Skip to main content
x

जव्हेरी, रामजी प्रागजी

गोरखभाई

          श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ संस्थेचे नाव घेताच आठवण होते, ती रामजी प्रागजी जव्हेरी यांची. या संस्थेमध्ये जव्हेरी यांनी दूरदृष्टीने गोसेवेला आधुनिक विज्ञानाची जोड देऊन पशुसंवर्धनाच्या विविध अंगांमध्ये उत्तम कार्य केले. सुधारित गोपैदाशीद्वारे गोसेवा ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात राबवून  एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांना ‘गोरक्षक’ या अर्थाने गोरखभाई या नावाने संबोधले जाते. त्यांचा जन्म नाशिक येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव प्रागजी मावजी जव्हेरी व आईचे नाव प्रेमकुंवरबाई होते. गोरखभाई यांचे शालेय शिक्षण नाशिक येथील रुंगठा हायस्कूलमध्ये झाले. शालेय शिक्षण संपल्यानंतर त्यांनी वडिलांचा नाशिक व मुंबई येथील परंपरागत व्यवसाय सफलतापूर्वक सांभाळला.

           प्रागजीभार्ईंनी निरुपयोगी, भाकड गोवंश उत्तम प्रकारे सांभाळण्यासाठी नाशिक पंचवटी येथे पांजरपोळ संस्था उभी केली. त्यांचे सुपुत्र गोरखभाई यांनी गोप्रेमापोटी स्वतःचे आयुष्य समर्पित केले. गोवंश जर वाचवायचा असेल, तर गोवंशाची उत्पादनक्षमता वाढवणे गरजेचे आहे, असे ते म्हणत. तसेच गोवंश तयार करताना त्याचा ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना जास्तीत जास्त लाभ होईल याकडेही ते लक्ष पुरवत. सक्षम, सुदृढ गोवंश तयार करण्यासाठी पांजरपोळ संस्थेमध्ये १९५३मध्ये गीर जातीच्या गाई आणून त्यांचे जतन व संवर्धन करण्यास सुरुवात झाली. परिसरातील शेतकर्‍यांना गीर जातीच्या कालवडी व खोंड यांचे वाटप करण्यात आले. परिणामी नाशिक परिसरात गीर गाईंची संख्या वाढली.

           राज्यात संकरित गोपैदास कार्यक्रम सुरू झाल्यावर आणि त्यापासून गोपालकांना मिळणारा आर्थिक फायदा दिसल्यानंतर गोरखभाई यांनी नाशिक पंचवटी पांजरपोळ संस्थेत हा कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सुरुवातीस काही सेवाभावी संंस्थांचे सहकार्य घेतले. प्रयोगामुळे अनेक फायदे होऊन या वृक्षाचा पुढे वटवृक्ष झालेला दिसून येतो. सदर प्रयोगाचा फायदा पांजरपोळ संस्थेबरोबरच समस्त पशुसंवर्धन क्षेत्राला झालेला आहे. आज संस्थेतील संकरित गाईंचे एका वेंतातील दुग्धोत्पादन ५००० लीटर असून, संकरित गाईने एका दिवसात तब्बल ५५ लीटर दूध दिले, हे भारतातील उच्चांकी उत्पादन ठरले.

           गोरखभाईंनी पांजरपोळ संस्थेच्या माध्यमातून संकरित गोपैदास कार्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला. संकरित गोपैदाशीतून अधिक उत्पन्न मिळण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने पैदास व संगोपन करणे आवश्यक असते, हे जाणून त्यांनी संस्थेमध्ये सुसज्ज प्रशिक्षण केंद्र स्थापन केले. शेतकरी, गोपालक खासगी व शासकीय पशुवैद्य, दुग्ध सहकारी संस्थांचे पदाधिकारी व सभासद यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण कार्यक्रम राबवला गेला. आतापर्यंत सुमारे १७,५००  प्रशिक्षार्थीनी या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेले आहे.

           भारत सरकारचा जैवतंत्रज्ञान विभाग आणि राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ यांच्या आर्थिक सहकार्याने त्यांनी अद्ययावत भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेची स्थापना केली. या प्रयोगशाळेतून उच्च उत्पादन क्षमतचे भ्रूण गोळा करून त्यांचा वापर संस्थेच्या गाईंसाठी यशस्वीपणे केला. तसेच या ठिकाणी देशातील इतर केंद्रांपेक्षा जास्त भ्रूण एका वेळेस गोळा करण्यात यश मिळवले.

           गोरखभाईंच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने गोठित वीर्यमात्रा उत्पादन प्रयोगशाळेची स्थापना केली. येथे उत्पादित झालेल्या गोठित वीर्यमात्रांचा पुरवठा राज्यातील व अन्य राज्यांतील शासकीय संस्था, दुग्ध सहकारी संस्था यांना माफक दराने पुरवठा केला. महाराष्ट्र शासनाचा पशू संवर्धन विभाग यांना १,४६,००० गोठित वीर्यमात्रा, तसेच देशातील मिलिटरी डेअरी फार्म्स यांना २०,००० वीर्यमात्रा, त्यांनी शेतकर्‍यांना व मिलिटरी डेअरी फार्मला मोफत पुरवठा केला. त्याचा मोठा फायदा झाला. त्याचप्रमाणे राज्यातील व अन्य राज्यांतील शासकीय संस्थांना गोमाता उत्पादनासाठी उच्च उत्पादन क्षमतेच्या संकरित वळूंचा पुरवठा केला. देशातील लेह ते बंगळुरूपर्यंतच्या मिलिटरीत डेअरी फार्ममधील गाईंचे दूध उत्पादन वाढावे, या उद्देशाने त्यांच्या विनंतीनुसार गोरखभाई यांनी आपले तज्ज्ञ पाठवून शास्त्रीय दृष्टीने संगोपन, आहार व्यवस्था, पैदास, रोगनियंत्रण इ.बाबत मोलाचे मार्गदर्शन केले. याचा परिणाम म्हणून पुढच्या वर्षातच मिलिटरी डेअरी फार्मसचे दूध उत्पादन २ लाख लीटरने वाढले. त्याबाबत गोरखभाई यांचा खास सत्कार करण्यात आला.

           पशुसंवर्धन कार्यासोबतच संस्था पर्यावरण रक्षणाचे कामही जोमाने करत आहे. त्यानुसार सुमारे ५ लाख झाडे लावली असून त्या परिसरातील सातपूर व अंबड औद्योगिक क्षेत्राला त्याचा फायदा होत आहे. तसेच सेंद्रिय कृषी व फलोत्पादन क्षेत्रात एक अग्रगण्य प्रयोगशील संस्था म्हणून ती नावारूपास आली आहे. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यासाठी जागतिक संस्थेकडून कार्बन क्रेडिट मिळवण्यासाठी संस्था प्रयत्न करत आहे.

           निरुपयोगी झालेली जनावरे शेतकरीबंधू पोसू शकत नाहीत, अशी जनावरे कत्तलखान्यात जाऊ नयेत यासाठी संस्था त्यांचा आजन्म सांभाळ करते. संस्थेतर्फे १२ वर्षांपर्यंतच्या सुमारे ४०० मुलांना भेदभाव न करता, मोफत खाऊ, दूध, केळी, बिस्किट यांचे वाटप केले जाते. चुंचाळे येथील महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील मुलांना दररोज मोफत दूध वाटप केले जाते. आयुर्वेदिक दवाखान्यातील गरीब रुग्णांना दररोज मोफत दूध दिले जाते. नाशिक शहरातील आधाराश्रम, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, कुष्ठरोग निर्मूलन संस्था, क्षयरोग रुग्णालय, बाल सुधारगृह, भोसला सैनिकी स्कूल यांसारख्या धर्मादाय संस्थांना माफक दराने दररोज दूधपुरवठा करण्यात येत आहे. संस्थेने आयुर्वेद सेवा संघात फिजिओथेरपी केंद्र उभारले आहे. तसेच आयुर्वेद पद्धतीने स्वास्थ्य सुधारावे यासाठी पंचकर्म युनिट तयार करून दिले आहे.

           गोरखभाई यांना नाशिक भूषण (१९९५), गोसेवा भूषण (१९९७), भाटिया रत्न पुरस्कार हे पुरस्कार मिळाले. देशातील मिलिटरी डेअरी फार्ममधील दूध उत्पादनवाढीसाठी सहकार्य केल्याबद्दल नवी दिल्लीच्या मिलिटरी डेअरी फार्मच्या उपसंचालकांनी गोरखभाई यांना चांदीची ढाल व सन्मानपत्र देऊन गौरव केला. गोरखभाईंच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पंचवटी पांजरपोळ संस्थेने पशुसंवर्धन क्षेत्रात बहुमोल काम केले. त्याबद्दल त्यांना गोपाळरत्न (१९७१-७२), कृषिभूषण पुरस्कार (१९८९-९०), वसंतराव नाईक पुरस्कार (१९९१-९२), वनश्री पुरस्कार (२००५), अखिल भारतीय कपाशीबीज पुरस्कार (१९९८-९९), अखिल भारतीय व राज्यपातळीवरील दुग्ध स्पर्धा, तसेच अखिल भारतीय व राज्य पातळीवरील पशू प्रदर्शनात संस्थेच्या जनावरांना अनेक बक्षिसेही मिळालेली आहेत. 

-  डॉ. वसंत नारायण जहागीरदार

जव्हेरी, रामजी प्रागजी