Skip to main content
x

भोसले, प्रताप बाबूराव

प्रतापराव बाबूराव भोसले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भुईंज या गावी झाला. घरी पारंपरिक शेती व्यवसाय असल्यामुळे त्यांनीही शेती व्यवसायाला सुरुवात केली. त्यांनी घरचा शेतीचा व्यवसाय सांभाळत असतानाच भुईंज गावातील ग्रामपंचायतीमध्ये 1958 मध्ये सदस्य म्हणून प्रवेश केला. ते 1962 पर्यंत या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून कार्यरत होते. ते 1962 मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भुईंज गावचे सरपंच झाले. त्यांनी 1967 पर्यंत सरपंचपद सांभाळले. ते 1967 ते 1984 या काळात महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सदस्य होते. त्यांनी 1968 मध्ये सातारा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. त्यांनी 1978 ते 1980 या काळात राज्यमंत्री म्हणून व 1983 ते 1985 या काळात ग्रामीण विकास व पुनर्वसन मंत्री म्हणून ग्रामीण विकासाच्या कामांना प्राधान्य दिले. ते यशवंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर लोकसभेवर निवडून आले.

भोसले 1985 ते 1991 या काळात शेती सल्लागार समिती सदस्य होते. ते 1985 ते 1986 या एका वर्षासाठी संसदीय शेतकरी व्यासपीठाचे कार्यकारी अध्यक्ष झाले. पुढे त्यांनी सदर संस्थेचे अध्यक्षस्थानही भूषविले. ते अखिल भारतीय ऊस विकास मंडळाचेही सदस्य होते. ते 1988 ते 1990 या काळात दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्राच्या रेल्वेभोक्ती समितीचे सदस्य म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबरीने ते 1987 ते 1989 या काळात संसदीय हिंदी सल्लागार समिती, शेती अनुदान समिती; यांसारख्या समित्यांचेही सदस्य होते.

भोसले 1972 मध्ये सातारा जिल्हा काँग्रेस समितीचे सदस्य झाले. ते 1980 मध्ये सदर समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. ते 1987 ते 1990 या काळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सदस्य होते. भोसले यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदानही महत्त्वपूर्ण व उल्लेखनीय आहे. त्यांनी जनता शिक्षण संस्था, वाई व खंडाळा विभाग शिक्षणसंस्था यांचे अध्यक्षस्थान समर्थपणे पेलले. त्यांचे सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यही लक्षणीय ठरले. ते वाईच्या प्राज्ञपाठशाळेच्या कार्यकारिणीचे सदस्य होते. सातारा येथे झालेल्या 77 व्या नाट्यसंमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते.

धोम व कण्हेर या धरणांमुळे विस्थापित झालेल्या शेतकर्‍यांचे प्रश्न गावोगावी फिरून आस्थापूर्वक समजून घेण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही भोसले यांनी केले. खंडाळा तालुक्यात तंत्रनिकेतन, एस. टी. डेपो, पशुवैद्यकीय विद्यालय, न्यायालये सुरू करण्यात पुढाकार घेतला. तसेच त्यांनी धरणास मंजुरी मिळवून दिली व रखडलेले काम मार्गी लावले. त्यांनी खंडाळा येथे किसनवीर सहकारी साखर कारखाना व यशवंतराव सूतगिरणीचे प्रवर्तक म्हणून काम सुरू केले. त्यांच्याकडे 1991 पासून केंद्रीय खत किंमत समितीचे अध्यक्षपद होते. त्यांनी नवीन आर्थिक धोरणात शेतकर्‍यांना स्वत:साठी अनुदान मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले.

- संपादित

भोसले, प्रताप बाबूराव