Skip to main content
x

दांडेकर, गोपाळ नीळकंठ

        गोपाळ दांडेकर यांचा जन्म विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील परतवाडा या गावी झाला. तिथेच चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षण झाल्यावर १४व्या वर्षी त्यांनी घरातून पलायन केले. पुढे संत गाडगे महाराजांची भेट झाल्यावर गोपाळबुवा जोशी ह्या नावाने कीर्तने करण्यात त्यांनी काही काळ घालवला. त्या सुमारास ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा ह्यांचा अभ्यास केला. श्रीधरशास्त्री पाठक यांच्याकडे वेदान्ताचा अभ्यास केला. २४ व्या वर्षी नर्मदा परिक्रमा केली. १९४१-१९४५ या काळात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम केले. याच काळात शरच्चंद्रांच्या साहित्याचे वाचन केले.  विवाहानंतर (१९४५) औंध येथील पंडित सातवळेकरांच्या ‘पुरुषार्थ’ मासिकाचे सहसंपादक म्हणून आणि ‘वैदिक धर्म’ ह्या हिंदी नियतकालिकाचे संपादक म्हणून काम केले. १९५० नंतर पुण्याजवळील तळेगाव येथे कायमचे वास्तव्य करून आयुष्याच्या अखेरपर्यंत केवळ लेखनावर उपजीविका केली.

दुर्गभ्रमण, चित्रपाषाण जमवणे, छायाचित्रण हे दांडेकरांचे छंद होते. महाराष्ट्रातील अनेक युवक-युवतींना दांडेकरांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या समवेत गिरीभ्रमणाचे धडे दिले. परिवारात ते ‘आप्पा’ या नावाने ओळखले जात. १९४५ साली ‘आमचे राष्ट्रपुरुष’ हे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. दांडेकरांनी ५० वर्षे सातत्याने विपुल लेखन केले. २६ कादंबर्‍या, १० नाटके, १२ ललित-प्रवास-प्रासंगिक व इतर पुस्तके, २ कथासंग्रह, ११ धार्मिक व चरित्रपर पुस्तके, १७ बाल-किशोर साहित्याची, आत्मचरित्र अशी दांडेकरांची विपुल ग्रंथसंपदा आहे. याशिवाय ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘जैत रे जैत’, ‘देवकीनंदन गोपाळा’ ह्या चित्रपटकथा दांडेकरांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या नऊ पुस्तकांचे हिंदी, सिंधी व गुजराती या भाषांत अनुवाद केले गेले आहेत.

‘बिंदूची कथा’ (१९४७) ही नौखालीच्या हत्याकांडावरील कादंबरी लिहून दांडेकरांनी कादंबरीच्या क्षेत्रात पदार्पण केले. आशय-अभिव्यक्तीच्या दृष्टीने त्यांच्या कादंबर्‍यांत वैविध्य आहे. उदाहरणार्थ प्रादेशिक कादंबर्‍या ‘शितू’ (१९५३), ‘पडघवली’ (१९५५); ‘माचीवरला बुधा’ (१९५८), ‘जैत रे जैत’ (१९६५), ‘रानभुली’ (१९७८), ‘वाघरू’ (१९७९), ‘मृण्मयी’ (१९७०), ‘पवनाकाठचा धोंडी’ (१९५५) ‘पूर्णामायची लेकरं’ (१९५८), ‘तांबडफुटी’ (१९८२) या दहा कादंबऱ्या लिहून दांडेकरांनी प्रादेशिक कादंबरी लेखकांमध्ये आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे. या कादंबर्‍यांतील जीवनदर्शनाला वास्तवाचा आणि लेखकाच्या स्वानुभवाचा आधार आहे. ‘मी लिहिलेल्या बहुतेक कादंबर्‍या ह्या माझे आत्मचरित्रच आहेत,’ ह्या त्यांच्या विधानाचा प्रत्यय प्रादेशिक विषयावरील कादंबर्‍या वाचताना येतो. प्रादेशिक कादंबरी लिहिताना ते प्रमुख व्यक्तिरेखेप्रमाणेच दुय्यम व्यक्तिरेखाही समर्थपणे उभ्या करतात. रेखीव आणि विविधरूपी निसर्गदर्शन, विविध प्रादेशिक बोलींचा वापर, नाट्यपूर्ण घटनांची निर्मिती, ठसठशीत स्त्री-चित्रण ही दांडेकरांच्या प्रादेशिक विषयावरील लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. दांडेकरांच्या प्रादेशिक कादंबर्‍यांतील ‘माचीवरला बुधा’, ‘जैत रे जैत’, ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘शितू’, ‘पडघवली’, ‘पूर्णामायची लेकरं’ ह्या कादंबर्‍या आशय-अभिव्यक्तीच्या दृष्टीने वेगळ्या आहेत. ‘माचीवरला बुधा’ ही निसर्गावर प्रेम करणार्‍या, निसर्गाचा भाग होऊन राहिलेल्या निसर्गवेड्या मनस्वी माणसाची कहाणी आहे. ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘रानभुली’ व ‘वाघरू’ ह्या कादंबर्‍या ‘बुधा’च्या परंपरेतील कादंबर्‍या आहेत.

‘शितू’ आणि ‘पडघवली’ या दोन कादंबर्‍यांना कोकणाची पार्श्वभूमी आहे. कोकणातील दैवते, कथा-दंतकथा (Myths) हे कोकणचे महत्त्वाचे प्रादेशिक वैशिष्ट्य आहे. अर्थात निसर्ग हाही तिथल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. ‘शितू’ कादंबरी म्हणजे दांडेकरांच्या शब्दांत ‘एक हळवी प्रेमकथा’ किंवा ‘प्रेमकाव्य’ आहे. ‘शितू’ कादंबरीत दांडेकरांनी कोकणचा परिसर आणि कोकणची भाषा एकत्र आणून पात्रनिर्मितीद्वारे कथानकाचा विकास साधला आहे.

कोकणच्या पार्श्वभूमीवरील ‘पडघवली’ ही कादंबरी मराठी प्रादेशिक कादंबरीच्या विकासक्रमातील एक महत्त्वाची कादंबरी ठरते. ती कथाविषयाच्या वेगळ्या हाताळणीमुळे आणि समूहचित्रणामुळे, ‘पडघवली’ कादंबरीतील लहानातली लहान व्यक्तिरेखादेखील दांडेकरांनी कलात्मक पातळीवर उभी केली आहे. अंबूवहिनी, व्यंकू, अक्का, शारदा, भिऊआबा आणि इतर व्यक्तिरेखांना  घनता लाभलेली आहे; कादंबरीतील एकही पात्र अनाठायी आलेले नाही. एकही घटना उपेक्षणीय नाही. पात्राच्या तोंडचे प्रत्येक वाक्य कथेची गती उत्तरोत्तर वाढवणारे आहे. जणू पडघवलीच विविध मुखांनी बोलते आहे. पडघवलीतील निसर्ग पडघवलीशी एकरूप झालेला आहे. पडघवलीतील केकताड, कातळ, करवंदी, माड, पोफळी, पर्‍ह्या-नाले यांची वर्णने दांडेकरांनी सूक्ष्म तपशिलांसह केली आहेत. कोकणच्या प्रादेशिक जीवनावर लिहिलेल्या कादंबर्‍यांतील सर्वांत अधिक कलात्मक पातळीवर जाणारी कादंबरी म्हणून ‘पडघवली’चाच निर्देश करावा लागतो. कोकणाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली ‘मृण्मयी’ ही दांडेकरांची स्त्री-व्यक्तिरेखाप्रधान कादंबरी आहे. दांडेकरांच्या सर्जनशीलतेचे वैशिष्ट्य म्हणजे ते महाराष्ट्राच्या कोणत्याही भूप्रदेशातील संस्कृतीशी सहजपणे एकरूप होतात. ‘पूर्णामायची लेकरं’ ह्या कादंबरीमध्ये दांडेकरांनी अभिव्यक्तीसाठी विदर्भ भूमी निवडली आणि प्रादेशिकतेची वेगळी वाट चोखाळली.

‘बया दार उघड’ (१९६७) ‘हरहर महादेव’ (१९६८), ‘दर्याभवानी’ (१९६९), ‘झुंजार माची’ (१९७२), ‘हे तो श्रींची इच्छा’ (१९७४) ह्या ऐतिहासिक विषयावरील पाच कादंबर्‍यांत गो. नी. दांडेकरांनी ‘शिवकाल’ उभा केला आहे. मराठीतील ऐतिहासिक कादंबरी-लेखनाच्या प्रवाहात दांडेकरांच्या कादंबर्‍या वेगळ्या ठरतात त्या त्यांच्यातील कालप्रधानता आणि समाजदर्शन या वैशिष्ट्यांमुळे.

दांडेकरांच्या कादंबर्‍यांचे चरित्रात्मक आत्मचरित्रात्मक कादंबर्‍या आणि प्रासंगिक व अन्य कादंबर्‍या असेही वर्गीकरण केले जाते. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास या संतांच्या जीवनावरील त्यांच्या कादंबर्‍या आणि ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’ (१९५७) ही नर्मदा परिक्रमेवरील आत्मपर कादंबरी हे लेखन म्हणजे दांडेकरांच्या लेखनाची वेगळी वाट आहे. वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंतचे जीवनचरित्र स्मरणगाथेत आले आहे. दांडग्या स्मरणशक्तीमुळे ते आपल्या आयुष्यातील बारीक-सारीक प्रसंगांचे तपशीलवार कथन करू शकले. ‘स्मरणगाथा’ (१९५३) हे आत्मचरित्र आणि ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’ (१९५७) ही आत्मचरित्रात्मक कादंबरी यांत लेखकाच्या जीवनातील घटना-प्रसंगांची सरमिसळ झाली आहे. ‘स्मरणगाथा’ म्हणजे दांडेकरांनी भोगलेल्या दुःखांची आणि यातनांची ‘गाथा’ आहे. ‘स्मरणगाथे’तील अनुभव हे वेदनादायी अनुभव आहेत. प्रवासवर्णनाचा स्पर्श असलेली ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’ ही मराठीतील एक लक्षणीय कादंबरी आहे.

भारतीय संस्कृतीत आणि परंपरेत मुळे रुजलेल्या दांडेकरांनी ‘श्रीकृष्णायन’ (१९५९), ‘श्रीरामायण’ (१९५८), ‘भावार्थ ज्ञानेश्वरी’ (१९६३), ‘भक्तिमार्गप्रदीप’ (१९६७) अशी धार्मिक पुस्तके लिहिली. ‘श्रीसंत गाडगेबाबा’ (१९७६) हे चरित्र लिहिले. याशिवाय स्थलवर्णने, प्रवासवर्णने, तल्लख ऐंद्रिय संवेदना, छंद जोपासण्याची वृत्ती, रसिकता, बहुश्रुतता यांची डूब असलेले स्फुटलेखन केले. ‘छंद माझे वेगळे’ (१९७९), ‘दुर्गदर्शन’ (१९६९), ‘दुर्गभ्रमणगाथा’ (१९८४), ‘मावळतीचे गहिरे रंग’ (अमेरिकेच्या प्रवासवर्णनाची दैनंदिनी १९८८) अशी वाचनीय पुस्तके लिहिली. ‘आईची देणगी’ (१९४५-१९४८) आणि ‘शिवबाचे शिलेदार’ (१९५७) ही पुस्तके दांडेकरांनी कुमारांसाठी लिहिली.

दांडेकर हे मराठीतील एक बहुप्रसव लेखक होते. आयुष्यभर लेखनावर उपजीविका करणार्‍या दांडेकरांनी आर्थिक गरजेपोटी लेखन केले असले, तरी जीवनमूल्यांशी फारकत घेतली नाही. त्यांचे अनुभवविश्व भावनेने भारावलेले होते. रसाळ ओघवती भाषा आणि भारतीय तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाचा पाया यांमुळे त्यांच्या कादंबर्‍या वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. दांडेकरांनी आपल्या सर्वच कादंबर्‍यांमध्ये मूल्यगर्भ व जगणे यांविषयी श्रद्धा असलेल्या व्यक्तिरेखा उभ्या केल्या आहेत. सहृदय मन आणि अध्यात्माचा स्पर्श त्यांच्या लेखनातून सतत जाणवत असतो. आधुनिक वास्तवातील समस्यांपासून त्यांच्या व्यक्तिरेखा जरी दूर असल्या, तरी जनसमूह जिवंत करण्याचे कौशल्य त्यांच्यापाशी निश्चित होते. अंगभूत आत्मीयता, माणसांविषयी असणारी कळकळ, सत्संस्कारांची आणि भारतीय संतविचार व तत्त्वदर्शनाची तीव्र ओढ या गुणांमुळे दांडेकरांचे लेखन वाचकप्रिय झाले आहे. प्रादेशिक जीवनदर्शनातील सूक्ष्मता, इतिहासाचा भव्य पट उभा करण्याची शक्ती, निसर्गाच्या विभ्रमांचे हृद्य रेखाटन, पशुप्राणी सृष्टीविषयी असलेले आकर्षण, स्त्रियांच्या दुःखाविषयी असणारी अतीव कणव ह्या दांडेकरांच्या व्यक्तिमत्त्व विशेषांमुळे दांडेकरांनी मराठी साहित्यात गुणवान साहित्यकृतींची भर घातली आहे.

दांडेकरांना अनेक पुरस्कारांनी वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे. ‘स्मरणगाथे’ला साहित्य अकादमी पुरस्कार, न.चिं.केळकर पारितोषिक आणि आचार्य अत्रे पारितोषिक या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे पुरस्कार ‘शितू’, ‘पडघवली’ आणि ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’ या पुस्तकांना प्राप्त झाले आहेत. ‘मोगरा फुलला’ ह्या कादंबरीला सोनोपंत दांडेकर पुरस्कार व शंकरजी नारायण पुरस्कार मिळाले आहेत. दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन, इंदूर; वाङ्मयपरिषद, बडोदा; शारदोत्सव, ग्वाल्हेर; औदुंबर साहित्य संमेलन, औदुंबर ह्या संमेलनांचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या दांडेकरांची १९८१ साली अकोला येथे आयोजित केलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. याशिवाय, महाराष्ट्र शासनाचा गौरव पुरस्कार (१९९०), नागपूर येथील छत्रपती प्रतिष्ठानचा जिजामाता पुरस्कार (१९९०), नारळकर प्रतिष्ठानाचा विद्वत्ता पुरस्कार (१९९२), तळेगाव-दाभाडे नगरभूषण, द्वारकापीठाची साहित्य वाचस्पती आणि पुणे विद्यापीठाची डी. लिट. अशा विविध पुरस्कारांनी, सन्मानांनी आणि पदव्यांनी सन्मानित करण्यात आले.

व्यक्ती आणि लेखक म्हणून महाराष्ट्राच्या संस्कृतीशी पूर्णतः एकरूप झालेल्या दांडेकरांचे निधन पुणे येथे झाले.

गो. नी. दांडेकर यांचे कुटुंबीय त्यांच्या साहित्यातील निवडक भागाच्या अभिवाचनाचे कार्यक्रम सादर करून त्यांची साहित्यस्मृती जपण्याचा प्रयत्न करताना दिसतात. 

- वि. शं. चौघुले/ आर्या जोशी 

दांडेकर, गोपाळ नीळकंठ