Skip to main content
x

रानडे, रमाबाई महादेव

      रमाबाई रानडे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावात झाला. विवाहापूर्वीचे त्यांचे नाव यमुना कुर्लेकर होय. त्यांचे वडील अण्णासाहेब उर्फ माधवराव कुर्लेकर हे देवराष्ट्रे गावाचे जहागीरदार होते. आईचे नाव रमाबाई होते.

      १८५७ मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर तयार झालेल्या पहिल्या पदवीधर पिढीतील व्यासंगी विद्वान म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होत. १८७१ मध्ये रानडे यांची प्रथम वर्ग न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर त्यांची प्रथम पत्नी सखू उर्फ रमा यांचे निधन झाले. वडील गोविंदराव रानडे यांना न्या. रानडे यांनी द्वितीय विवाह करावा म्हणून आग्रह सुरू केला. अण्णासाहेब कुर्लेकर यांची धाकटी मुलगी यमुना हिचा १८७३ मध्ये न्या. रानडे यांच्याबरोबर विवाह झाला. पत्नीला शिकवून सामाजिक कार्य करण्यास त्यांना तयार करायचे होते. १८७६ पासून रमाबाईंनी इंग्रजी शिकण्यास सुरुवात केली. न्या. रानडे त्यांच्याकडून रोजची वर्तमानपत्रे वाचून घेत. ‘दक्षिणा प्राईज कमिटी’ची आलेली पुस्तके वाचायला सांगत. पुढे पुढे त्यांना आलेल्या पत्रांची उत्तरे तयार करण्यास सांगत.

      घरातील सनातनी, जुन्या विचारांच्या स्त्रियांचा विरोध रमाबाईंना सहन करावा लागे. १९ व्या शतकाचा उत्तरार्ध सामाजिक घडामोडींचा, तसेच राजकीय दृष्ट्याही महत्त्वाचा होता. न्या. रानडे यांचा सर्व घटनांमध्ये सक्रिय सहभाग असल्याने रमाबाईंचा व्यापक अनुभवविश्‍वाशी सतत संपर्क आला. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांगाने विकसित झाले. १८८० नंतर सार्वजनिक कार्यात सहभागी होण्यास रमाबाईंनी सुरुवात केली.

      १८८१ मध्ये न्यायमूर्तींची मुंबईला बदली झाल्यावर प्रार्थना सभेच्या वतीने दर रविवारी स्त्रियांसाठी होणाऱ्या सभेला रमाबाई जाऊ लागल्या. ‘स्त्रियांना आवश्यक विद्या कोणती?’ ‘स्त्रियांची संसारातील कर्तव्ये’ या विषयांवर त्यांनी निबंध वाचले. १ मे १८८२ रोेजी पं. रमाबाई यांनी ‘आर्य महिला समाजा’ची स्थापना केली तेव्हा त्यामध्ये रमाबाई रानडे होत्याच.

       १८८४ मध्ये पुण्यात मुलींसाठी नवीन शाळा सुरू करण्यासंबंधी सभा झाली. ‘हायस्कूल फॉर इंडियन गर्ल्स’ म्हणजे आजची प्रसिद्ध हुजुरपागा शाळा होय. या सभेला रमाबाई आणि अन्नपूर्णाबाई भांडारकर उपस्थित होत्या. शाळेची मागणी करणारे इंग्रजीतील निवेदन रमाबाईंनी सभेत सर्वांसमोर वाचून दाखवले. निवेदन न्या. रानडे यांनी लिहून दिले होते. सराव करून घेतला होता. मोठ्या सभेत इंग्रजीत भाषण करण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. रमाबाईंना या भाषणाने आत्मविश्‍वास आला. सार्वजनिक कार्यातील त्यांचा सहभाग वाढू लागला.

       १८८५ मध्ये ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’ची स्थापना झाल्यानंतर १८८७ पासून प्रत्येक अधिवेशनाला त्या जाऊ लागल्या. १८९० मध्ये संमती वयाचा कायदा गाजत होता तेव्हा कायद्याला अनुकूल असणाऱ्या ६०० स्त्रियांच्या सह्या रमाबाई आणि काशीबाई कानिटकर यांनी गोळा केल्या. ‘शारदा सदन’ सारख्या संस्थांतून सार्वजनिक कार्यक्रमांतून त्यांची भाषणे होत. हे एक प्रकारे त्यांचे प्रशिक्षण होते. स्वतंत्रपणे संस्थात्मक कार्य सुरू करण्याची प्रगल्भता त्यांना आली. स्वत:चे विचार, दृष्टिकोन विकसित झाला.

        १८९३ मध्ये पुण्यात हरी नारायण आपटे यांनी स्त्रियांच्या कलाकौशल्याचे प्रदर्शन भरवून स्पर्धा आयोजित केली होती तेव्हा परीक्षक म्हणून रमाबाईंनीच काम बघितले होते. १८९४ मध्ये मुंबईला रमाबाईंनी ‘हिंदू लेडीज क्लब’ ची स्थापना केली. असे नाव असले तरी सर्व धर्माच्या स्त्रियांना क्लबमध्ये प्रवेश दिला जाई.

         १६ जानेवारी १९०१ या दिवशी न्या. रानडे यांचे निधन झाले. पतीच्या  निधनाच्या दु:खातून सावरण्यास रमाबाईंना एक वर्ष लागले. त्यानंतर १९०२ मध्ये त्यांनी पुण्यात ‘हिंदू लेडीज क्लब’ची स्थापना केली. १९०४ मध्ये मुंबईला स्त्रियांची पहिली अखिल भारतीय महिला परिषद आयोजित केली होती. रमाबाई परिषदेच्या अध्यक्षा होत्या. न्या. रानडे यांच्या मृत्यूनंतर प्रथमच त्या जाहीर कार्यक्रमाला आल्या होत्या. या परिषदेनंतरच रमाबाईंच्या जीवनातील महत्त्वाच्या कार्याचे पर्व सुरू झाले. पाश्‍चात्त्य देशातील ‘सिस्टर्स’ प्रमाणे आपल्या देशात सुद्धा स्त्रियांनी सामाजिक कार्य करण्यास पुढे यावे. स्त्रियांनी आपली उदासीनता सोडूून द्यावी असे आवाहन रमाबाईंनी आपल्या भाषणात केले होते. रमाबाईंच्या विचारांचा बहरामजी मलबारी आणि दयामल गिडुमल यांच्यावर खूप प्रभाव पडला. स्त्रियांना शिक्षणाबरोबर व्यावसायिक मार्गदर्शन करून स्वावलंबी करणारी  एखादी संस्था रमाबाई रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करावी असा विचार या दोघांनी केला. १९०८ मध्ये मुंबई येथे प्रथम ‘सेवासदन - सिस्टर्स ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना केली. रमाबाई संस्थेच्या कायमच्या अध्यक्षा झाल्या. कमिटीत त्यांनी सर्व धर्माच्या स्त्रियांना आवर्जून घेतले.

        १९०९ मध्ये त्यांनी पुण्यात सेवासदन सुरू केले. प्रथम प्रयोग म्हणून हिंदू लेडीज क्लबच्या अंतर्गत सेवासदन सुरू केले. उत्तम प्रतिसाद मिळाल्याने ऑक्टोबर १९०९ पासून पुणे सेवासदन स्वतंत्र शाखा म्हणून सुरू झाले.

       पुणे सेवासदन रमाबाईंचे जीवनच बनले. गोपाळ कृष्ण देवधर यांच्या सहकार्याने त्यांनी सेवासदनचा वेगाने विकास केला. प्रथम सेवासदन रानडे वाड्यातच होते. संख्या वेगाने वाढल्याने स्वतंत्र इमारत बांधायचे ठरले. इमारत निधीसाठी १९१२ मध्ये स्त्रियांच्या कलाकौशल्याचे प्रदर्शन-फॅन्सी फेअर आयोजित करून स्त्रियांनाच स्टॉलवर विक्रीचे काम करण्यास सांगितले. १९१५ ला सेवासदन लक्ष्मी रोड वरील स्वत:च्या जागेत गेले. सेवासदनची कीर्ती ऐकून १५ फेब्रुवारी १९१५ रोजी म. गांधी आणि कस्तुरबा गांधी यांनी सेवासदनला भेट दिली. स्त्रियांसाठी चालणारे काम बघून प्रशंसा केली. सेवासदनच्या कार्याचा रमाबाईंना अखंड ध्यास असला तरी अन्य सामाजिक कार्याकडेही त्यांचे लक्ष होते. स्त्रियांशी संबंधित चळवळीत त्या सहभागी होत. १९०४ नंतर स्त्रियांच्या १९०७ सुरत, १९१२, १९२० सोलापूर येथे भरवलेल्या महिला परिषदांच्या त्या अध्यक्षा होत्या. १९०५ ला ब्रिटिश युवराज्ञी भारतात आल्या होत्या. मुंबईला निवडक स्त्रियांची त्यांनी भेट घेतली. तेव्हा त्या सभेत दुभाषक म्हणून रमाबाईंनी काम केले.

        १९१८ मध्ये पटेल कायद्यानुसार स्त्रियांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत व्हावे असे मान्य होऊनही महाराष्ट्रात सुरू झाले नव्हते. तेव्हा पुण्यात स्त्रियांनी आंदोलन केले. सेवासदन पासून निघालेल्या मोर्चाचे रमाबाईंनी नेतृत्व केले. १९२० ला स्त्रियांचे शिष्टमंडळ कायदे मंडळाच्या अध्यक्षांना भेटले तेव्हा रमाबाईंनीच पुढाकार घेतला. १९१७ ते १९२१ पर्यंत स्त्रियांनी मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मार्गारेट कझिन्स यांच्या नेतृत्वाखाली लढा दिला, त्यामध्येही रमाबाईंचा सहभाग होता. १९३० मध्ये नॅशनल फेडरेशनमध्ये स्त्रियांना प्रतिनिधित्व मिळावे अशी त्यांनी मागणी केली. १९२३ मध्ये पुण्यात लिबरल फेडरेशन मध्ये आपल्या भाषणात त्यांनी ‘रिमूव्हल ऑफ सेक्स डिसक्वालिफिकेशनचा’ ठराव मांडला. हे त्यांचे शेवटचे भाषण होते.

      न्या. रानडे यांची पत्नी म्हणूनही अनेक कर्तव्ये त्यांनी निष्ठेने केली. न्या. रानडे यांची प्रार्थना समाजातील धर्मपर भाषणे मिळवून संपादित करून प्रसिद्ध केली. त्यांचे निबंध ‘मिसलेनिअस रायटिंग अँड स्पीचेस’ ग्रंथरूपाने प्रसिद्ध केला. न. र. फाटक यांना मदत करून न्या. रानडे यांचे चरित्र प्रसिद्ध केले. स्वतः चरित्रास प्रस्तावना लिहिली. सामाजिक संस्थांना मदत करण्यासाठी न्या. रानडे यांनी निधी ठेवला होता. त्याच्या विश्‍वस्त म्हणून रमाबाईंनी काम केले. ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी : ( स्वत: संबंधी काही गोष्टी)’ हे आत्मचरित्र रमाबाईंनी १९१० मध्ये प्रसिद्ध केले. ग्रंथरूपाने प्रसिद्ध झालेले मराठीतील स्त्रीचे हे पहिले आत्मचरित्र होय. एकाच वर्षात या पुस्तकाच्या तीन आवृत्या प्रसिद्ध झाल्या.

       १९१३ मध्ये सरकारने ‘कैसर - ए - हिंद’ हे पदक देऊन रमाबाई रानडे यांचा गौरव केला.

       १९२४ जानेवारी पासून रमाबाईंची तब्येत बिघडू लागली. पुण्यात रमाबाईंचे निधन झाले. १९२४ साली रमाबाईंच्या अंतयात्रेत २०० हून अधिक स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. ही स्त्रियांनी त्यांना वाहिलेली उचित श्रद्धांजली होय.

- डॉ. स्वाती कर्वे

संदर्भ
१. विद्वांस माधवराव ; ‘श्रीमती रमाबाई रानडे -व्यक्ती आणि कार्य'.
२. विद्वांस माधवराव ; ‘रमास्मृती ’( स्मरणिका).
३. रानडे  रमाबाई ; ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’.
४. फाटक न. र. ; ‘महादेव गोविंद रानडे :चरित्र’.
५. डॉ.कर्वे स्वाती ; ‘स्त्रियांची शतपत्रे, संशोधन प्रकल्प’.
रानडे, रमाबाई महादेव