Skip to main content
x

कानिया, हरिलाल जयकिसनदास

रिलाल जयकिसनदास कानिया यांचा जन्म सुरत येथे झाला. त्यांचे बी.ए. पर्यंतचे शिक्षण भावनगर येथे झाले. त्यांचे वडील तेथील सामळदास महाविद्यालयामध्ये संस्कृतचे प्राध्यापक होते आणि नंतर तेथेच प्राचार्य झाले. याच महाविद्यालयामधून बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर हरिलाल मुंबईला आले आणि शासकीय विधि महाविद्यालयामध्ये दाखल झाले.

तेथून १९१५मध्ये एलएल.बी. पदवी मिळविल्यावर कानिया उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेची अ‍ॅडव्होकेटची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यांनी उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. अल्पावधीतच मूळ शाखेतील यशस्वी आणि कुशल वकील म्हणून त्यांचे नाव झाले. १९३०-३१मध्ये कानिया यांची मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी न्यायाधीश म्हणून आणि नंतर १९३३मध्ये कायम न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. १९४६पर्यंतच्या आपल्या तेरा वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या ज्ञानाने, निष्पक्षपातीपणाने आणि साधेपणाने सर्वांची वाहवा मिळविली. विशेषत: व्यापारविषयक कायद्यातील गुंतागुंतीच्या प्रकरणांचा त्वरित निवाडा करण्याबद्दल त्यांची ख्याती होती. १९४३मध्ये त्यांना सरहा किताब मिळाला. १९४४-४५मध्ये काही काळ त्यांनी उच्च न्यायालयाचे कार्यवाहक सरन्यायाधीश म्हणून काम पाहिले. ते उच्च न्यायालयाचे कायम सरन्यायाधीश व्हावेत अशी अनेकांची इच्छा आणि अपेक्षा होती, परंतु तसे न होता १९४६मध्ये त्यांची नियुक्ती तेव्हाच्या संघराज्य न्यायालयाचे (फेडरल कोर्टाचे) न्यायाधीश म्हणून झाली. हा एक चांगला योग ठरला, कारण १९४७च्या सुरुवातीला ते याच न्यायालयाचे पहिले भारतीय सरन्यायाधीश झाले.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि त्याचबरोबर देशाची फाळणी होऊन पाकिस्तान अस्तित्वात आले. लगेचच भारत आणि पाकिस्तान यांच्यात काही मतभेद निर्माण झाले; त्यांच्यावर विचार करून निवाडा देण्यासाठी दोन्ही देशांनी परस्परसंमतीने एक लवाद मंडळ (आर्बिट्रल ट्रायब्युनल) स्थापन  केले. त्यावर भारताच्या वतीने  न्या.कानिया  यांची नियुक्ती झाली.

२६ जानेवारी १९५० रोजी आपली नवी घटना लागू झाली आणि संघराज्य न्यायालयाच्या जागी स्वतंत्र भारताचे सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आले आणि भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणून न्या.कानिया यांची नियुक्ती झाली.

पहिल्या दोन वर्षांतच सर्वोच्च न्यायालयासमोर ए.के.गोपालन, शंकरीप्रसाद, रोमेश थापर, यांसारखे महत्त्वाचे खटले आले. न्या.कानिया यांच्या नेतृत्वाखाली न्यायालयाने या सर्व खटल्यांत दूरगामी परिणाम करणारे निर्णय देऊन राष्ट्रीय जीवनात आपले अढळ स्थान प्रस्थापित केले. न्या.कानिया यांची मुदत २ नोव्हेंबर १९५५ पर्यंत होती. परंतु दुर्दैवाने त्याआधीच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे आकस्मिक निधन झाले.

- शरच्चंद्र पानसे

 

संदर्भ :
१.      सेटलवाड, एम. सी.; ‘माय लाईफ : लॉ अ‍ॅण्ड अदर थिंग्ज्’; आवृत्ती १९९९, पुनर्मुद्रण २००८.

२.      बॉम्बे लॉ रिपोर्टर, १९५१.     

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].