Skip to main content
x

बाहेकर, रमेश चंद्रभान

     मेश चंद्रभान बाहेकर यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील किन्होळा या गावी झाला. २७ ऑक्टोबर १९९० रोजी ते मराठा लाइट इन्फन्ट्रीत दाखल झाले.

     ५ जून २००१ रोजी बाहेकर हे जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील सुरणकोट भागात एका मोहिमेत सहभागी झाले होते. ते सत्ताविसाव्या राष्ट्रीय रायफल बटालियनमध्ये कार्यरत होते. या भागात दहशतवाद्यांनी घुसखोरी केलेली होती. त्यामुळे याच भागात सैनिकांनी मोर्चा लावला होता.

     वादळी वारे आणि पावसात सलग अठ्ठेचाळीस तास या भागात बटालियनने निरीक्षण चालू ठेवले होते. दहशतवाद्यांचा एक गट भारतीय सैनिकांच्या या तुकडीला चुकवत एका ओढ्याजवळून चाललेला या तुकडीला दिसला. त्यांना पाहताच बाहेकर स्वत: पुढे सरसावले. दहशतवाद्यांना अनपेक्षित घेराव घालण्यासाठी त्यांनी तुकडीचे नेतृत्व केले. दहशतवाद्यांनीही या तुकडीवर अंदाधुंद गोळीबाराला सुरुवात केली.

     या गोळीबारात जखमी होऊनही त्यांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. यात त्यांना अपंगत्व आले तरीही या कारवाईतून ते मागे हटले नाहीत. या शौर्याबद्दल त्यांना २६ जानेवारी २००२ रोजी ‘शौर्यचक्र’ प्रदान करण्यात आले.

- रुपाली गोवंडे

बाहेकर, रमेश चंद्रभान