले कला व वाणिज्य महाविद्यालय सुरू केले. या महाविद्यालयाचेच पुढे के. जे. सोमैया महाविद्यालय नामकरण करून 1992 मध्ये विज्ञान शाखाही सुरू केली. त्यांचे चिरंजीव अशोकराव रोहमारे यांनी मूकबधिर व अपंग विद्यालयाची स्थापना करण्याचा संकल्प करताच त्यांनी सर्व प्रकारची मदत केली. आज या दोन्ही संस्था महाराष्ट्रातील नामांकित शैक्षणिक संस्था असून महाविद्यालयाला राष्ट्रीय अधिस्वीकृती व मूल्याकंन परिषदेने एनएएसी नुकतीच ‘अ’ श्रेणी असे मानांकन देऊन सन्मानित केले आहे.
याशिवाय तालुक्यात सर्वप्रथम वीज आणणे, दुष्काळी परिषद, पहिला ज्वारी व गहू पुरवठा दिन साजरा करणे, पाणी प्रश्नांवर संघर्ष करणे आदी कार्य करतानाच भूविकास बँक, पश्चिम विकास महामंडळ, रेल्वे सल्लागार मंडळ, बाजार समिती इत्यादी विविध संस्थांचे संचालकपद त्यांनी सांभाळले.
सार्वजनिक जीवनात कार्यरत असले तरी कुटुंबाकडे त्यांनी कधीच दुर्लक्ष केले नाही. त्यांचे तीन सुपुत्र अशोक, रमेश व विजय व सुकन्या प्रमिला, सुनंदा व अन्नपूर्णा यांना शिक्षित करून स्वावलंबी बनविले. समाजकारण, शेती व उद्योग ही त्यांच्या आवडीची कार्यक्षेत्रे होती. त्यांचा हा वारसा तीनही सुपुत्रांनी उत्तमपणे पुढे चालविला आहे. त्यांचे कुटुंब तालुक्यात एक आदर्श कुटुंब झाले. त्याचे सर्व श्रेय रोहमारे व त्यांच्या धर्मपत्नी शकुंतलाबाई यांनाच आहे.
आपल्या उत्पन्नातून 1975 नंतर एक लाख रुपये बाजूला ठेवून त्यांनी वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भि. ग. रोहमारे ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टमार्फत गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक व वैद्यकीय मदत, 1967 पासून प्रतिष्ठेची राज्यस्तरीय भि. ग. रोहमारे वादविवाद स्पर्धा व 1989 पासून भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार योजना सुरू केली. आईविषयीचा कृतज्ञता भाव जपण्यासाठी त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मिश्र खताच्या कारखान्यास ‘लक्ष्मी’ हे नाव दिले.
- डॉ. गणेश दिनकर देशमुख