Skip to main content
x

आपटे, वासुदेव गोविंद

बालवाङ्मयाचे लेखक, बालमासिकाचे संपादक, निबंधकार, कोशकार, टीकाकार, अनुवादक म्हणून ख्याती असलेल्या वा. गो. आपटे यांचा जन्म धरणगाव; जिल्हा जळगाव येथे झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण धुळे येथे तर उच्चशिक्षण इंदूर व नागपूर येथे झाले. इ.स.१८९३ मध्ये त्यांनी कोलकाता विद्यापीठाची बी. ए. पदवी संपादन केली. त्यानंतर पुणे येथून नूतन मराठी विद्यालयात ते शिक्षक म्हणून रुजू झाले.

कोलकाता विद्यापीठातून पदवी घेत असताना आपट्यांचा संबंध बंगाली भाषेशी आला, भाषाभ्यासाची आवड असल्याने बंगाली भाषा शिकून त्यावर प्रभुत्व मिळविले. त्याशिवाय हिंदी, गुजराती, कानडी, तेलगू, तमिळ इत्यादी प्रादेशिक भाषाही त्यांना अवगत होत्या. उर्दू, फ्रेंच, पाली इत्यादी अन्य भाषांचाही त्यांनी अभ्यास केला. मराठी तर त्यांची मातृभाषा, त्यामुळे या सर्व भाषाभ्यासाचा उपयोग त्यांना त्यांच्या लेखनात, अध्ययनात व अध्यापनात झाला. चरितार्थव्यवसाय निमित्ताने त्यांची मुंबई, इंदूर, अलाहाबाद, पुणे पुन्हा इंदूर अशी भ्रमंती चालू होती. इंदूरच्या राणीसाहेबांच्या आमंत्रणावरून राजकन्यांचे शिक्षक म्हणून त्यांनी काही वर्षे अलाहाबाद येथे वास्तव्य केले. तेथे त्यांचा ‘मॉडर्न रिव्ह्यू’चे संपादक रामानंद चटोपाध्याय यांच्याशी परिचय झाला आणि त्यांचा सांगण्यावरून वा.गो.आपटे यांनी त्यांच्या ‘मॉडर्न रिव्ह्यू’ पत्रात मराठी पुस्तकांवर परीक्षणे लिहिली.

बंगाली भाषेचा आणि बंगाली ग्रंथांचा अभ्यास असल्याने बंकिमचंद्र चटर्जी यांच्या ऐतिहासिक, अद्भुतरम्य, सामाजिक कादंबर्‍यांचे अनुवाद आपट्यांनी केले. ‘भारत गौरव ग्रंथमाले’तर्फे चार खंडांत (१९२३ ते १९२५) हे अनुवाद प्रसिद्ध झाले. बंकिमचंद्र चटर्जी यांच्या ‘इंदिरा’, ‘दुर्गेशनंदिनी’, ‘कपालकुंडला’, ‘मृणालिनी’, ‘आनंदमठ’ ‘देवी चौधुराणी’, ‘कृष्णकांतांचे मृत्युपत्र’ इत्यादी चौदा कादंबर्‍यांचा त्यात समावेश आहे. आंतरभारतीच्या आणि मराठी भाषेच्या दृष्टीने आपटे यांचे कार्य अत्यंत  मोलाचे आहे.

‘वाल्मीकीचा जय’ ही कादंबरी आपट्यांनी बंगालीतून मराठीत अनुवादित केली. ‘श्री. हरनाथ ठाकूर यांची अपूर्व पत्रावली’ खंड- १ (१९२४) व खंड २ (१९२५) हेही त्यांनी अनुवादित केले.

आपट्यांनी सामाजिक सुधारणांच्या इष्टानिष्टतेविषयीच्या चर्चांना भरपूर वाव देणारी ऐतिहासिक कलाकृती ‘मूर्तिमंत देशाभिमान’ १९०७ मध्ये प्रकाशित केली. ‘नवयुग’ ही स्वतंत्र सामाजिक कादंबरी (१९०३) लिहिली. काही सामाजिक लघुकथांचे त्यांनी लेखन केले. त्यात ‘त्रिवेणी’ कथा ‘अवगुंठिता’ या बंगाली कथेवरून तर ‘मोतीमिनार’ कथा अकबरकालीन गोष्टीवर आधारित होती. वा. गो. आपटे यांनी त्यांना आवडलेल्या इंग्रजी कादंबर्‍यांचा मराठीत अनुवाद केला. त्यात मिसेस हेन्रीवूडच्या ‘इस्टलीन’ कादंबरीचे ‘माणिकबाग’ (१९१४), तसेच ‘मिसेस हॅल्बिर्टसन्स ट्रबल्स’ या कादंबरीचा ‘दुःखा अंती सुख’ (१९१४) या अनुवादित कादंबर्‍यांचा समावेश आहे. त्यांच्या सरस भाषांतरांतून मराठी वाङ्मय वाचकांची दृष्टी अधिकाधिक व्यापक होण्यास मदत झाली. वा. गो. आपटे यांनी भाषांतरित, रूपांतरित कादंबर्‍यांच्या प्रवाहाला चालना देण्याचे महत्त्वाचे काम केले.

       भाषाभ्यासाची विविध अंगे लक्षात घेऊन कोशसदृश पुस्तकांचे लेखनही आपट्यांनी केले. ‘बंगाली-मराठी कोश’ आणि ‘मराठी-बंगाली शिक्षक’ हे ग्रंथ लिहिले. ‘मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी’ (१९१०) हा महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यात सुमारे चार हजार वाक्संप्रदाय आहेत. ‘संप्रदाय व त्यांची व्याप्ती’ पहिल्या प्रकरणात सांगून पुढे संप्रदायांचे वर्गीकरण केले आहे. पुस्तकाची २०८ पाने वाक्संप्रदायांनी व्यापली आहेत. पुढे ५८ पाने म्हणींची व्याख्या व पद्धतशीर वर्गीकरण केले आहे. ‘म्हणी’ही दिल्या आहेत. आजही हा कोश अभ्यासकांना उपयोगी पडत आहे. पाच ते सात वर्षे सातत्याने परिश्रम घेऊन तयार केलेला ‘मराठी शब्दरत्नाकर’ अथवा ‘मराठी शब्दांचा मराठीत अर्थ देणारा कोश, १९२२ मध्ये प्रकाशित झाला. हा कोश लिहिताना त्यांना पोथ्या, कागदपत्रे इत्यादी ऐतिहासिक ऐवज पाहावयास मिळाला. त्यांचा अभ्यास करताना त्यात काही अपपाठ व चुकीचे अर्थ त्यांना आढळले. त्यांची दुरुस्ती करून ते शब्द त्यांनी या कोशात समाविष्ट केले आहेत.

कोशवाङ्मयाच्या प्रारंभीच्या पर्वातील एक अत्यंत महत्त्वाचा कोश म्हणून या कोशाचे मराठी वाङ्मयात स्थान आहे. ‘मराठी भाषेची शब्दसंपत्ती’ (१९२२), ‘लेखनकला व लेखनव्यवसाय’ (१९२५), ‘सौंदर्य व ललितकला’ (१९१९) याशिवाय वा. गो. आपटे यांनी ‘अशोक अथवा आर्यावर्ताचा पहिला  चक्रवर्ती राजा’ याचे चरित्र (१८९९) अशी त्यांची ग्रंथसंपदा आहे. त्यांचा ‘अशोक’हा ग्रंथ विष्णू गो. विजापूरकर यांच्या ‘ग्रंथमाला’ या मासिकातून प्रसिद्ध झाला होता. ‘जैनधर्म’ (१९०४) आणि ‘बौद्धपर्व’ अथवा ‘बौद्धधर्माचा साद्यंत इतिहास’ (१९१४) हे ग्रंथ लिहिले. ‘ज्ञानदीप’, ‘भारतकन्या’ ही पुस्तकेही लिहिली. एकूण चोवीसच्यावर ग्रंथ त्यांनी लिहिले.

वा. गो. आपटे यांची मराठी वाङ्मयाविषयीची आवड निर्माण होण्यास त्यांची बुद्धीमत्ता कारणीभूत होती, त्याचप्रमाणे त्यांना त्यांच्या उमेदीच्या काळात लेखक मोती बुलासा आणि प्राचार्य. वा. ब. पटवर्धन यांची मैत्री लाभली. तसेच कादंबरीकार हरिभाऊ आपटे यांचा सहवास लाभला होता. हरिभाऊ हे त्यांचे स्फूर्तिदाते व मार्गदर्शक होते.

       आपट्यांनी १९१० मध्ये चंद्रावती महिला विद्यालय, इंदूर येथे नोकरी केली. या काळात इंदूर सरकारने ‘मल्हारीमार्तंड’ ह्या पत्राचे संपादकत्व त्यांना दिले. पाच वर्षे त्यांनी ते काम केले. याशिवाय ‘ज्ञानप्रकाश’चे संपादकपद तसेच ‘विचारसाधना’चे संपादकपदही काही काळ संभाळले. संपादक, कोशकार, अनुवादक, लेखक असा साहित्याच्या सर्वांगाला स्पर्श करत असताना त्यांच्या बालवाङ्मयविषयक कार्यामुळे ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचले. बालसाहित्यासाठीचे त्यांचे योगदान लक्षणीय आहे. १९०६ मध्ये वा. गो. आपटे यांनी ‘आनंद’ हे मासिक मुलांकरिता सुरू केले. ते आजही नियमितपणे चालू आहे. या मासिकाचे विशेष म्हणजे यात मुलांचे लेखन छापले जाई. चुटके, कोडी, कविता, गमतीजमती, मजेदार गोष्टी असा रंजक व प्रबोधनपर मजकूर यात असल्यामुळे हे मासिक बालवाचकांना प्रिय झाले. १९२५ पासून या मासिकात ‘प्रौढ विद्यार्थी व स्त्रिया’ यांच्यासाठी सुरू केलेल्या पुरवणीत देशातील सामाजिक, राजकीय, धार्मिक घडामोडींच्या दोनही बाजू वाचकांना कळाव्यात व पक्षाभिमान किंवा दुराग्रह याला बळी न पडता त्या विषयांची सर्वांगीण माहिती त्यांना व्हावी, असा त्यांचा उद्देश होता. त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. ‘आनंद’ मासिकाव्यतिरिक्त इतर बालवाङ्मय त्यांनी लिहिले. ‘मनी आणि मोत्या’, ‘वीरांच्या कथा’, ‘एका दिवसाच्या सुट्टीत’, ‘मुलांचे अरेबिअन नाइट्स’ इत्यादी कथात्मक पुस्तके तसेच ‘बालरामायण’, ‘बालमहाभारत’, ‘का व कसे?’ इत्यादी उद्बोधक अशी एकूण ५३ पुस्तके त्यांनी मुलांसाठी लिहिली.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या घटनेचा पहिला मसुदा वा.गो. आपटे यांनी लिहिला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आद्य चिटणीसांपैकी ते एक होते. त्यांनी दहा वर्षे चिटणीसपद भूषविले.

- डॉ. रजनी अपसिंगेकर

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].