Skip to main content
x

हुबळीकर, शांता दोडप्पा

     हुबळीतील अदरगुंची या एका खेडेगावात शांता दोडप्पा हुबळीकर यांचा जन्म  झाला. वयाच्या तिसऱ्या वर्षीच शांताबार्ईंची आई आणि वडील दोडप्पा यांचे अकाली निधन झाले. शांताबाईंचे पाळण्यातले नाव राजम्मा उर्फ राजू होते. आईवडिलांचे छत्र हरवल्यानंतर अकरा वर्षांनी मोठी बहीण शारदा यांच्यासह त्या आपल्या आजीकडे राहू लागल्या. पण बेताच्या परिस्थितीमुळे आणि त्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे ‘राजम्मा’ आणि शारदा यांना दत्तक म्हणून एका सधन नातलगांकडे सोपवले. ‘राजम्मा’ यांच्या शांत स्वभावामुळे ‘सावित्राक्का’ या दत्तक आजीने त्यांचे नाव ‘शांता’ ठेवले. शांताबाईंचे शालेय शिक्षण सुरू झाले. शाळा व अभ्यास सुरू असताना अब्दुल करीम खाँसाहेब यांच्या हुबळीच्या मुक्कामात शांताबाईंनी त्यांच्याकडे साधारणपणे तीन वर्षे संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. तेथे सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर, ताराबाई यांच्याबरोबर त्यांचा स्नेह जुळला. या तीन वर्षातील गाण्यांच्या शिक्षणाने त्यांना आयुष्यभर साथ केली.

     शांताबाईंच्या दत्तक आईने त्यांच्या परोक्ष त्यांच्यासाठी एका वयस्क वराची निवड केली. या लग्नाला नकार देण्यासाठी त्यांनी आपल्या परिचितांच्या आधारे राहते घर सोडले आणि त्या गदगला निघून गेल्या. ‘गुब्बी’ नाटक कंपनीमध्ये त्या १९३० साली ४० रु. पगारावर दाखल झाल्या. मूकपटांच्या काळातही शांताबाईंचा नाटकांकडे ओढा होता. या नाटक कंपनीत ‘कित्तुर चन्नामा’, ‘महानंदा’ यासारखी नाटके होत असत. या गुब्बी नाटक कंपनीत बारीकसारीक भूमिका करून कंटाळल्यावर त्या चित्रपटात काम करण्यासाठी १९३५ साली नाटक कंपनीतून बाहेर पडल्या.

     योगायोगाने ‘कोल्हापूर सिनेटोन’च्या कलाविभागाचे व्यवस्थापक बाबूराव पेंढारकर यांच्याशी त्यांची भेट झाली आणि मुलाखतीच्या सोपस्कारानंतर शांताबाईंनी महिना ७५ रु. पगारावर ‘कोल्हापूर सिनेटोन’शी दोन वर्षांचा करार केला. त्यांनी याच कंपनीत ‘कालियामर्दन’ हा पहिला चित्रपट केला. त्यानंतर लगेच ‘गंगावतरण’ (१९३७) या चित्रपटात गंगेच्या आईची भूमिका केली. याच चित्रपटात त्यांना एक गाणे गाण्याचीही संधी मिळाली. या दोन चित्रपटांनंतर शांताबाईंचे चित्रपटाशी नाते दृढ झाले. भालजींनी ‘शालिनी सिनेटोन’मध्ये ‘संत कान्होपात्रा’ (१९३७) या चित्रपटाची निर्मिती सुरू केली. शांताबाईंना कान्होपात्रेच्या आईची म्हणजे श्यामाबाईची भूमिका मिळाली. या चित्रपटातील राजा परांजपे, चिंतामणराव कोल्हटकर, गंगाधर लोंढे, दिनकर कामण्णा या कलाकारांशी त्यांचा परिचय झाला.

     दोन वर्षांचा करार संपल्यावर शांताबाई चित्रपटात अभिनयाची किंवा पार्श्‍वगायनाची कामे मिळतील, या हेतूने १९३७ साली पुण्याला आल्या आणि ‘सवंगडी’ या सरस्वती सिनेटोनच्या चित्रपटामध्ये विमल सरदेसाई यांना तीन गाण्यांसाठी पार्श्‍वगायन केले. गोविंदराव टेंबे यांनी संगीत दिलेली शांताबाईंची गाणी लोकांना आवडली. या पार्श्‍वगायनासाठी त्यांना ४०० रु. मानधन मिळाले.

     ‘प्रभात’च्या ‘माझा मुलगा’ या चित्रपटासाठी बुवासाहेबांनी व्ही. शांताराम यांना शांताबाईंचे नाव सुचवले. शांताबाईंना प्रभातमध्ये मुलाखतीसाठी बोलावले. प्रभातच्या जाणत्या मंडळींसमोर शांताबाईंना ‘अमृतमंथन’मधील संवाद वाचायला दिले. शांताबाईंनी अभिनयासह संवाद म्हटले, त्यानंतर गाण्याची समज तपासण्यासाठी एक ठुमरीही गाऊन दाखवली. नायकाच्या आईच्या भूमिकेसाठी झालेल्या शांताबाईंची मुलाखत त्यांना थेट नायिकेची भूमिका देऊन गेली. ‘यंग इंडिया कंपनी’ने ‘गूज मन्मनीचे केले’, ‘मज फिरफिरुनी छळसी का’, ‘उसळत तेज भरे गगनात’ आणि ‘पाहू रे किती वाट’ ही चार गाणी ध्वनिमुद्रित केली. या गाण्यांमुळे शांताबाईंना लोकप्रियता आणि मानधनही मिळाले. याच चित्रपटाच्या ‘मेरा लडका’ या हिंदी आवृत्तीतही शांताबाईंनी नायिकेची भूमिका केली.

     यानंतर ‘प्रभात’ने ए. भास्करराव यांच्या कथेवर आधारित, वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रीच्या जीवनावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाची निर्मिती केली. ‘माणूस’ या चित्रपटातील ‘मैना’ ही त्यांची भूमिका चांगलीच गाजली. त्यातील ‘कशाला उद्याची बात’ या बहुभाषिक गाण्यामुळे शांताबाई हुबळीकर हे नाव वलयांकित झाले. डोक्यावर फेटा, हातात छडी असलेल्या या गाण्यातील शांताबाईंना भारतभर लोकप्रियता मिळाली. बंगाल फिल्म्स असोसिएशनने उत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक देऊन शांताबाईंचा सन्मान केला. पुरस्कार देण्याची प्रथा याच चित्रपटापासून सुरू झाली. ‘माणूस’ या चित्रपटासाठीच त्यांची योजना व्हावी अशा तऱ्हेने ‘माणूस’ आणि ‘शांताबाई हुबळीकर’ हे समीकरण बनले. ‘माणूस’ चित्रपटाची हिंदी आवृत्ती ‘आदमी’ त्याच वेळी तयार झाली. हिंदी भाषेतील ‘आदमी’ हा चित्रपट देशात-परदेशातही गाजला. चार्ली चॅप्लिननेही या चित्रपटाची प्रशंसा केली.

     एक दिवस अचानक शांताबाई आणि प्रभात कंपनी यांचा करार रद्द होऊन त्या प्रभातच्या बाहेर पडल्या. त्याच वर्षी १९३९ साली पुण्याच्या ‘डेक्कन एम्पोरियम’चे मालक आणि व्यावसायिक बापूसाहेब गिते यांच्याशी आळंदीला साधेपणाने शांताबाईंचा विवाह झाला.

     प्रभात कंपनीतील चित्रपटातील त्यांच्या कामामुळे नवे काम त्यांना विनसायास मिळाले. मुंबईच्या ‘तरुण पिक्चर्स’ या संस्थेचे दिग्दर्शक व्ही.एम. व्यास यांनी ‘प्रभात’ या हिंदी चित्रपटासाठी विचारणा केली आणि त्यांचा मुंबईमध्ये चित्रपटसृष्टीत अभिनयाचा प्रवास सुरू झाला. या संस्थेमध्ये ८००० रु. महिना पगार ठरला. १९४० च्या अखेरीला ‘प्रभात’ चित्रपट पूर्ण झाला. त्याच दरम्यान ‘सनराईज’ या कंपनीच्या ‘घर की लाज’ या कौटुंबिक चित्रपटातील शांताबाईंची ‘सोशिक पत्नीची’ भूमिका प्रेक्षकांना आवडली. प्रत्यक्ष आयुष्यातही हीच भूमिका त्यांनी पार पाडली. कारण मुंबईच्या वास्तव्यात त्यांचे पती त्यांच्याबरोबर कायमस्वरूपी राहू लागले. पुण्यातील त्यांचा व्यवसाय हळूहळू बुडाला, ते कर्जबाजारी झाले आणि शांताबाईंच्या कमाईवर पुढचे संपूर्ण जीवन जगले.

     ‘मालन’ या हिंदी चित्रपटानंतर १९४२ साली ‘पहिला पाळणा’ या मराठी चित्रपटाकरता शांताबाई कोल्हापूरला रवाना झाल्या. विश्राम बेडेकरांची संततीनियमावर आधारित हलकीफुलकी प्रेमकथा प्रेक्षकांना खूप आवडली. याच वर्षी शांताबाईंनी ‘घरसंसार’ या कानडी चित्रपटातही काम केले. पुण्याला परत आल्यानंतर २२ ऑक्टोबर १९४२ रोजी त्यांना मुलगा झाला, प्रदीप. त्यानंतरही ‘फिल्मिस्तान कंपनी’च्या ‘कुलकलंक’, ‘घरगृहस्थी’, ‘सौभाग्यवती भव’ या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. घर चालवण्यासाठी त्यांना शेवटपर्यंत काही ना काही काम करत राहावे लागले. पुण्याला त्यांनी बांधलेल्या बंगल्याकरता शांताबाईंना बराच आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. शेवटी तो ‘प्रदीप’ बंगला लिलावामध्ये विकला गेला. आजही ‘दीप बंगला’ नावाने हा बंगला ओळखला जातो.

      साधारणपणे १९५५ च्या सुमाराला शांताबाईंनी ‘सौभद्र’, ‘मानापमान’ या मराठी नाटकातही काम केले. केवळ उदरनिर्वाहासाठी त्या भारतभर गाण्याचे जलसे करत असत. पण तेथेही जमाखर्चाचा मेळ न बसल्याने त्यांनी जलसे बंद केले. आपल्या नवऱ्याने केलेली कर्जे आणि देणी भागवण्यात त्यांनी आपली सर्व कमाई, ऐश्‍वर्य पणाला लावले. पुण्याहून त्या पुन्हा मुंबईला राहू लागल्या. प्रौढ शिक्षण वर्गात त्या हिंदी आणि मराठी भाषा शिकवू लागल्या. लहानपणापासून मायेचे, हक्काचे माणूस त्यांना मिळाले नाही. शांताबाईंनी स्वत:च्या संसारात तो आनंद शोधण्याचा प्रयत्न केला. पण एकटेपणाने त्यांची अखेरपर्यंत सोबत केली. पुरोगामी विचारांच्या या स्वाभिमानी अभिनेत्रीने धीराने आणि संयमाने आपल्या आयुष्यातला संघर्ष केला. दरम्यानच्या काळात १९७७ साली बापूसाहेब गिते यांचे निधन झाले. मुलाच्या लग्नानंतर मुंबईच्या स्वत:च्या घरात त्या परक्या झाल्या. कुणालाही न सांगता एक दिवस त्या वसईच्या श्रद्धानंद आश्रमात दाखल झाल्या. दुर्दैवाने एका प्रतिष्ठित, एकेकाळच्या ऐश्‍वर्यसंपन्न, लोकप्रिय आणि गुणी अभिनेत्रीला आयुष्याचा चौदा वर्षे एवढा मोठा कालावधी अज्ञातवासाप्रमाणे घालवावा लागला. आश्रमात त्या ‘शांताबाई गिते’ या नावाने दाखल झाल्या होत्या. ‘शांता हुबळीकर’ या अभिनेत्रीचे नाव जगाच्या दृष्टीने पुसले गेले होते. कलेविषयी आदर असलेल्या, कलाकारांविषयी आस्था असलेल्या माधव गडकरी यांच्या लेखामुळे शांताबाई लोकांपर्यंत पुन्हा एकदा पोहोचल्या. त्यांना कलाकारांसाठी असलेले सरकारी ‘निवृत्तिवेतन’ही कालांतराने मिळू लागले. १९८९ साली शांताबाईंना ७५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्त पुण्यामध्ये सन्मानाने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याच वर्षी मुंबईत भरलेल्या जागतिक मराठी परिषदेत चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा सत्कार केला, त्यामध्ये राम मराठे, शाहू मोडक, ललिता पवार, उषाकिरण, मंजू करण, बेबी शकुंतला या कलाकारांबरोबरच शांताबाई उपस्थित होत्या. त्यानंतर शांताबाईंनी पुण्याच्या महिला मंडळाच्या आश्रमात राहण्याचा निर्णय घेतला.

     - नेहा वैशंपायन

संदर्भ
१) शब्दांकन - उपाध्ये शशिकला, 'कशाला उद्याच बात', श्रीविद्या प्रकाशन, पुणे; १९९०.
हुबळीकर, शांता दोडप्पा