घुगरदरे, गणपत रावजी
गणपत रावजी घुगरदरे म्हणजेच श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा जन्म माघ शु. द्वादशीला झाला. त्यांच्या आईचे नाव गीताबाई होते. सातारा जिल्ह्यातले गोंदवले गाव ही त्यांची जन्मभूमी. महाराजांचे आजोबा लिंगोपंत व आजीचे नाव राधाबाई होते. गोंदवले येथे कुलकर्णीपद मिळाले म्हणून त्यांचे नाव कुलकर्णी पडले. मूळ नाव घुगर्दरे. या घराण्यात भगवद्भक्तीचा वारसा व पंढरीची वारी होत असे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात याचा प्रत्यय गणूने लहानपणीच आणून दिला.
आजोबांनी विचारले, ‘‘तुला हंडाभर मोहरा दिल्या तर तू काय करशील?’’ गणू तत्काळ उत्तरला, ‘‘आंधळे, पांगळे, रोगी, गरीब व भिकारी यांना मी त्या सगळ्या वाटून टाकीन.’’ नंतर आजोबांनी विचारले, ‘‘तुला राजा केले तर काय करशील?’’ गणू लगेच बोलला, ‘‘माझ्या राज्यात भिकारी राहू देणार नाही. मी माझ्या दारात अन्नछत्र घालीन.’’
गणू देखणा होता. लिंगोपंतांनी मुळाक्षरे, स्तोत्रे, श्लोक शिकवले. त्याची आठव्या वर्षी मुंज झाली. तो संध्या, पूजा, वैश्वदेव, पवमान रुद्र इ. ब्रह्मकर्म शिकला. गणू एकपाठी होता. शाळेत भजन किंवा दंगा करी. शाळा संपली की खेळ व गावभर भटकणे चाले. गावच्या मारुतीच्या पारावर साधू -बैरागी येत. एक रामदासीबुवा आले. गणूने त्यांना आपल्या शंका विचारल्या. त्यांचे वाक्य ‘सद्गुरूशिवाय परमेश्वर भेटत नाही,’ त्याच्या मनावर बिंबले. वयाच्या दहाव्या वर्षी गणू सदगुरूंच्या शोधात निघाला. तो कोल्हापूरला गेला. तेथे महालक्ष्मीचे दर्शन घेतले. वडील रावजी शोधत आले. मुलाला समजावून घरी नेले. रावजी व गीताबाईंनी गणूचे लग्न करून दिले. वधू होती खातवळ गावचे संभाजीपंत गोडसे यांची कन्या. नवीन जोडपे पंढरपूरला दर्शनाला जाऊन आले. त्यांच्या पहिल्या पत्नीला मुलगा झाला. तो एक वर्षाच्या आतच वारला. थोड्या दिवसांनी सरस्वतीचाही स्वर्गवास झाला. आईच्या आग्रहास्तव दुसरे लग्न केले ते आटपाटीचे सखाराम देशपांडे यांच्या आंधळ्या मुलीशी. त्यांनी या पत्नीचे नावही सरस्वतीच ठेवले. त्यांना तीन अपत्ये झाली; पण ती सर्व देवाघरी गेली. आजी-आजोबांचे निधन झाल्यानंतर गणूने आईची संमती घेऊन गुरूंच्या शोधात घर सोडले.
या प्रवासात अक्कलकोटचे स्वामी,माणिकप्रभू वगैरे सत्पुरुषांच्या भेटी झाल्या.अयोध्या,काशीची यात्रा झाली. अखेरीस श्री तुकाराम महाराज येहळीकर यांची गाठ पडली. गणूने त्यांचेच शिष्यत्व पत्करले. तुकामाई यांंनी अनुग्रह देऊन त्यांचे ‘ब्रह्मचैतन्य’ नामकरण केले. यानंतर ते तप:साधनेसाठी हिमालयात निघून गेले.
महाराजांनी एकूण तीन वेळा भारताची यात्रा केली. रामदासी संप्रदायाचा व रामभक्तीचा जीव ओतून प्रचार केला. इ.स. १८७६ व १८९६ असे दोन मोठे दुष्काळ पडले व माणसांची, पशूंची उपासमार झाली. महाराजांनी दुष्काळी कामे काढली व अन्नदानही केले. प्रसिद्ध क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना सांगितले की, ‘‘काळ अनुकूल नाही,’’ परंतु त्यांनी ऐकले नाही. १८७९ मध्ये फडक्यांना कैद झाली.
महाराजांनी लोकांना सन्मार्गाला लावले. गोशाळा काढल्या. गोंदवले,कर्नाटकात बेलधडी,यावगल,नरगुंद येथे राममंदिरे उभारली. महाराजांनी जपयज्ञ केले. रामनवमीचा उत्सव नियमितपणे, धुमधडाक्याने केला आणि अफाट लोकसंग्रह केला.
महाराजांनी एकही ग्रंथ लिहिला नाही; पण तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. त्यांचे म्हणणे असे, की मनुष्यप्राणी सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ आहे. जीविताचे कोडे उकलण्याची शक्ती फक्त मनुष्यात आहे. अज्ञानातून भ्रम उत्पन्न होतो. जीवनतत्त्व सूक्ष्म आहे. जीवनतत्त्वाची उत्पत्ती परमात्म्यापासून आहे, म्हणून परमात्म स्वरूपाचे ज्ञान झाले, की जीविताचे कोडे सुटते. जीवन संपन्न, आनंदमय बनते. प्रपंच कोणालाही टाकणे शक्य नाही. संसार अशा रितीने करावा, की स्वत: ब्रह्मरूप बनण्याचे तो साधन बनेल. महाराज भजनास उभे राहिले, की तत्कालिक स्फूर्तीने अभंग रचत असत. त्यांनी परमार्थपर अशी दहा स्फुट प्रकरणे लिहिली असून, ती ओवीबद्ध आहेत. त्यांची भाषा साधी व रचना सुलभ आहे.