भागवत, लीलावती भास्कर
कुलाबा जिल्ह्यातल्या रोहे येथील त्र्यंबक नारायण पोतदार यांच्या लीलावती भागवत ह्या कन्या होत. लहानपणी त्यांच्यावर झालेल्या संस्कारात त्यांचे मामा, तात्या क्षीरसागर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. सूर्यनमस्कार, स्वसंरक्षणासाठी शारीरिक शिक्षण, स्वातंत्र्यवीरांच्या व स्वातंत्र्यसमराच्या रोमांचक कथा व संपूर्ण गीतेचे पाठांतर करून घेण्यात मामांनी भाचरांच्या मनात देशभक्तीचा अंकुर रुजवला. पुढच्या आयुष्यात लीलावतींना लहानपणीच्या या कमाईचा पुरेपूर उपयोग झाला. मामा हे सर्वंकष, प्रेमळ शिक्षक होते. लीलावतींचे शिक्षण कर्व्यांच्या कन्याशाळेत झाल्यावर त्या नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयातून जी.ए. झाल्या. १९४० साली त्यांचा विवाह श्री.भास्कर रामचंद्र भागवत यांच्याशी झाला.
बाल व कुमार ह्यांच्यासाठी केलेल्या लेखनासाठी मुख्यतः ख्यातनाम असलेल्या भागवत पति-पत्नींनी जीवनभर इतरही विपुल लेखन केले. मुंबई आकाशवाणीवर त्यांनी नोकरी केली. ‘मराठी बालसाहित्य: प्रवाह आणि स्वरूप’ (१९९५) हा त्यांचा बालसाहित्यासंबंधीचा सांगोपांग विवरण करणारा ग्रंथ महत्त्वाचा आहे. भा.रा.भागवत यांच्या विविधढंगी चुरचुरीत साहित्याचे संपादन त्यांनी ‘भाराभर गवत’ (१९८८) या ग्रंथात केले असून त्यांच्या विनोदी व खुसखुशीत लेखन-प्रवृत्तचे दर्शन मार्मिक परंतु जिव्हाळ्याने घडविले आहे. त्यांच्या अनेक कादंबर्यांपैकी ‘स्पर्शवेली’ (१९६७), ‘छाया झालीसे प्रकाश’ (१९६९), ‘हुंकार’ (१९७८), ‘मा निषाद’ (१९७८) व ‘घरटं’ (१९८०) या उल्लेखनीय आहेत. ‘जे नेत्री साठविले’ (१९६४) या प्रवासवर्णनाबरोबरच ‘पांढरा चाफा’ (१९६८) हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक अत्यंत मनोवेधक आहे. हिंदी कथासम्राट प्रेमचंद यांच्या काही कथांचा मराठी अनुवाद करून लीलावतींनी मराठी साहित्यात भर घालण्याची कामगिरी केली आहे. लीलाताईनी बालांसाठी व कुमारांसाठी कविता, कथा व कादंबरी असे प्रचुर लेखन केले आहे.