Skip to main content
x

सैनिस, कृष्णा बालाजी

     कृष्णा सैनिस हे भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई येथे जैव-वैद्यकीय समूहाचे संचालक (निर्देशक) आहेत. भारतातील प्रतिरक्षणशास्त्र (इम्युनोलॉजी) या विषयांत ते एक ज्येष्ठ वैज्ञानिक म्हणून गणले जातात. त्यांनी आपल्या विद्यालयीन आणि विद्यापीठीय कारकिर्दीत सातत्याने गुणानुक्रम मिळविला आहे. 

     कृष्णा बालाजी सैनिस यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला. हिंगणघाटच्या मोहता नगरपालिका विद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण झाले. वरोरा येथील आनंद निकेतन महाविद्यालयात शिकून नागपूर विद्यापीठात बी.एस्सी. अभ्यासक्रमात दुसरा क्रमांक मिळविल्यावर त्यांनी पुणे विद्यापीठातून १९६८ साली जीवरसायनशास्त्रात एम.एस्सी. पदवी पहिल्या क्रमांकाने प्राप्त केली. पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी त्यांना १९८० साली मिळाली.

     पुण्याच्या राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेत (एन.सी.एल.) एक वर्ष रिसर्च फेलो म्हणून त्यांनी ‘सिटेट लाएझ’ या विकराच्या (एन्झायम्स) रचनेवर संशोधन केले. त्यानंतर भाभा अणुसंशोधन केंद्राच्या प्रशिक्षण प्रशालेत प्रथमच सुरू होत असलेल्या विकिरण जीवनशास्त्र (रेडिओ बायोलॉजी) या एकवर्षीय अभ्यासक्रमासाठी त्यांची निवड झाली. तेथे त्यांनी प्रथम क्रमांक मिळवून डॉ. होमी भाभा पदक व पुरस्कार मिळविला. तेव्हापासून ते प्रतिरक्षणशास्त्र या विषयावर सतत संशोधनात व्यग्र आहेत. त्यांनी पेशीबद्ध प्रतिरक्षण, कर्करोगविरोधी प्रतिरक्षण, आत्म-प्रतिरक्षी व्याधी, प्रतिरक्षण नियमन (इम्युनोमॉड्युलेशन) विकिरणाचा प्रतिरक्षण संस्थेवरील परिणाम, तसेच वैद्यकीय वनस्पतींपासून प्राप्त होणार्‍या घटकांची प्रतिरक्षण नियामक क्षमता या वेगवेगळ्या विषयांवर संशोधन केले.

     उंदरांच्या निरोगी लिम्फपेशी व ल्युकेमियाग्रस्त लिम्फपेशींच्या पृष्ठभागावरील संवेदकांवर केलेले त्यांचे तुलनात्मक संशोधन प्रसिद्ध आहे. ‘कॉनकॅनाव्हालिन-ए’ या वाल-प्रजातीपासून मिळणार्‍या प्रथिनांमुळे लिम्फपेशींचे विभाजन होते. डॉ.सैनिसांनी असे दाखवून दिले, की निरोगी पेशींवर या प्रथिनांसाठी दोन प्रकारचे संवेदक गट (टाइप ऑफ रिसेप्शन) असतात. परंतु, ल्युकेमियाग्रस्त पेशींवर केवळ एकच संवेदक गट आढळून येतो. या संवेदकांचे पेशींच्या पृष्ठभागावरील पुनर्वितरणाचे (रिसेप्टर रिडिस्ट्रिब्यूशन) गुणधर्म वेगवेगळे असतात. ‘सेल इलेक्ट्रोफोरॅसिस’ व ‘टू कलर फ्यूरेसन मायक्रोस्कोपी’द्वारा त्यांनी हे दाखवून दिले. तसेच, या गुणधर्माचा पेशींच्या परिपक्वतेशी संबंध असू शकतो हे दाखवून दिले. या संशोधनासाठी त्यांना भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकॅडमीचे (इन्सा) युवा वैज्ञानिक पदक व पुरस्कार १९८१ साली मिळाले. तद्नंतर डॉ.सैनिसांनी ‘सेल इलेक्ट्रोफोरॅसिस’चे तंत्र वापरून पेशीबद्ध प्रतिरक्षणाचा अभ्यास केला.

     बॉस्टन (अमेरिकेत) पोस्ट डॉक्टरल संशोधनासाठी त्यांनी उंदरांमधील ‘सिस्टेमिक लूपस रिथिमॅटोस’ या आत्म प्रतिरक्षी व्याधीच्या नियमनाचा अभ्यास केला. ‘एस.डब्ल्यू.आर.’ या निरोगी व ‘एन.झेड.बी.’ या ‘ऑटोइम्यून’ जातींच्या संकरातून निर्माण होणार्‍या फ्लाय बर्डमध्ये हा रोग आढळतो. डी.एन.ए.विरुद्ध प्रतितत्त्वे (अ‍ॅन्टिबॉडीज) तयार होतात. डॉ.सैनिसांनी प्रथमच असे दाखवले, की या प्रतितत्त्वांना तयार करण्यासाठी निरोगी जातीच्या पालकाचे जीन्स (इम्युनोग्लोब्लीन अ‍ॅलोटाइप्स) वापरले जातात. त्याहून महत्त्वाचे म्हणजे नेहमीच्या ‘सीडी-फोर प्लस टी’ लिम्फपेशींबरोबरच, ‘सीडी-फोर-सीडी-एट’, अशा वेगळ्या टी लिम्फपेशी या प्रतितत्त्वांच्या निर्मितीत हातभार लावतात. अशा पेशींच्या ‘सेल लाइन्स’ त्यांनी प्रयोगशाळेत तयार केल्या व त्यांवर आत्म-प्रतिरक्षी संवेदक असतात हे दाखवून दिले.

     भारतात परतल्यावर हाफकिन इन्स्टिट्यूटच्या डॉ.कामतांसोबत त्यांनी सहकार्य केले. या संशोधनातून असे निष्पन्न झाले की, रोगजंतू (मायक्रोबॅक्टेरिया) शरीरात ज्या मार्गाने प्रवेश करतात, त्यावर त्यांच्याविरुद्ध प्रतिरक्षण निर्माण होण्याची क्रिया अवलंबून असते. उदरपोकळीत (पेरिटोनल कॅव्हिटी) प्रवेश केल्याने या क्रियेचे दमन (सप्रेशन) होते व त्यासाठी ‘सीडी-फोर प्लस’ व ‘सीडी-एट प्लस टी’ लिम्फपेशींमधील वाढीसाठी होणारी स्पर्धा कारणीभूत आहे. या दोन्ही संशोधनकार्यांसाठी १९९४ साली त्यांना सी.एस.आय.आर.ने शांतिस्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित केले.

     गेल्या दहा-पंधरा वर्षात डॉ. सैनिसांच्या संशोधनाचा भर विकिरण जीव शास्त्रावर आहे. कमी मात्रेच्या विकिरणाने प्रतिरक्षण संस्थेवर उंदरांच्या एका जातीमध्ये अनुकूल तर दुसर्‍या जातीवर प्रतिकूल परिणाम होतात, हे त्यांनी प्रथमच शोधून काढले. शिवाय प्रतिजनुक, प्रतिरक्षणाचा प्रकार यांवरही हे विकिरण परिणाम अवलंबून असतात हे दाखवून दिले. ‘सी ५७ बीएल/६’ जातीच्या उंदरामध्ये प्रतिरक्षणाचे उद्दीपन होत असताना, पेशी-विभाजनाची प्रक्रिया नियमित करणार्‍या ‘पी५३’, ‘बीसीएल-२’, ‘पीसीएनए’ या प्रथिनांची भूमिका स्पष्ट केली. नंतर त्यांच्या संशोधन गटाने प्रथमच लिम्फपेशींमध्ये विकिरण न झालेल्या पेशींवर विकिरित पेशीद्वारा निर्मित घटकांमुळे द्विस्तरीय परिणाम होतात हे दाखवून दिले. गेल्या ४-५ वर्षात त्यांनी अ‍ॅन्टिऑक्सिडन्ट्सचा, प्रतिरक्षण प्रणालीवरील परिणामांचा अभ्यास केला आहे. ‘क्लोरोफिलीन’ या हरितद्रव्यापासून निर्मित पदार्थाचे विकिरण संरक्षक (रेडिओप्रोटेक्टिव्ह) परिणामासोबत प्रतिरक्षण क्षमता वाढविणारे परिणाम त्यांनी दाखवून दिले.

     गुळवेलीच्या (टायनोस्पोरा कोरडिफोलिया) प्रतिरक्षण संस्थेवरील परिणामांचे संशोधन विशेष उल्लेखनीय आहे. ‘बायोअ‍ॅक्टिव्हिटी बेस प्युरिफिकेशन’च्या तंत्राचा वापर करून त्यांनी अ‍ॅराबिनोगॅलेशन वर्गातील पिष्टमय पदार्थ ‘जी१-४ए’ हा प्रतिरक्षा नियामक शोधून काढला. ‘जी१-४ए’च्या उपस्थितीत, तसेच गुळवेलीच्या खोडाच्या सत्त्वाचे प्राशन केल्याने उंदरांची प्रतिरक्षणक्षमता वृद्धिंगत झाली. इतकेच नव्हे, तर ‘जी१-ए’मुळे उंदरांना ‘एन्डोटॉक्सिक शॉक’पासून १०० टक्के संरक्षण मिळते हेही दाखवून दिले. त्यामुळे भाजलेल्या व्यक्तींच्या उपचारात ‘जी१-४ए’ चा उपयोग करणे शक्य व्हावे. या प्रतिरक्षा नियामकाने उद्दीपित बी लिम्फपेशी व मॅक्रोफनिस या पेशीमधील संवेदनप्रणालीवर त्यांनी संशोधन केले आहे. भाभा अणुसंशोधन केंद्रात जैव-वैद्यकीय गटाचे संचालक म्हणून त्यांनी अणुऊर्जेच्या कृषी व वैद्यकीय क्षेत्रातील प्रयोगांना प्रोत्साहन दिले, तसेच या तंत्रज्ञानाच्या उपयोगांनी निर्माण झालेल्या बियाणांच्या जाती, खाद्यान्न परिरक्षण पद्धती, उपचारपद्धतीचा प्रसार करण्यास मदत केली म्हणून त्यांना ‘इंडियन न्यूक्लियर सोसायटी’चा २००३ सालचा ज्येष्ठ वैज्ञानिकाचा पुरस्कार मिळाला.

     डॉ. सैनिस युनायटेड नेशन्स सायंटिफिक कमिटी ऑन इफेक्ट्स ऑफ अ‍ॅटॉमिक रेडिएशन, (यु.एन.एस.सी.इ.ए.आर.) मध्ये १९९९ सालापासून भारताचे प्रतिनिधित्व करतात. ‘इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एजन्सी’ने आण्विक उपयोजनावरील स्थायी सल्लागार गटात (स्टँडिंग अ‍ॅॅडव्हायझरी ग्रुप ऑन न्युक्लिअर अप्लिकेशन- एस.ए.जी.एन.ए.) त्यांचा समावेश केला आहे.

डॉ. तरला नांदेडकर

सैनिस, कृष्णा बालाजी