Skip to main content
x

पाटील, गणपत नायकू

     नेक मराठी चित्रपटांतून तृतीयपंथीयाची भूमिका करणारे नट म्हणून गणपत पाटील मराठी रसिकांच्या ओळखीचे आहेत. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे गरीब कुटुंबात झाला. लहानपणीच वडिलांचे निधन झाल्यामुळे घरची सर्व जबाबदारी त्यांच्या आईवर पडली. आपली व आपल्या सहा भावंडांची जबाबदारी एकट्या आईवर पडलेली असल्यामुळे गणपत पाटील यांना मोलमजुरी करणे, भाजीपाला विकणे, यांसारखी कामे करावी लागली. याच दरम्यान कोल्हापुरात होणाऱ्या मेळ्यांमध्ये ते कामे करू लागले, तसेच ‘रामायणा’मध्ये सीतेच्या भूमिकाही ते करत असत. या प्रत्ययकारी भूमिकेमुळे त्यांना ‘कॉलेजकुमारी’ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. वयाच्या १४व्या वर्षी त्यांनी राजा पंडित यांच्या ‘बाल ध्रुव’ या चित्रपटामध्ये भूमिका केली, पण त्या वेळेस त्यांना मॉब सीनमध्ये काम करावे लागले होते. या क्षेत्रात पैसे मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर गणपत पाटील यांनी उदरनिर्वाहासाठी हलक्या दर्जाची कामे करावयास सुरुवात केली. पण छंद म्हणून त्यांनी अभिनयाची कास सोडली नाही.

      पारतंत्र्याच्या काळात गणपत पाटील यांनी छुपेपणाने काही कामे केली. पण तेव्हाही त्यांना अभिनयाची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. याच काळात त्यांचा राजा गोसावी यांच्यासोबत परिचय झाला आणि त्यांच्या ओळखीनेच गणपत पाटील यांनी मा. विनायक यांच्या शालिनी सिनेटोनमार्फत चित्रपटसृष्टीत शिरकाव केला. तेव्हा सुरुवातीच्या दिवसात त्यांनी सुतारकाम करणे, रंगभूषा करणे अशी साहाय्यकाची कामे केली. कामे करत असताना त्यांच्या चित्रपटसृष्टीतील अनेकांशी परिचय झाला. त्यातूनच त्यांना राजा परांजपे यांच्या ‘बलिदान’ व राम गबाले यांच्या ‘वन्दे मातरम्’ या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. यातील त्यांचा अभिनय पाहून भालजी पेंढारकर यांनी गणपत पाटील यांना ‘मीठभाकर’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका दिली. यानंतर त्यांना अनेक चित्रपटातून कामे मिळाली. पुढे चित्रपटसृष्टीत त्यांचे नाव आदराने घेतले जाऊ लागले.

     चित्रपटातून मिळणारी रक्कम अपुरी पडू लागल्यामुळे गणपत पाटील या काळात मेकअपची कामे करू लागले. याच बरोबरीने ते नाटकातही कामे करू लागले. जयप्रकाश दानवे यांच्या ‘ऐका हो ऐका’ या अस्सल ग्रामीण ढंगाच्या तमाशाप्रधान नाटकात त्यांना तृतीयपंथी सोंगाड्याची भूमिका करण्याची संधी मिळाली व त्या संधीचे त्यांनी सोने केले. हे नाटक लोकप्रिय ठरल्यामुळे त्यांना लगेच आय. बारगीर यांच्या ‘जाळीमंदी पिकली करवंदं’ या नाटकात संधी मिळाली.

     गणपत पाटील यांच्या नाच्याच्या भूमिकेतील मार्दव लक्षात घेऊन कृष्णा पाटील यांनी ‘वाघ्या मुरळी’ चित्रपटात त्यांना तृतीयपंथी पुरुषाची भूमिका दिली. त्यासाठी त्यांना त्या वर्षीचा चरित्र अभिनेत्याचा (१९५४) महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. या प्रसिद्धीमुळे त्यांना अनेक तमाशाप्रधान चित्रपटांमध्ये नाच्याच्या भूमिका मिळाल्या. त्यांनी ‘मल्हारी मार्तंड’, ‘एक गाव बारा भानगडी’, ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी’ इत्यादी अनेक चित्रपटांतून भूमिका केल्या. ‘लावण्यावती’ हा त्यांना अभिनित केलेला शेवटचा चित्रपट होय. अनेक नाटकांतल्या त्यांच्या भूमिकाही गाजल्या. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांचे कोल्हापूर येथे निधन झाले.

- सुधीर नांदगावकर

संदर्भ
१) पाटील गणपत, 'रंग नटेश्वराचे', प्रभात प्रकाशन, पुणे; १९९५.
पाटील, गणपत नायकू