Skip to main content
x

वाळिंबे, रामचंद्र शंकर

     रामचंद्र शंकर वाळिंबे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे झाला. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण बदलापूर येथे, तर महा-विद्यालयीन शिक्षण स.प. महाविद्यालय, पुणे येथे झाले. पदव्युत्तर शिक्षण, तसेच बी.एड.सुद्धा त्यांनी पुणे मुक्कामीच केले. प्रथम शिक्षक, नंतर प्राध्यापक व नंतर पुणे विद्यापीठात मराठीचे विभाग प्रमुख अशी त्यांची शिक्षणक्षेत्रातील कारकीर्द होती. त्यांनी ‘म.सा.पत्रिका’ व ‘लोकशिक्षण’ या नियतकालिकांचे संपादन केले.

     मराठी टीकाकारांमध्ये मौलिक आणि विधायक टीका लिहिणारे श्रेष्ठ टीकाकार म्हणून रा.शं.वाळिंबे ख्यातकीर्त होते. इंग्रजी, संस्कृत आणि मराठी या तिन्ही भाषांतील अभिजात साहित्याचा आणि समीक्षेचा त्यांचा व्यासंग होता. ‘साहित्याचा ध्रुवतारा’, ‘सुधाकर की एकच प्याला’, ‘वाङ्मयीन टीका’, ‘साहित्यमीमांसा’, ‘बालकवी’, ‘वाङ्मयीन संप्रदाय’, ‘नाटककार गडकरी’, ‘मुक्तात्म्यापासून प्रमद्वरेपर्यंत’, ‘ज्ञानेश्वरीतील विदग्ध रसवृत्ती’, ‘गडकर्‍यांचे अंतरंग’, ‘साहित्य आणि अश्लीलता’, इत्यादी ग्रंथांची सूची पाहूनच त्यांचे समीक्षा कर्तृत्व समजते.

     त्यांच्या समीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे साहित्यविषयक विवाद्य प्रश्नांना त्यांनी साधकबाधक उत्तरे दिली आहेत. त्यांचे साहित्यकृतीचे परीक्षण अतिशय रसाळ भाषेत लिहिलेले असते. त्यांच्या टीकालेखनात विद्वत्ता, रहस्योद्घाटन, कलात्मकता आणि समतोलपणा आढळतो. साहित्याचे मूल्यमापन हे केवळ सौंदर्यशास्त्रीय आणि वाङ्मयीन मूल्यांवर अवलंबून ठेवता कामा नये. काही साहित्यबाह्य निकषही त्यासाठी लावले पाहिजेत, असे त्यांचे मत होते.

     ‘वाङ्मयीन टीका’ या ग्रंथात त्यांनी टीकाशास्त्रविषयक अनेक मूल्यांची सप्रमाण चर्चा केलेली आहे. टीकापद्धतींचा समन्वय साधणारे रा.शं. वाळिंबे टीकालेखक, आणि ज्ञान आणि आल्हाददायक विवेचन करणारे समीक्षक म्हणून हे नाव महत्त्वाचे आहे.

     - डॉ. सुवर्णा दिवेकर

वाळिंबे, रामचंद्र शंकर