Skip to main content
x

जोशी, यशवंत गोपाळ

     शवंत गोपाळ जोशी यांचा जन्म भिगवण (जि.पुणे) येथे झाला. त्यांना बिकट आर्थिक परिस्थितीमुळे पाचव्या इयत्तेत शाळेस मुकावे लागले. त्यांनी काही काळ येरवडा कारागृहामध्ये व मिलिटरी अकाउन्ट्समध्ये नोकरी केली. 

जोशी यांचे १९३२ ते १९४३ या काळात लिहिलेल्या कथांचे ‘पुनर्भेट’ या संग्रहाचे सात खंड, ‘तुळशीपत्रे आणि इतर कथा’ (१९३७), ‘रेघोट्यांचे दैवत’ (१९४७), ‘मायेच्या सावल्या’ (१९४७), ‘जाईजुई’ (१९४९), ‘तरंग’ (१९५०) हे कथासंग्रह. ‘पडसाद’ (१९३८), ‘श्रीकांत’ (१९३७), ‘त्रिदोष’ (१९३७), ‘होमकुंड’ (१९३६), इत्यादी कादंबर्‍या. ‘दुधाची घागर’ (१९७२) हे आईच्या आठवणी सांगणारे पुस्तकही गाजले आहे. तसेच ‘अनौपचारिक मुलाखती’ (१९४२) हे त्यांचे आगळे-वेगळे पुस्तकही गाजले आहे. त्यांच्या ‘शेवग्याच्या शेंगा’, ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘दुधावरची साय’ या कथा महाराष्ट्रभर गाजल्या. या कथांवरचे चित्रपटही गाजले. जोशी यांना पुणे संस्कृतीचे आकर्षण होते. तिथल्या सदाशिव पेठी संस्कृतीचे जतन करणार्‍या व नवे तंत्र  आणि ‘देशीकार लेणे’ धारण करणार्‍या त्यांच्या कथा आहेत. फडके-खांडेकर तंत्रबद्ध कथेच्या पार्श्वभूमीवर आपल्या नव्या वाटेने  त्या अधिक उठून दिसतात.

य.गो.जोशी यांची ‘प्रकाशक’ म्हणून ख्याती होती. १९३८ ते १९४१ या काळात त्यांनी ‘वाद विवेचन माला’ म्हणून १३ पुस्तके प्रकाशित केली. त्यांतील फॅसिझम व समाजवाद ह्यांना वैचारिक पार्श्वभूमी देणारे त्यांचे तात्त्विक अधिष्ठान आजही स्मरणात राहणारे आहे. जोशी यांच्या व्यक्तिमत्त्वावर वारकरी संप्रदायातील  सोनोपंत दांडेकरांचा विशेष प्रभाव होता. त्यांच्या प्रभावामुळे जोशी यांनी लिहिलेली ‘सुबोध ज्ञानेश्वरी’ ज्या गद्य-कथामालेतून अवतरते ती सात्त्विक-रसिक वाचकांस नवा विरंगुळा देऊन जाते.

प्रयोगक्षम कथालेखन-

य.गो.जोशी यांच्या संपादनाखाली १९४७ साली ‘प्रसाद’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. १९७२ साली प्रसादचा रौप्य महोत्सव मोठ्या थाटात साजरा झाला आणि १९९७ साली साजरा झालेला ‘प्रसाद’चा सुवर्ण महोत्सवसद्धा उल्लेखनीय आहे. फडके-खांडेकर ह्यांच्या कथांचा उदोउदो होत असताना, मराठी कथा तंत्र-मंत्राच्या साच्यात अडकलेली असताना मराठी कथेला यातून बाहेर काढण्यासाठी य.गो.जोशींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला. त्यांनी आपली कथा प्रयोगक्षम केली. मराठी वाचकांच्या नव्या अभिरुचीला प्रोत्साहन देणार्‍या नव्या कथा लिहिल्या. आशय आणि अभिव्यक्ती ह्यांचे नवे तंत्र निर्माण केले. ही नवी कथा जोशी यांचे ‘नवे विलायती विचार टिपायचे आणि नव्या मनूची भगवद्गीता म्हणून विकत सुटायचे’ या परभृततेवर शरसंधान करणारे विचार सांगून जाते. त्यातील नवता व आधुनिकता ते डोळसपणे टिपतात. कथेतील कागदी फुले त्यांना नकोशी वाटतात व ताज्या सुगंधी फुलांचे ताटवे ते आपल्या कथेच्या बागेत फुलवतात आणि या कागदी फुलांपेक्षा  ही फुले रसगंधात कशी वेगळी आहेत, ते रसिकांना दाखवून देतात.

दुसरी एक विशेष गोष्ट य.गों.नी कथेच्या प्रांतात केली; ती म्हणजे हास्यास्पद आणि खुरट्या वाङ्मयीन प्रवृत्तीची आपल्या कथेतून त्यांनी खिल्ली उडवली. आपल्या उपहासपर कथांतून ते हे कार्य पार पाडतात. कल्पनेचा फुगा खूप फुगवत न्यायचा आणि त्याला टचकन टोचायचे की झाले आपले काम! कुटुंबकथेचे प्रणेते म्हणून य.गों.चा गौरव केला जातो. प्रकाशन व्यवसायाला त्यांनी साधनशुचिता आणून दिली. ते स्वतः साहित्यिक असल्यामुळे या व्यवसायाला त्यांनी एक नैतिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. ‘प्रसाद’ प्रकाशनाची परंपरा आणि नवता हे तत्त्व जपून आहे. सारांश ‘प्रसाद’ मासिकाचे व प्रकाशनाचे साक्षेपी संपादक, वेगळ्या वळणाच्या ‘स्व’तंत्र मराठी कौटुंबिक कथेचे भाष्यकार, सुबोध ज्ञानेश्वरीचे उद्गाते आणि अस्सल देशीकार लेणे मराठी साहित्याला बहाल करणारे श्रेष्ठ साहित्यिक म्हणून य.गों.जोशी चिरस्मरणीय आहेत.

- मधू  जामकर

जोशी, यशवंत गोपाळ