Skip to main content
x

हेबळे, सुमन

भावना

     चित्रपटसृष्टीत भावना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुमन हेबळे यांचा जन्म कर्नाटकातल्या हुबळी या गावी झाला. बालपणीच त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला तो, ‘सोन्याची लंका’ (१९५०) या चित्रपटातून. बालकलाकार   म्हणून पडद्यावर झळकलेल्या सुमन हेबळे यांना आपल्या तरुणपणात अभिनयाची चुणूक दाखवण्याची संधी मिळाली ती राजा परांजपे यांच्या १९६४ सालच्या ‘पाठलाग’ या रहस्यमय चित्रपटातून. या चित्रपटात नायिका म्हणून काम करत असतानाच दिग्दर्शक राजा परांजपे यांनी सुमन यांचे नामकरण ‘भावना’ असे केले. जयंत देवकुळे यांच्या ‘आशा परत येते’ या कथेवर बेतलेल्या ‘पाठलाग’ या चित्रपटात भावना यांनी आशा आणि निशा या दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाने रौप्यमहोत्सव साजरा केला. या यशस्वी चित्रपटानंतर भावना यांनी १९६८ साली ‘मंगळसूत्र’ या चित्रपटात भूमिका केली. त्यात रमेश देव, गजानन जागीरदार, विश्वास कुंटे, दामूअण्णा मालवणकर, दादा साळवी, कुसुम देशपांडे असे मातब्बर कलाकार होते. 

      ‘मानाल तर देव’ (१९७०) या चित्रपटात भावना यांना भूमिका करण्याची संधी मिळाली. त्यात त्यांचे सहकलाकार म्हणून आशा नाडकर्णी आणि काशिनाथ घाणेकर यांनी काम केले होते. या चित्रपटातील भूमिकांपेक्षा वेगळ्या प्रकारची भूमिका भावना यांना १९७१ सालच्या ‘अधिकार’ चित्रपटात मिळाली. त्यांनी केलेली कॅब्रे डान्सरची भूमिका लोकप्रिय झाली.

     चित्रपटात काम करणाऱ्या भावना यांनी रंगभूमीवरही काम केलेले आहे. ‘काचेचा चंद्र’, ‘माझं काय चुकलं’, ‘पप्पा सांगा कुणाचे’, ‘मन पाखरू पाखरू’ अशा नाटकांतून त्यांनी अभिनय केला. एकेकाळी नायिका म्हणून पडद्यावर येणाऱ्या भावना यांनी ‘निवडुंग’, ‘वजीर’ या चित्रपटातून चरित्रभूमिका साकारल्या.

- संपादित

हेबळे, सुमन