Skip to main content
x

बागूल, बाबूराव रामचंद्र

     आंबेडकरी परंपरेतील एक धगधगणारे, भावनाव्याकूळ झालेले, दुःखाने तडफडणारे व विद्रोहाने झपाटलेले जिते-जागते विद्यापीठ म्हणजे बाबूराव बागूल. दलित साहित्यातच नव्हे, तर संपूर्ण मराठी साहित्यातच मानवी जीवन खर्‍या अर्थाने रेखाटणारा बागूलांसारखा दुसरा कुठलाही कथाकार नाही. अशा या दलित कथेत वादळ ठरलेल्या बाबूराव बागूलांचे पूर्ण नाव श्री.बाबूराव रामचंद्र बागूल असून या बहुमुखी प्रतिभेच्या लेखकाचा जन्म एका अशिक्षित, गरीब कुटुंबात, नाशिकजवळील ‘विहितगाव’ येथे झाला, असे ते आपल्या ग्रंथात म्हणतात. परंतु, ते आपल्या जन्मसंदर्भासंबंधी  साशंकच आहेत. कारण, नेमके वर्ष त्यांना सांगता आलेले नाही. ते लिहितात, “आई शिकलेली नाही. तीस, एकतीस, बत्तीस या तिनांपैकी काहीही असू शकेल.” बागूलांच्या या विधानात जरी संदिग्धता असली, तरी १७-०७-१९३१ हाच त्यांचा जन्मदिवस आहे, असे स्वतः त्यांनी व मान्यवर दलित साहित्यिकांनी अधिकृतपणे सांगितले, आहे.

     बाबूराव बागूल यांचे आई-वडील परिस्थितीला इतके बळी पडले होते, की त्यांना आपल्या अपत्याच्या जन्माची तारीख लक्षात ठेवावी किंवा लिहून ठेवावी, हेसुद्धा कळले नाही. त्यांना एकूण चार स्त्रियांचे मातृत्व लाभले; कारण त्यांच्या आईची मुले वाचत नव्हती, म्हणून तिने ते मूल वाचावे याकरिता ते एका मांग स्त्रीच्या ओटीत टाकले. तिने ते मुसलमान बाईच्या ओटीत टाकल्यानंतर पुढे शेवटी त्यांच्या मावशीने त्यांचा संभाळ केला.

     वडील शेतीसोबत बैलाचा धंदा करीत व आई भाजी किंवा केळी विकत असे. असे आर्थिक ओढाताणीचे जीवन हे बागूल  जगत होते. लहानपणी ते सर्दी, खोकला, हिवताप, डोळे येणे, खरूज यांनी सतत आजारी असत. त्यामुळे ते तब्येतीने अतिशय किरकोळ होते. बारकी मान आणि मोठे डोळे असल्यामुळे मुले त्यांना ‘डोकमासा’ म्हणून चिडवीत असत. मास्तरांच्या छडीमुळे व आईच्या लाडकौतुकामुळे बालपणी त्यांची शाळा झालीच नाही.

     मराठी चौथीत असतानाच शेजारच्या ‘शेजवल’ मास्तरांच्या प्रेरणेने त्यांनी कविता - गाणे लिहिण्याचा प्रयत्न केला. याच काळात डॉ.आंबेडकर दलितांच्या न्याय्य हक्कांसाठी लढत होते. त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन बालवयात ते काव्य करू लागले. ही काव्यलेखनाची भूक भागवण्यासाठी शालेय स्कॉलरशिप मिळाली की, ते पुस्तके घेऊन वाचनात मग्न होत असत. ते फक्त एस.एस.सी.पर्यंत शिकले.

     पुढे मावशीने त्यांना मुंबईतील माटुंगा येथील ‘लेबरकॅम्प’ येथे शिक्षणासाठी नेले. माटुंगा येथील लेबरकॅम्पमधील गलिच्छ वातावरणात; मारामार्‍या, शिव्या, भांडणे अशा गजबजलेल्या वातावरणात; त्यांचा उदय होत होता. साधारणतः, १९३६ ते १९३८ हा लेबरकॅम्पमधील काळ असावा, असे ते सांगतात. ह्या काळात हिटलर, स्टॅलीन, लेनिन, कम्युनिस्ट पार्टी ही नावे त्यांच्या कानावर नेहमी येत. ह्याच काळात डॉ.आंबेडकरांचेही सामाजिक कार्य व क्रांती, हे उत्तुंग शिखरावर पोहोचले होते. म्हणून एकूणच समाज त्यातून ढवळून निघत होता. त्याचा परिणाम होणार्‍यांपैकी बाबूराव बागूल एक होते.

     साधारणतः १९४४ साली ते बारा ते चौदा वर्षांचे असतानाच, लहान वयात त्यांच्या मामाच्या पाच ते सहा वर्षांच्या मुलीबरोबर त्यांचा विवाह झाला.

     लेबरकॅम्पला कम्युनिस्ट पार्टीचे कार्यालय होते. म्हणून तेथे येणे-जाणे असल्यामुळे वाचनात मार्क्स-लेनिन आणि कम्युनिस्ट पार्टी हे वाङ्मय वाचण्याकडे त्यांचा कल झाला. पुढे त्यांच्या व्यक्तित्वाला निरनिराळे धुमारे फुटू लागले व ‘युवक संगर पथक’ नावाच्या संघटनेचे ते नेते झाले. ते खूप वाचन करत असल्यामुळे त्यांच्या कवितेतून मनाला अस्वस्थ करणारे प्रश्न ते कवितेत व्यक्त करायचे.

     सामाजिक परिवर्तनवादी वातावरणामुळे आपण खूप लिहावे, असे त्यांना वाटू लागले. नाटके, कविता, कादंबर्‍या ह्यांचे लेखन करावे; भाषणे करावीत; सशस्त्र क्रांती करावी; खूप काही करावे, असे त्यांना वाटत होते. म्हणून त्यांनी आपली वाटचाल कवितेकडून कादंबरीकडे वळवली व ‘कोंडी’ नावाची पहिली कादंबरी लिहिली. त्यानंतर त्यांना कविता हे क्षेत्र लहान वाटू लागल्यामुळे भोगलेल्या विचारांना मूर्तरूप देण्यासाठी पुढे-पुढे ते कथा लिहू लागले.

     ‘जेव्हा मी जात चोरली होती’ (१९६३) व ‘मरण स्वस्त होत आहे’ (१९६९) अशा प्रकारच्या जीवनसत्य व वाङ्मयीनदृष्ट्यासुद्धा उत्कृष्ट अशा कथा ते लिहू लागले. त्यांच्या बहुसंख्य कथा एका व्यक्तीभोवती गुंफलेल्या असतात. या व्यक्ती चारचौघांसारख्या मुळीच नसतात, त्या मनस्वी असतात. त्यांना ‘भुका’ असतात व आपली भूक तृप्त करण्यासाठी ते रूढ मार्ग कधीच आचरत नाहीत.

     बागूलांच्या मते, “भगवान बुद्ध म्हणजे; माणसातील परमोच्च माणूस. मला भगवान बुद्ध अत्यंत आदरणीय वाटतात; कारण माणसांबद्दल आत्यंतिक करुणा आणि माणसांचे प्रश्न सोडविण्याची प्रखर बुद्धिमत्ता त्यांच्याजवळ होती.” बागूल हे ‘मार्क्सवादी’ आहेत, असे साहित्यिक विश्वात म्हटले जाते. मात्र, ते आंबेडकरवादीच आहेत, हे त्यांच्या ‘डॉ.आंबेडकर भारत, भाग-१’ या चरित्रकथेवरून लक्षात येते.

     त्यांना ‘फाय फाउण्डेशनची गौरववृत्ती’ प्राप्त झाली होती तसेच ‘जनस्थान’ पुरस्कारही प्राप्त झाला होता. त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची गौरववृत्ती मिळाली होती. १९७१ साली महाराष्ट्र बौद्ध साहित्य सभेच्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९९० साली मार्च महिन्यात कल्याण येथे झालेल्या दहाव्या अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. फेबु्रवारी १९९३मध्ये, नागपूर येथे झालेल्या नवव्या अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

     ‘अस्मितादर्श’, ‘मायमाउली’, ‘सिंहगर्जना’, ‘नवयुग’, ‘पर्वा’, ‘आम्ही’ इत्यादी मासिकांत त्यांच्या कथा प्रकाशित झालेल्या आहेत. ते ‘आम्ही’ या मासिकाचे संस्थापक-संपादक होते.

     स्त्रियांविषयी त्यांना अतिशय कळवळा आहे. म्हणून ते म्हणतात की, “स्त्रीला प्राप्त झालेले मादीपण व सुंदरता हे तिच्या सर्वनाशाचे कारण होय; हे कोणीही नाकबूल करणार नाही.”

     भालचंद्र फडके बागूलांविषयी लिहितात, “दलित कथेची जडण-घडण होत असताना, तिला मानाचे स्थान मिळवून देणारे दलित कथेचे शिल्पकार म्हणजे श्री.बाबूराव बागूल होत.”

     अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणार्‍या थोर साहित्यरूपी हिर्‍याची जीवनज्योत मालवली, तेव्हा दलित साहित्यक्षेत्राची अपरिमित हानी झाली यात शंका नाही.

     - डॉ. ज्योती लांजेवार  

बागूल, बाबूराव रामचंद्र