सांकलिया, हसमुख धीरजलाल
हसमुख धीरजलाल सांकलिया यांना आधुनिक भारतीय पुरातत्त्वाचे जनक (Father of Indian Archaeology ) म्हटले जाते. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी एम.ए. व एल्एल.बी. या पदव्या संपादन केल्यानंतर सांकलिया पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. त्यांनी लंडन विद्यापीठामधून ‘गुजरातेतील पुरातत्त्व’ या विषयावर डॉक्टरेट पदवी मिळवली. प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी, विशेषत: पुराणांचे ऐतिहासिकत्व सिद्ध करण्यासाठी आपण महाविद्यालयीन जीवनापासूनच प्रेरित झालो, असे त्यांनी आत्मचरित्रात नमूद केले आहे. त्यासाठी सांकलियांनी संस्कृतचा अभ्यास केला. त्यांची ही संस्कृतची पार्श्वभूमी त्यांना प्राचीन भारतीय इतिहास व पुरातत्त्व यांच्या सखोल अभ्यासात उपयोगी पडली.
भारतात परतल्यानंतर सांकलियांनी काही काळ मुंबईला प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम (छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय), द एशियाटिक सोसायटी व हेरास इन्स्टिट्यूट येथे काम केले. जुन्या डेक्कन कॉलेजचे १९३९मध्ये पुनरुज्जीवन झाल्यानंतर सांकलियांची प्राध्यापक या पदावर नेमणूक झाली. सांकलियांनी हे पद स्वीकारणे हा क्षण भारतीय पुरातत्त्वाला निर्णायक वळण देणारा ठरला. गेल्या सहा-सात दशकांमध्ये भारतीय पुरातत्त्वाला जो वैज्ञानिक पाया प्राप्त झाला, त्याला प्रा. सांकलियांचे द्रष्टेपण कारणीभूत ठरले.
नावलौकिक मिळवल्यानंतर अनेक प्रलोभने नाकारून, सांकलियांनी डेक्कन कॉलेजमध्येच राहून संस्थेची जोपासना करणे पसंत केले. त्यांनी अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांना डॉक्टरेटसाठी मार्गदर्शन केले. याखेरीज त्यांचा सहवास मिळवून प्रभावित झालेले व पुरातत्त्वीय पद्धती शिकलेले इतर अनेक विद्यार्थी आहेत. त्यांनी जवळजवळ तीन पिढ्यांच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले. सांकलियांच्या हाताखाली तयार झालेल्या पुरातत्त्वज्ञांनी गेली पन्नास वर्षे भारतीय पुरातत्त्वाच्या क्षेत्रात मोलाची भूमिका बजावली आहे. सांकलियांचे विद्यार्थी के. पदय्या यांनी सांकलियांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जे गौरवोद्गार काढले आहेत त्यातून सांकलियांची एकूण जीवनदृष्टी व त्यांची राष्ट्रवादी प्रेरणा समजते.
“Through his many sided efforts ,he sought to imprint the study of the past onto national conciouness .” (Paddaya 1999:581 )
प्रा. सांकलियांनी त्यांच्या आयुष्यात संशोधन केले व मुख्य म्हणजे भरपूर लेखन केले. त्यांनी एकूण १० सर्वेक्षणे व उत्खनन वृत्तान्त प्रकाशित केले. त्यांनी ३५ पुस्तके लिहिली. यांतील १२ पुस्तके हिंदी, मराठी व गुजराती या भाषांमधील आहेत, कारण पुरातत्त्वीय संशोधनातून मिळालेले ज्ञान सर्वसामान्यांना कळेल अशा प्रकारे मांडणे ही संशोधकांचीच जबाबदारी आहे, असे ते मानत. त्यांनी संशोधनपर नियतकालिकांमध्ये सुमारे २०० शोधनिबंध तर लिहिलेच, पण त्याखेरीज त्यापेक्षाही जास्त लेख त्यांनी वर्तमानपत्रांमध्ये व मासिकांमध्ये प्रकाशित केले.
रॉबर्ट ब्रूस फूट यांच्या लेखनातून धागा निवड़ून सांकलियांनी १९४०मध्ये सर्वेक्षण केले. साबरमती नदीच्या खोर्यात मेहसाणा जिल्ह्यात अनेक पुराश्मयुगीन व मध्याश्मयुगीन स्थळे शोधून काढली आणि गुजरातमधील लांघणज या मध्याश्मयुगीन स्थळाचे उत्खनन केले. एखाद्या मध्याश्मयुगीन स्थळाचे हे भारतातील पहिलेवहिले उत्खनन होते.
सांकलियांनी १९४३-४४मध्ये गोदावरी नदीच्या खोर्यात प्रागैतिहासिक सर्वेक्षणाची सुरुवात केली. गोदावरी व तिच्या उपनद्यांच्या खोर्यांमध्ये नाशिक जिल्ह्यात अनेक प्रागैतिहासिक स्थळे शोधून काढली. १९५२मध्ये सांकलियांना नाशिकजवळ गंगापूर येथे बसॉल्टचा वापर करून तयार केलेली अनेक प्रकारची पुराश्मयुगीन अवजारे मिळाली. १९५४-१९५५मध्ये नेवासे येथे उत्खनन करत असताना सांकलियांनी प्रवरा नदीच्या खोर्यात सर्वेक्षणाचे काम हाती घेतले. तेथे त्यांना तीन पुराश्मयुगीन सांस्कृतिक कालखंडांतील अवजारांचे संच स्तरनिबद्ध मिळाले. त्या शोधामुळे बसॉल्ट उपलब्ध असणार्या ठिकाणी प्रागैतिहासिक मानवी वसाहतींचे पुरावे मिळणार नाहीत हे रॉबर्ट ब्रुस फूट यांचे मत योग्य नसल्याचे सिद्ध झाले. या संशोधनाचा परिणाम म्हणून पूर्वी प्रागैतिहासिक अवशेष मिळणार नाहीत अशी समजूत असणार्या अनेक भागांत प्रागैतिहासिक संशोधन करण्याची प्रेरणा त्यांचे विद्यार्थी व इतर संशोधक यांना मिळाली.
प्रागैतिहासिक स्थळांचे सर्वेक्षण व संशोधन करत असतानाच सांकलियांचे लक्ष इतर सांस्कृतिक अवशेषांकडे होतेच. सांकलियांनी संशोधनाला प्रारंभ केला, तेव्हा प्रागैतिहासिक व ऐतिहासिक कालखंडांमध्ये मोठी पोकळी होती. तत्कालीन भारताच्या वायव्य भागात सिंधू संस्कृतीच्या स्थळांचा शोध लागल्याने काही प्रमाणात ही पोकळी कमी झाली होती. तसेच दक्षिण भारतात अनेक ठिकाणी नवाश्मयुगीन कुर्हाडी मिळाल्या होत्या. तथापि प्रागैतिहासिक काळ व गंगा-यमुना खोर्यातील चित्रित राखी मृद्भांडी वापरणार्या ग्रमीण संस्कृतींच्या काळादरम्यान काय घडले, हे जाणून घेण्यासाठी अधिक संशोधनाची गरज होती. सांकलियांनी या संदर्भात भारतीय पुरातत्त्वाच्या इतिहासात मोलाची भूमिका बजावली.
प्रवरा नदीच्या काठावरील जोर्वे येथे सांकलियांनी सर्वप्रथम १९५०-१९५१मध्ये ताम्रपाषाणयुगीन स्थळाचे उत्खनन केले. या ठिकाणी चाकावर घडवलेली व पक्की भाजलेली लाल रंगाची चित्रित मृद्भांडी मिळाली. यानंतर सांकलियांनी मध्य प्रदेशातील महेश्वर व नावडातोली या नर्मदा नदीच्या दोन्ही काठांवरील स्थळांचे १९५३ ते १९५९ दरम्यान उत्खनन केले. त्या काळात भारतात नावडातोली हे आडव्या पद्धतीने उत्खनन झालेले सर्वांत मोठे पुरातत्त्वीय स्थळ होते. या उत्खननातून ताम्रपाषाणयुगीन खेडेगावाचा विस्तृत आराखडा हाती आला व लोकजीवनाची माहिती मिळाली. सांकलियांनी १९५४-१९५६मध्ये व पुन्हा १९५९-१९६१मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासे या ठिकाणी उत्खनन केले. या उत्खननांमध्ये ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच नव्हे तर प्रागैतिहासिक काळापासून ते मराठा कालखंडापर्यंतचा सलग पुरातत्त्वीय पुरावा हाती आला.
सांकलिया यांनी १९६१-१९६२मध्ये राजस्थानातील अहाड या अत्यंत महत्त्वाच्या ताम्रपाषाणयुगीन स्थळाचे उत्खनन केले. या उत्खननाने ताम्रपाषाणयुगातील अहाड संस्कृतीच्या अभ्यासाचे नवे दालन उघडले. घोडनदीच्या काठावरील इनामगाव हे सांकलियांनी उत्खनन केलेले अखेरचे ताम्रपाषाणयुगीन स्थळ आहे. सलग १२ वर्षे उत्खनन झालेले हे ताम्रपाषाणयुगीन स्थळ भारतीय पुरातत्त्वाच्या इतिहासातला एक मैलाचा दगड मानले जाते. जरी सांकलियांना प्रागैतिहासिक व आदि-ऐतिहासिक काळात मुख्य रस होता, तरी त्यांनी अनेक ऐतिहासिक स्थळांचे उत्खनन केले आहे. त्यांनी १९४५-१९४६मध्ये कोल्हापूर येथे व १९५०-१९५१मध्ये नाशिक येथे उत्खनन केले. सांकलियांना ऐतिहासिक (पुराणांमधील) माहितीचा वापर करून काही पुरातत्त्वीय पुरावे मिळतात का, ते पाहायचे होते. त्यासाठी १९६६ या वर्षी त्रिपुरी येथे उत्खनन केले.
जरी पुरातत्त्व ही मानव्य शास्त्राची एक शाखा आहे, असे मानले जात असले, तरी सांकलियांनी फार पूर्वीपासून ओळखले होते, की पुरातत्त्वीय पुराव्यांचा अर्थ लावून प्राचीन मानवी व्यवहार व वर्तन यांच्यासंबंधी अनुमाने काढण्यासाठी विविध वैज्ञानिकांची मदत आवश्यक असते. विशेषत: प्राचीन काळातील पर्यावरण, उदरनिर्वाह, साधने, कालमापन व स्तररचनेचे विश्लेषण यांसाठी निरनिराळ्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर करावा लागतो. म्हणूनच लांघणज उत्खननापासूनच सांकलियांनी प्रा. कुरुलकर, जे. सी. जॉर्ज, डी. आर. शहा, ज्यूलिएट क्लटन-ब्रुक, केनेथ केनेडी व विष्णू मित्रे अशा विविध तज्ज्ञ वैज्ञानिकांचे सहकार्य घेतले. पुढील काळात सांकलियांच्या दूरदृष्टीमुळे डेक्कन महविद्यालयात पुरातत्त्वीय विज्ञानाच्या विविध शाखांच्या जागतिक दर्जाच्या संशोधन प्रयोगशाळा निर्माण झाल्या.
विद्यार्थी असतानाच प्राचीन भारतीय इतिहासाकडे आकृष्ट झालेल्या सांकलियांना लिखित साधनांमध्ये व विशेषत: प्राचीन संस्कृत साहित्यात रस होता. पुरातत्त्वीय पुरावे व लिखित साधने एकत्रितपणाने वापरली पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. वैयक्तिक जीवनात धार्मिक असूनही सांकलियांनी लिखित साधनांमध्ये ऐतिहासिक सत्य असतेच, असे ठोकळेबाजपणे कधीच मानले नाही. ठोकळेबाजपणे त्यांनी लिखित साधनांमधील सत्य शोधण्यासाठी व नंतरच्या काळात घुसलेले भाग ओळखण्यासाठी रामायणाचे सखोल संशोधन केले. रामायणाच्या लिखित संहितांमधलाच अंतर्गत पुरावा व पुरातत्त्वीय पुरावे यांची सांगड घालून सांकलियांनी रामायणाच्या रचनेचा काळ निश्चित केला. तो इसवीसनाच्या तिसर्या शतकापूर्वी फार मागचा नसावा असे अनुमान त्यांनी काढले. रामायणात उल्लेख असणारी लंका ही आजचा श्रीलंका देश नसून ती मध्य भारतात एका छोट्या बेटावर होती असे प्रतिपादन त्यांनी केले. सांकलियांच्या या मताला असणार्या पुराव्यांचा विचार न करता अनेकांनी (संस्कृत व पुरातत्त्व दोन्हीचे अज्ञान असणार्यांनीही) या मताला विरोध केला. काही जणांनी (संस्कृत व पुरातत्त्व दोन्हींचे अज्ञान असणार्यांनीही) तर वृत्तपत्रीय लेखनात सांकलियांची चेष्टाही केली. तथापि आजही त्यांच्या या संशोधनातील अनेक मुद्दे खोडून काढता येत नाहीत.
२. P|addaya k.1999.HassmuskhD.Sankalia ,in The Encyclopedia of Archelogy .the great Archeology volume 2 (T.murrary Ed.)pp 581-589.
३. Paddaya ,K.p.p.jogalekar K.K.Basa and R. Sawant (eds.)2009 Recent Research Trend in south Asian Archelogy .Proceeding of Birh CentenarySeminar .Pune :deccan college .
४. Sankalia ,H.D. 1973 Prehistory and Protohistry of India And Pakistan .Mumbai :university of bombway .
५. Sankalia ,H.D. 1973.Ramayana .Myth or reality ?New Delhi :Peoples Publishing House .
६. Sankalia h.D. 1978.Born for Archeology New Delhi :B.R.Publishing Corp.