Skip to main content
x

रावल, जयसिंह दौलतसिंह

दादासाहेब रावल

शेतकर्‍याचे जीवनमान उंचवावे, बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे आणि या परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा या उदात्त हेतूने पूर्वीच्या धुळे व आताच्या नंदुरबार जिल्ह्यात असलेले दोंडाईचा या गावातील सर्वसामान्यांच्या जीवनात सहकाराच्या माध्यमातून आनंद फुलविणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे सहकारमहर्षी जयसिंह दौलतसिंह रावल.

त्यांचे पूर्वज राजस्थान चितोड येथील राजपूत घराणे 13 व्या शतकाच्या अखेरीस खानदेशातल्या दोंडाईचा गावात येऊन स्थायिक झाले. त्यांच्या पूर्वजांनी आर्थिक, सामाजिक आणि भौतिक विकास घडवून आपला ठसा उमटविला. राणी मनुबा माँसाहेब आणि दौलतसिंह हे दादासाहेबांचे दत्तक आई-वडील होते. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील भवाळे येथे राहणार्‍या आपल्या बहिणीचा झिपामाँ यांचा मुलगा अमरसिंह याचे वयाच्या पाचव्या वर्षी म्हणजे 1929 मध्ये विधीवत दत्तक विधान झाले आणि तेच जयसिंह दौलतसिंह रावल होत. राजघराण्यात लाडाकोडाने वाढलेल्या दादासाहेब यांना शिक्षणासाठी खूप संघर्ष करावा लागला. शिरपूर, अमळनेर आणि पुणे या शहरात त्यांना शिक्षणासाठी जावे लागले. अमळनेरला असताना त्यांना साने गुरुजींचा सहवासदेखील लाभला. या दरम्यान त्यांना वारसाहक्काच्या वादातून खूप मनस्ताप सहन करावा लागला. त्यांना 15 ते 20 वर्षे न्यायालयाच्या फेर्‍या माराव्या लागल्या. विजिगीषु वृत्तीने त्यांनी या सगळ्या संकटांचा सामना केला. विद्यार्थी दशेत असताना त्यांनी चले जाव चळवळीत स्वत:ला झोकून दिले. त्यांनी 1943 मध्ये अमळनेर येथील प्रताप विद्यालयातून मॅट्रिक उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी पुणे गाठले. फर्गसन महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच 1944 मध्ये त्यांनी खानदेश विद्यार्थी संघाची स्थापना केली. त्यांच्या वयाच्या पंधराव्या वर्षी 1939 मध्ये धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जैतपूर येथे त्यांचा विवाह पार पडला. त्यांनी 1947 मध्ये पुणे येथील कायदे महाविद्यालयामधून एलएल.बी. ची परीक्षा उत्तीर्ण केली. शिक्षण, वारसाहक्कासाठी निर्माण झालेला वाद, कोर्ट-कचेरी या संघर्षाच्या काळातही न डगमगता त्यांनी सर्व प्रसंगांना धैर्याने तोंड दिले. दादासाहेब यांना तरुण वयातच आमदार होण्याची संधी मिळाली. त्यांच्यातील नेतृत्व गुणांमुळे ते 1952 मध्ये शहादा दोंडाईचा मतदारसंघातून मुंबई विधानसभेचे आमदार झाले. ते 1953 मध्ये धुळे जिल्हा तांत्रिक शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बनले. पारंपरिक शिक्षणासमवेत या परिसरातील मुलांनी तांत्रिक शिक्षण घ्यावे असा त्यांचा नेहमीच आग्रह होता. परंतु या परिसरात तांत्रिक शिक्षण देणार्‍या संस्थेची गरज होती. ही गरज ओळखून त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. त्यांनी 1955 ला दोंडाईचा मल्टिपर्पज हायस्कूलची स्थापना केली. या परिसरातील जनतेला प्रगती, आर्थिक उन्नतीसाठी बँक सेवा मिळणे फार महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेऊन 1957 मध्ये त्यांनी पुढाकार घेऊन दि को-ऑप. बँक ऑफ दोंडाईचा या सहकारी बँकेची स्थापना केली. पुढच्या वर्षी त्यांनी धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व दि दादासाहेब रावल बँकेची स्थापन केली. आपल्या संघटन कौशल्यामुळे त्यांनी धुळे जिल्ह्यात विविध सहकारी संस्था स्थापन केल्या. दादासाहेब यांनी 1959 मध्ये सहकारी तत्त्वावर विद्युत पुरवठा करणारी संस्था सुरू केली. पुढे 1964 मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ स्थापन झाले व त्यात दोंडाईचाची सहकारी विद्युत पुरवठा संस्था विलीन झाली. त्यांच्या पुढाकारामुळेच पांझराकान सहकारी साखर कारखाना स्थापन झाला. धुळे जिल्ह्यातले दोन सहकारी साखर कारखाने उभे करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी महाराष्ट्राच्या शिखर बँकेचे सतत 22 वर्षे संचालक पद सांभाळले. जिल्ह्यातली पहिली सहकारी बांधकाम संस्था स्थापन करण्याचा मान देखील त्यांच्याकडेच जातो. सहकारी औद्योगिक वसाहत, सहकारी उपसा जलसिंचन योजना या संकल्पना त्यांनीच रुजविल्या. सहकार क्षेत्रातील त्यांच्या या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना सहकार महर्षी ही उपाधी प्राप्त झाली.

दादासाहेब यांनी 1982 मध्ये लिक्विड ग्लुकोजचा महाराष्ट्रातील पहिलाच कारखाना स्थापन केला. यापूर्वीच 1973 ला युनिव्हर्सल स्टार्च मक्यापासून स्टार्च उत्पादन होऊ लागल्यावर त्यांनी स्टार्चचे नाविन्यपूर्ण उत्पादन सुरू केले. औद्योगिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवले;  त्यांनी येथील शेतकर्‍यांना चाकोरीबद्ध पारंपरिक पिके घेण्यापेक्षा मका लागवड करून त्यापासून स्टार्च उत्पादनासाठी  उद्युक्त केले. शेतमालाच्या भावाला दादासाहेबांकडून हमी मिळाली. मालावर प्रक्रिया झाल्यामुळे आपसूक शेतकर्‍यांचा मालाचे मूल्यवर्धन झाले आणि पर्यायाने या परिसराचा कायापालट व्हायला सुरुवात झाली. त्यासाठी त्यांनी विदेशवार्‍या करून तेथील औद्योगिक क्षेत्राला भेट दिल्या. पण सहकारी तत्त्वावर स्टार्च कारखाना उभा करण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. हे शल्य कायम बोचत असल्यामुळे त्यांंनी पुढे या व्यवसायात इतके यश मिळविले की, त्याकाळी 1983 मध्ये टँकरद्वारे ग्लुकोज वितरण व मक्याचे तेल (कॉर्नेला)े उत्पादन करणारे ते भारतातील पहिले उद्योजक ठरले.

शेतकर्‍यांना हमीभाव मिळत नाही, त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे, त्यात आपण सुधारणा केली पाहिजे या भावनेने त्यांनी कारखाना काढण्याचे धाडस केले. ग्रामीण भागातल्या तरुणांच्या हाताला काम मिळेल व शहराकडे कामासाठी जाणारे तरुणांचे लोंढे थांबतील या भावनेतून त्यांनी हा उद्योगदेखील जाणीवपूर्वक निवडला. शेतमालावर प्रक्रिया करणारा कारखाना  काढल्यास त्याचा शेतकर्‍यांना लाभ होईल या त्यांच्या चिंतनातून युनिव्हर्सल स्टार्च फॅक्टरी 1973 ला उभी राहिली. या प्रकल्पाची सध्याची उत्पादन क्षमता 500 टन आहे. हजारों एकर शेतीत मका पेरला जातो. शेतकर्‍यांना त्यांच्या मक्याला हमीभाव मिळतो. स्टार्च समवेत इतर अनेक उपउत्पादनेही दादासाहेब रावल उद्योग समूहाने बाजारात आणले आहेत. आज भारतातल्या खाद्य, औषधी, कापड व कागद निर्मिती करणार्‍या बहुतांश मोठ्या कंपन्यांना युनिव्हर्सलमधून स्टार्चचा पुरवठा करण्यात येतो. देशातंर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात स्पर्धा असून देखील कंपनीची वाटचाल जोमाने सुरू आहे.

वयाच्या अमृतमहोत्सवी वर्षात देखील त्यांचा उत्साह आणि कामाचा उरक मोठा आहे. नियमित व्यायाम, आहार विहार आणि कार्यमग्नतेत त्यांनी धन्यता मानली. त्यांनी सुहास्यवदन आणि निरोगी शरीर कायम जपले. सामाजिक कार्यात देखील त्यांचा सहभाग तितकाच उत्साही होता. त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करून वृद्धांना एक हक्काचे नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. नव्या पिढीशी वृद्धांनी जुळवून घ्यावे, तरुणांना संधी आणि अधिकार द्यावे असे पुढारलेले विचार ते मांडत असत. त्यांनी 1989 मध्ये ज्येष्ठ नागरिक संघटनेची जागतिक परिषद मुंबई - पुणे येथे भरविली होती. त्यांनी 1970, 1995 आणि 1997 असे तीन वेळा परदेश दौरे केले होते.

उपराष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते 20फेब्रुवारी1991 मध्ये त्यांच्या कार्याचा उचित गौरव करण्यात आला. अमेरिकन बायोग्राफिकल इन्स्टिट्यूटतर्फे असामान्य नेतृत्वासाठी पुरस्कार देऊन  त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या अवघ्या 14 दिवसांनी भिवंडीजवळ कार अपघातात त्यांचे दु:खद निधन झाले.

जितेंद्रसिंह जयसिंह रावल अर्थात सरकारसाहेब रावल हे त्यांचे ज्येष्ठ पुत्र असून त्यांच्या स्नुषा दोंडाईचाच्या माजी नगराध्यक्षा नयनकँुवर रावल होत. कल्पनादेवी, हंसाराणी आणि पंचरत्ना या त्यांच्या मुली तर दोंडाईचाचे आमदार जयकुमार रावल हे दादासाहेबांचे नातू होय. वृक्षमित्र जयदेवसिंह अर्थात बापूसाहेब हे द्वितीय पुत्र व बिनान कुँवर या स्नुषा. दादासाहेबांना जयराज देवी अर्थात आक्कासाहेब, शांतादेवी उर्फ ताईसाहेब जमादार आणि विजया देवी प्रेमसिंह राजपूत या तीन कन्या आहेत.

- किशोर ज्ञानेश्वर कुळकर्णी

रावल, जयसिंह दौलतसिंह